|Sunday, March 24, 2019
You are here: Home » मनोरंजन » राकेश बापट दिसणार ‘अंडरवर्ल्ड डॉन’च्या भूमिकेत

राकेश बापट दिसणार ‘अंडरवर्ल्ड डॉन’च्या भूमिकेत 

प्रत्येक व्यक्ती ही आयुष्यात काहीतरी वेगळे आणि मोठे करण्यासाठी प्रयत्नशील असते. त्यासाठी हरप्रकारची धडपड माणूस करत असतो. या सगळय़ामध्ये आपली वेगळी ओळख बनविण्यासाठी ते हट्टाला पेटतात आणि मिळेल तो मार्ग ते निवडतात. मग भलेही तो मार्ग चुकीचा का असेना. यातूनच तो चुकीच्या मार्गावर जातो. याच संकल्पनेवर आधारित ‘वंश एंटरप्राइजेस’ प्रस्तुत ‘मुंबई आपली आहे’ हा चित्रपट 11 जानेवारीला प्रदर्शित होत आहे. भरत सुनंदा दिग्दर्शित आणि लिखित हा सिनेमा अंडरवर्ल्ड डॉनच्या आयुष्यावर आधारित असणार आहे. एरव्ही चॉकलेट बॉयची भूमिका साकारणारा राकेश बापट या चित्रपटात मात्र अंडरवर्ल्ड डॉनच्या भूमिकेत दिसेल.

मराठी चित्रपटात आधी कधीही न दिसलेला असा थरार ‘मुंबई आपली आहे’ या चित्रपटातून प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल. 1993 मध्ये मुंबईमध्ये जी गुन्हेगारी होती त्यावरच आधारित आणि तत्कालीन मुंबईची चाळ संस्कृती आणि त्यातून फुलत जाणारी प्रेमकथा या चित्रपटाद्वारे आपल्याला पाहायला मिळेल. हिंदी आणि मराठीमध्ये आपल्या अभिनयचाही छाप पडणारा राकेश बापट हा कुख्यात अंडरवर्ल्ड डॉनची भूमिका निभावत आहे. रोमँटिक हिरोची प्रतिमा असलेला राकेश बापट या चित्रपटात वेगळय़ा भूमिकेत दिसेल. या चित्रपटाद्वारे राकेश त्याची चॉकलेट बॉयची इमेज पुसणार आहे. या चित्रपटात राकेश सोबत मीनल पाटील हा नवीन चेहरा दिसणार आहे. तर हिंदी मालिका, चित्रपटामध्ये दिसणारा इक्बाल खान हा या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपट सफष्टीत पदार्पण करत आहे. इक्बाल या चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेत दिसेल. याशिवाय या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे, किशोरी शहाणे-विज, नयन जाधव हे देखील या चित्रपटात हटके भूमिकेत पाहायला मिळतील. या चित्रपटाला रुपेश गोंधळी यांनी संगीत दिले आहे. या चित्रपटाची निर्मिती सुरेखा पाटील यांनी केली आहे. तर कुणाल नैथानी हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. दमदार संवाद, तगडी स्टारकास्ट, ऍक्शनने भरलेला असा हा ‘मुंबई आपली आहे’ चित्रपट असणार आहे.

Related posts: