|Saturday, August 24, 2019
You are here: Home » Top News » बेस्टचे कर्मचारी संप : उशिरा आलेल्यांना परीक्षेला बसू द्या, मुंबई विद्यापीठाचा विद्यार्थ्यांना दिलासा

बेस्टचे कर्मचारी संप : उशिरा आलेल्यांना परीक्षेला बसू द्या, मुंबई विद्यापीठाचा विद्यार्थ्यांना दिलासा 

ऑनलाईन टीम / मुंबई :

 बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा फटका सर्व सामान्यांसहीत विद्यार्थ्यांनाही बसत आहे. याची खबरदारी घेत मुंबई विद्यापीठाने विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. संपाच्या काळात विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर पोहोचण्यास उशीर होण्याची शक्यता नाकारण्यात येत नाही, अशा वेळी परीक्षा केंद्रप्रमुख आणि प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेस बसू द्यावे, अशी सूचना विद्यापीठाकडून जारी करण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

मुंबई विद्यापीठाच्या आज एकूण 17 परीक्षा आहेत. लॉ, एमएस्सी, एम कॉम, एम, बीएड ,एमपीएड, बीपीएड, बीएड(स्पेशल एज्युकेशन),एमएड या विभागाच्या परीक्षा आहेत. संपामुळे होणाऱ्या त्रासामुळे विद्यार्थी परीक्षा केंद्रांवर उशिरा पोहोचल्यास त्यात विद्यार्थी हित लक्षात घेऊन विद्यापीठाने हा निर्णय घेतला आहे आणि हा संदेश महाविद्यालयांना पोहोचवण्यात आला असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली. आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी सर्वसामान्य मुंबईकरांसाठी वेठीस धरत बेस्ट कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे. सोमवारी (7 जानेवारी) मध्यरात्रीपासून बेस्ट कामगारांनी संप पुकारला आहे. यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. दरम्यान, बेस्टच्यासंपामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी एसटी मुंबईकरांच्या मदतीला धावून आली आहे. सध्या एकूण 40 एसटी बसेस प्रवाशांसाठी रस्त्यावर धावत आहेत. शिवाय, गरजेनुसार जादा एसटी बसेस सोडण्यात येतील, असेही सांगण्यात आले आहे.