|Thursday, June 27, 2019
You are here: Home » क्रिडा » प्रथमच फडकला ऑस्ट्रेलियात तिरंगा!

प्रथमच फडकला ऑस्ट्रेलियात तिरंगा! 

71 वर्षांची प्रतीक्षा फळली, सिडनीतील कसोटी अनिर्णीत राहिल्यानंतर भारताचा 2-1 फरकाने मालिकाविजय

सिडनी / वृत्तसंस्था

प्रतिभाशाली आक्रमक कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने अखेर सोमवारी ऑस्ट्रेलियन भूमीत 71 वर्षांनंतर प्रथमच कसोटी मालिकाविजय संपादन करत नवा सुवर्णइतिहास रचला आणि याचवेळी तेथे प्रथमच तिरंगा अगदी डौलाने फडकला. सिडनीतील चौथी व शेवटची कसोटी पावसामुळे अनिर्णीत राहिल्यानंतर विराटसेनेच्या 2-1 फरकाने मालिकाविजयावर थाटात शिक्कामोर्तब झाले. मालिकेत सर्वाधिक 521 धावा जमवणारा मध्यफळीतील भक्कम फलंदाज चेतेश्वर पुजारा सामनावीर व मालिकावीर दोन्ही पुरस्कारांचा मानकरी ठरला.

भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया दौरा करण्याची ही 12 वी वेळ होती आणि संघाला प्रथमच त्यांच्या भूमीत एखादी कसोटी मालिका जिंकता आली. वास्तविक, भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत तब्बल 30 वर्षांनंतर फॉलोऑन देत एक नामुष्की जरुर आणली. पण, ढगाळ वातावरणामुळेच भारतीय संघाला 3-1 असा आणखी दमदार विजय साकारुन त्यांच्या जखमेवर आणखी मीठ चोळता आले नाही.

सिडनीतील कसोटी अनिर्णीत राहिल्यानंतर भारताच्या मालिकाविजयावर शिक्कामोर्तब झाले आणि स्टेडियमवर उपस्थित दोन्ही देशाच्या सर्व चाहत्यांनी उभे राहून त्यांचे अभिनंदन केले. या लढतीत ऑस्ट्रेलियन फलंदाजी इतकी खिळखिळी झाली होती की, सोमवारी पूर्ण दिवसाचा खेळ झाला असता तर यजमान संघ निश्चितच 3-1 फरकाने पराभूत झाला असता. स्टीव्ह स्मिथ व डेव्हिड वॉर्नरसारख्या दिग्गजांना येथे खेळता आले नसले तरी यामुळे भारताच्या विजयाचे महत्त्व कुठेच कमी होण्यासारखे नव्हते.

अजित वाडेकरांनी 1971 मध्ये विंडीज व इंग्लंड दौऱयात विजय संपादन करुन दिले, कपिलदेवने 1986, राहुल द्रविडने 2007 मध्ये इंग्लंडमध्ये विजय संपादन करुन दिले, त्या मांदियाळीत ऑस्ट्रेलियात संपादन केलेल्या या मालिकाविजयाची आवर्जून नोंद झाली आहे. यापूर्वी दक्षिण आफ्रिका व इंग्लंड दौऱयात विराटच्या नेतृत्वाखालील संघाला निर्णायक टप्प्यात कचखाऊ फलंदाजीमुळे अपयश स्वीकारावे लागले होते. इथे मात्र संघाने त्या सर्व चुकांपासून बोध घेतल्याचे सुस्पष्ट झाले.

या मालिकेत पर्थमधील फलंदाजीला प्रतिकूल खेळपट्टीवर विराट कोहलीचे दमदार शतक लक्षवेधी ठरले आणि चेतेश्वर पुजाराच्या झुंजार 521 धावा सर्वाधिक महत्त्वाच्या ठरल्या. अपारंपरिक शैलीमुळे फलंदाजांचा कर्दनकाळ ठरलेल्या जसप्रीत बुमराहचे 21 बळी तर कांगारुंना अक्षरशः सुरुंग लावणारे ठरले. एकीकडे, पुजाराने 3 शतकांसह 521 धावांची आतषबाजी केली असता, दुसरीकडे, ऑस्ट्रेलियातर्फे एकही फलंदाज शतकही झळकावू शकला नाही. नवोदित सलामीवीर मार्कस हॅरिसची 79 धावांची खेळी कांगारुंतर्फे सर्वोच्च ठरली.

शमी-इशांतचा बुमराहला पूरक मारा

भारतीय गोलंदाजांतर्फे बुमराहशिवाय, मोहम्मद शमी, इशांत शर्मा यांचा समयोचित, पूरक मारा देखील तितकाच महत्त्वपूर्ण ठरला. दुखापतग्रस्त होण्यापूर्वी रविचंद्रन अश्विन व रवींद्र जडेजा, कुलदीप यादव यांनीही आपल्या जबाबदाऱया चोख पार पाडण्यावर भर दिला. युवा सलामीवीर पृथ्वी शॉ दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर फेकला गेला असताना मायंक अगरवालने दोन अर्धशतके झळकावत संधीचे सोने केले. सिडनीतील शानदार शतक, मालिकेतील 350 धावा आणि विदेशात सर्वाधिक बळीच्या पराक्रमासह कसोटी क्रिकेट प्रकारात ऋषभ पंत भारताचा विद्यमान सर्वोत्तम यष्टीरक्षकही ठरला.

आशियाई कर्णधारात विराटच यशस्वी

विराट कोहलीसाठी त्याने घेतलेले निर्णय येथे चांगलेच फलद्रूप ठरले. शिवाय, त्याची स्वतःची फलंदाजी काही अपवाद वगळता त्याचा अव्वल दर्जा दर्शवणारी ठरली. एकाच कॅलेंडर वर्षात एकाही आशियाई कर्णधाराला दक्षिण आफ्रिका, इंग्लंड व ऑस्ट्रेलियात आजवर कसोटी विजय मिळवता आलेला नाही. पण, यंदा त्यात विराट कोहलीने यश संपादन केले. असा पराक्रम गाजवणारा तो आजवरचा एकमेव आशियाई कर्णधार ठरला.

सध्याचा संघ सर्वोत्तम : पुजारा

फलंदाजी व गोलंदाजी या दोन्ही आघाडय़ांवर अव्वल प्रदर्शन साकारणाऱया काही दिग्गज खेळाडूंमुळे मी जितका खेळलो, त्यात सध्याचा संघ सर्वोत्तम वाटतो, असे प्रतिपादन चेतेश्वर पुजाराने केले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका जिंकून देण्यात मोलाचा वाटा दिल्याबद्दल मालिकावीर पुरस्काराने सन्मानित केले गेल्यानंतर तो बोलत होता. 30 वर्षीय पुजाराने मालिकेत 74 च्या सरासरीने 521 धावा फटकावल्या असून यात 3 शतकांचा समावेश राहिला.

‘दक्षिण आफ्रिका व इंग्लंडमध्ये खेळलो असल्याने तो अनुभव माझ्यासाठी इथे उपयुक्त ठरला. ऍडलेडमध्ये मला शतक झळकावता आले आणि 1-0 अशी संघाला विजयी आघाडी घेता आली, ती आमच्यासाठी स्वप्नपूर्ती होती’, असे तो पुढे म्हणाला. पुढील कसोटी मालिका 6-7 महिन्यानंतर असल्याने मला पुरेसा वेळ मिळेल. संधी मिळाल्यास मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये खेळणे जरुर आवडेल. पण, कसोटी क्रिकेट हाच माझा प्राधान्यक्रम असणार आहे’, असे या दिग्गज फलंदाजाने येथे नमूद केले.

कोट

माझ्या दृष्टीने 2011 विश्वचषक विजयापेक्षाही हा अधिक भावूक करणारा क्षण आहे. 2011 विश्वचषक जेत्या संघात माझा समावेश होता. पण, त्यापूर्वी कधीही विश्वचषकात खेळलो नसल्याने विश्वचषकापासून दूर राहणे म्हणजे काय आणि तो जिंकणे किती महत्त्वाचे, याची मला त्यावेळी कल्पना नव्हती. अर्थातच, ऑस्ट्रेलियातील हा मालिकाविजय माझ्यासाठी अधिक सुखावणारा आहे.

-भारतीय कर्णधार विराट कोहली

सध्याची भारतीय गोलंदाजी लाईनअप जागतिक स्तरावरील सर्वोत्तम आहे. खरं तर ऍडलेडमधील पहिली कसोटी आम्ही जिंकू शकलो असतो. पण, अगदी निर्णायक क्षणी आमच्याकडून काही गंभीर चुका झाल्या आणि भारताने त्याचा पुरेपूर लाभ घेतला. अर्थात, ऑस्ट्रेलियन भूमीत प्रथमच मालिकाविजय संपादन केल्याबद्दल मी भारताचे अभिनंदन करतो.

-ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेन

शास्त्री म्हणाले, हा मालिकाविजय 1983 मधील विश्वचषकाच्या तोलामोलाचा!

भारताने ऑस्ट्रेलियन भूमीत संपादन केलेला मालिकाविजय माझ्यासाठी अतिशय आनंददायी आणि समाधान देणारा आहे. कसोटी क्रिकेट हेच सर्वोच्च क्रिकेट असल्याने मी या मालिकाविजयाला 1983 मधील विश्वचषकाच्या तोलामोलाचा मानतो, असे कौतुकोद्गार भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी काढले. अर्थात, शास्त्रींनी या विजयाचे थेट 1983 विश्वचषक विजयाशी तुलना केल्याने याबद्दल अनेक मतमतांतरे व्यक्त झाली. सर्व क्रिकेट प्रकारांची तुलना होऊ शकत नाही. पण, 1983 मध्ये भारताने धूळ चारली, त्यावेळी विंडीज संघात व्हीवियन रिचर्ड्स, क्लाईव्ह लॉईड यांच्यारख्या तडाखेबंद फलंदाजांबरोबरच अँडी रॉबर्ट्स, माल्कम मार्शल, मायकल होल्डिंग व जोएल गार्नरसारख्या जलदगती, वेगवान तोफखान्याचा समावेश होता.

शास्त्री यांनी मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या विजयाचे महत्त्व अधिक असल्याचे मत मांडले. ते पुढे म्हणाले, ‘भूतकाळ इतिहास असतो तर भविष्य नेहमी गूढ असते. पण, मला वर्तमानात जगणे आवडते आणि 71 वर्षांनंतर येथे आम्ही येथे संपादन केलेला विजय आमच्यासाठी लाख मोलाचा आहे. ऑस्ट्रेलियात प्रथमच मालिकाविजय संपादन करुन देणाऱया विराटचे मी येथे खास अभिनंदन करु इच्छितो’.

‘माझ्या मते विराट जितक्या तळमळीने, बांधिलकीने आणि आक्रमकतेने खेळतो, तितके आणखी कोणी खेळत असेल, असे मला वाटत नाही. खरं तर मी हे सातत्याने सांगत आलो आहे. जागतिक स्तरावरील सर्व कर्णधारात विराटच्या आसपास कोणी पोहोचेल असा कोणी दिसून येत नाही’, याचाही त्यांनी उल्लेख केला.

विराट स्वतःला व्यक्त करणारा कर्णधार आहे. इतर खेळाडू त्याला पाहतात, तेव्हा त्यांना दिसून येते की, तो फक्त बोलत नाही तर जे बोलतो, ते प्रत्यक्षात साकारण्याचा 100 टक्के प्रयत्न करतो. तो मैदानावर उतरतो, त्यावेळी संघाला वर्चस्व कसे प्रस्थापित करुन देता येईल, यावरच त्याचे सर्व लक्ष केंद्रित करतो. त्यामुळे अन्य खेळाडूंच्या तुलनेत त्याची यशाची टक्केवारी अधिक लक्षवेधी, अधिक प्रभावी आहे, असे शास्त्री पुढे म्हणाले. आमच्या संघाने दक्षिण आफ्रिका व इंग्लंडमध्ये अनेक बोध घेतले आणि त्या शिदोरीवरच येथे विजय खेचून आणला, याचा शास्त्रींनी एका प्रश्नाला उत्तर देताना उल्लेख केला. मेलबर्नमध्ये जसप्रीत बुमराहने भेदक गोलंदाजीची प्रचिती आणून दिली. याशिवाय, ऋषभ पंत, हनुमा विहारी, मायंक अगरवाल यांच्यासारख्या नवोदितांनी लक्षवेधी कामगिरी केली, त्यांचेही शास्त्रीनी येथे कौतुक केले.

गावसकर म्हणतात, स्मिथ-वॉर्नर नसणे, ही भारताची चूक नव्हे!

विद्यमान ऑस्ट्रेलियन संघात स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर यांच्यासारख्या अव्वल फलंदाजांचा समावेश नव्हता, ही काही भारतीय संघाची चूक नव्हती. ऑस्ट्रेलियाने जो संघ उतरवला, त्याविरुद्ध भारतीय संघ खेळला आणि अविस्मरणीय विजय खेचून आणला, त्यामुळे, विराटसेनेचे याबद्दल कौतुकच करायला हवे, असे प्रतिपादन माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी केले. तंदुरुस्तीच्या निकषावर सध्याचा मागील सर्व संघांत सर्वोत्तम ठरतो, याचाही त्यांनी येथे उल्लेख केला.

‘वास्तविक, ऑस्ट्रेलिया स्मिथ, वॉर्नर यांना कमी शिक्षा देऊ शकली असती. पण, एक वर्षाची बंदी त्यांनी योग्य मानली. ज्या खेळाडूंनी खेळाला कलंक लावला, त्यांच्यावर कडक कारवाई होणे आवश्यकच होते’, असे ते म्हणाले.