|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » भिरवंडेत घरफोडी; 8 हजाराचा ऐवज लंपास

भिरवंडेत घरफोडी; 8 हजाराचा ऐवज लंपास 

कणकवली:

भिरवंडे-वरची परतकामवाडी येथील आरकान मोतेस डिसोजा (45, मूळ भिरवंडे व सध्या रा. ठाणे) यांचे बंद घर अज्ञात चोरटय़ांनी फोडले. घराच्या कपाटातील पाच हजार रुपये व कानातील रिंगजोड मिळून 8 हजाराचा मुद्देमाल चोरटय़ांनी लंपास केला. ही घरफोडी सोमवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरकान या कुटुंबियांसह ठाणे येथे वास्तव्याला असतात. त्यांच्या घरानजीकच आरकान यांच्या मामी कतालीन पेद्रू डिसोजा या राहतात. त्या आरकान यांच्या घराकडे वेळ मिळेल तेव्हा फेरफटका मारतात. आरकान व कुटुंबीय हे 23 नोव्हेंबरला घर बंद करून पुन्हा ठाणे येथे गेले होते. सोमवारी सकाळी कतालीन या आरकान यांच्या घराकडे गेल्या असता, हा घरफोडीचा प्रकार उघडकीस आला.

कतालीन यांनी पाहिले असता घराचा दरवाजा उघडा होता. घराची कौलेही काढली होती. त्यांनी घडलेली घटना कळविल्यानंतर आरकान मंगळवारी घरी दाखल झाल्या. चोरटय़ांनी घरातील सामान अस्ताव्यस्त फेकले होते. कपाटही उघडय़ा स्थितीत होते. आरकान यांनी पाहिले असता कपाटातील पाच हजार रुपये व रिंगजोड चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. आरकान यांनी चोरीबाबत एका नातेवाईकावर संशय व्यक्त केला असून त्याचे नावही पोलिसांकडे दिले आहे. अधिक तपास कनेडी दूरक्षेत्राचे पोलीस करीत आहेत.