|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » Top News » तिने चोरलेले माझे मन शोधन द्या ; तरूणाची पोलिसांत तक्रार

तिने चोरलेले माझे मन शोधन द्या ; तरूणाची पोलिसांत तक्रार 

ऑनलाईन टीम / मुंबई :

पोलिसांकडे नेहमीच वेगवेगळय़ा स्वरुपाच्या तक्रारी घेऊन लोक न्यायाच्या अपेक्षेने येतात. मात्र, नागपुरात एका तरुणाच्या तक्रारीने पोलिसांनाच चक्रावून सोडले आहे. कारण एक तर्फी प्रेमातून तरूणाने एका तरूणीने त्याचे मन चोरल्याची तक्रार केली आहे. तरुणाने केलेल्या या तक्रारीवर सल्लामसलत करुन आता पोलीस अधिकाऱयांनीच तरुणासमोर हात जोडत, या समस्येवर आमच्याकडे उपाय नसल्याचे सांगून पिच्छा सोडवला.

 

नागपुरात एका महाविद्यालयीन तरुणाने काहीशी अशाच आशयाची तक्रार पोलिसांकडे केली. एका तरुणीवर एकतर्फी प्रेम करणाऱया या पठ्ठय़ाने पोलिसांकडे तक्रार दिली की संबंधित तरुणीने माझं मन/हृदय चोरले आहे. मात्र, आता ती त्याच्यापासून नजर चोरत आहे. आता पोलिसांनी त्याचा चोरी गेलेला दिल/मन परत मिळवून द्यावा.

तरुणाच्या या जगावेगळय़ा तक्रारीमुळे पोलीस दलातील कनिष्ठ अधिकारीही चक्रावून गेले आणि त्यांनी वरिष्ठकडे जेव्हा मार्गदर्शनाची विनंती केली, तर तेही गोंधळले. आपापसात चर्चा केल्यानंतर हे पोलिसांचे विषय आणि कार्यक्षेत्र नाही, असे दिल/मन चोरीला गेल्याची तक्रार करणाऱया तरुणाला कळवण्यात आले.

दरम्यान, मानसोपचार तज्ञांच्या मते दिल/मन चोरी झाल्याची तक्रार पोलिसांपर्यंत घेऊन जाणाऱ्या तरुणाची मनस्थिती ही समजून घेण्याची गरज आहे. एकतर तो लोकांचा आणि त्या तरुणीचं लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यासाठी असे कृत्य करत असावा. किंवा लाडात आणि खूप सुखसोयीमध्ये वाढल्यामुळे त्याला नकार ऐकण्याची सवयच नसावी. मानसोपचार तज्ञांच्या मते नकार ऐकून घेतल्यानंतर असे वर्तन करणाऱया तरुणाच्या पालकांनी त्याच्या वर्तनाकडे लक्ष देण्याची गरज आहे. आजच्या पिढीमध्ये नकार पचवण्याची क्षमता फार मोजक्या तरुणांमध्येच असते काळजी करण्याची गरज आहे.