|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » विटय़ातील आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानात महाराष्ट्राची पताका

विटय़ातील आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानात महाराष्ट्राची पताका 

प्रतिनिधी/ विटा

आमदार अनिल बाबर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित विटय़ातील आंतरराष्ट्रीय कुस्ती महादंगलीत महाराष्ट्राच्या चारही पैलवानांनी जॉर्जिया आणि उत्तर भारतातील मल्लांना आस्मान दाखवत विजयी पताका फडकवली. विजेत्या मल्लांना आमदार बाबर यांच्याहस्ते रोख बक्षिस आणि मानाची गदा प्रदान करण्यात आली. पै. चंद्रहार पाटील यांच्या पुढाकाराने आयोजित हे मैदान पाहण्यासाठी महाराष्ट्रासह बेळगांव येथूनही कुस्ती शौकीन मोठय़ा संख्येने उपस्थित होते. चटकदार आणि निकाली कुस्त्या झाल्यांन शौकीनांनी समाधान व्यक्त केले.

आमदार अनिल बाबर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विटय़ात आंतरराष्ट्रीय कुस्ती महादंगलीचे आयोजन करण्यात आले होते. पै. विजय चौधरी, पै. राहुल आवारे आणि पै. नरसिंग यादव हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मल्ल या मैदानात उतरले होते. तर नुकताच महाराष्ट्र केसरी किताब पटकावलेल्या बालारफिक शेख यानेही या मैदानात कुस्ती केली. या चारही मल्लांनी निकाली कुस्त्या करीत महाराष्ट्राची विजयी पताका फडकावली.

दुपारी चार वाजण्याच्या सुमारास कुस्ती मैदानाला सुरूवात झाली. सुरूवातीला भागातील छोटय़ा-मोठय़ा पैलवानांच्या कुस्त्या झाल्या. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास मोठय़ा कुस्त्यांना सुरूवात झाली. दरम्यानच्या काळात पवईच्या टेकावरील जीवनप्रबोधीनीचे मैदान आणि पेक्षक गॅलरी कुस्ती प्रेमींच्या उपस्थितीने खचाखच भरली होती. दोन मोठय़ा स्क्रीनवर प्रेक्षकांना कुस्तीचे थेट प्रक्षेपण दाखवण्यात येत होते. कुस्ती निवेदक शंकर पुजारी यांच्यासह सहकाऱयांच्या निवेदनाने कुस्ती शौकीनांच्या अंगावर रोमांच उभा केले.

नरसिंगने कमलजितला आस्मान दाखवले  

मैदानात उपविभागीय पोलिस अधिकारी आणि तीन वेळचा महाराष्ट्र केसरी नरसिंग यादव याची लढत दिल्लीच्या कमलजीतसिंग याच्याशी झाली. या कुस्तीसाठी उत्तम पाटील पंच म्हणून उपस्थित होते. सात मिनिटांच्या खडाखडीनंतर नरसिंग यादवने घिस्सा डावावर कमलजीतला चितपट करीत मैदान मारले. या लढतीत सुरूवातीपासून नगरसिंग यादव आक्रमक होता. त्याने अवघ्या दुसऱया मिनिटाला एकेरी पट काढून कमलजीतचा ताबा घेतला होता. परंतू त्याचा प्रयत्न फसला त्यानंतर लगेच त्याने एकलांग टाकत कमलजीतला जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला. मात्र हा डावही फसला. त्यानंतर चपळाईने नरसिंगने घिस्सा लावत कमलजीतला चितपट केले आणि कुस्ती शौकीनांनी जल्लोष केला.

जॉर्जियाच्या टडोरेवर ‘विजय’ 

मैदानातील पहिल्या क्रमांकाची कुस्ती उपविभागीय पोलिस अधिकारी विजय चौधरी आणि जॉर्जियाचा टेडोरे लेब्नॉईझे यांच्यात झाली. यामध्ये तीन वेळच्या महाराष्ट्र केसरी विजयने अवघ्या चार मिनीटात घिस्सा लावत टेडोरेला आस्मान दाखवले. टेडोरेच्या चपळ हलचालीने कुस्ती रंगतदार होईल अशी अपेक्षा असताना विजयने एकतर्फी विजय मिळवत महाराष्ट्राचा झेंडा फडकावला.

‘राहुलची लक्षवेधी कुस्ती’  

मैदानात खऱया अर्थाने आकर्षण ठरलेला मल्ल होता राष्ट्रकुल पदक विजेता राहुल आवारे. राहुल आणि हरियाणाच्या सोनू कुमार यांच्यात झालेली लढत चटकदार होती. सात मिनिटांच्या खडाखडीनंतर सडपातळ बांध्याच्या राहूलने एकचाक डावावर सोनूकुमारला चितपट करीत मैदान मारले आणि शौकीनांची वाहवा मिळवली. ही कुस्ती चांगलीच आक्रमक झाली. कुस्ती सुरू झाल्यानंतर दुसऱयाच मिनिटाला सोनूने राहुलचा ताबा घेतला होता. त्यानेही एकेरी पटाची पकड लावली होती. परंतू त्यातून निसटत राहुलने ताबा घेतला आणि स्वारी भरली. एकेरी पट काढण्याचा प्रयत्न फसल्यानतंर डोळय़ाची पापणी लवण्यापूर्वीच राहुलने एकचाक डाव करीत चितपट कुस्ती मारली. पंच म्हणून हिंदकेसरी संतोष वेताळ पंच यांनी काम पाहिले.

‘नविन महाराष्ट्र केसरी चमकला’ (08विटा19)

नुकताच महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावून दाखल झालेल्या पै. बालारफिक शेखने पहिल्या दोनही कुस्त्या खानापूर तालुक्यात मारल्या. विटय़ातील मैदानात त्याची लढत परवेजकुमार बरोबर झाली. पुणदीचे हणमंत जाधव यांनी पंच म्हणून काम पाहिले. ही कुस्ती वीस मिनिटे चालली. एकमेकांचा कब्जा घेत डाव-प्रतिडाव सुरू होते. चुरशीने झालेल्या लढतीत बालाने पोकळ घिस्सा लावत परवेजकुमारला आस्मान दाखवले.

सिकंदर, माऊलीसह नविन मल्लही चमकले

याशिवाय मैदानात सिकंदर शेख या नव्याने बहरात असणाऱया गंगावेश तालमीच्या मल्लाने चार मिनिटात महारूद्र काळेलला एकलांगी डावावर आस्मान दाखवले. नवनाथ इंगळे, संतोष दोरवड यांनीही चमकदार कुस्त्या केल्या. भारत मदने आणि कौतुक डाफळे यांच्यातील कुस्ती देखिल चटकदार झाली. अवघ्या एक मिनिटांच्या कालावधीत भारतने कौतुकला चितपट करीत शौकीनांची वाहवा मिळवली. माऊली जामदाडे आणि योगेशकुमार यांच्यातील लढतीत बारा मिनिटांच्या खडाखडीनंतर माऊलीने मथुरेच्या योगेशकुमारवर घिस्सा डावावर मात केली. मैदानात मयुर गायकवाड, सागर तामखडे, माऊली कोकाटे, अमर गाढवे, सत्यजीत पाटील, संजय बोराटे, विकास पाटील, वैभव रासकर, अनिल धोतरे, जालिंदर मालुगडे यांनी चटकदार कुस्त्या केल्या.

निकाली मैदानाने कुस्ती शौकीन समाधानी

पहिल्या चारही कुस्त्या निकाली झाल्याने राज्यभरातून आलेल्या कुस्ती शौकीनांनी समाधान व्यक्त केले. मैदानात आमदार अनिल बाबर यांचा गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. या ठिकाणी केक कापून आमदार बाबर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. आमदार बाळासाहेब पाटील, माजी मंत्री प्रतिक पाटील यांच्यासह मान्यवरांनी मैदानाला भेट दिली.

संयोजकांचे रावसाहेब मगर यांच्याकडून कौतुक

या मैदानासाठी पै. चंद्रहार पाटील यांनी चांगलीच मेहनत घेतली होती. त्यांच्यासह नगरसेवक अमोल बाबर, सुहास बाबर, अभिजीत पवार, किरण पाटील, दिलीप किर्दत यांच्या कुस्ती कमिटीने आणि कार्यकर्त्यांनी मैदान यशस्वी करण्यासाठी हातभार लावला. पै. रावसाहेब मगर यांनी नगरसेवक अमोल बाबर यांना 2 हजार 522 वा फेटा बांधला आणि दरवर्षी कुस्ती मैदान आयोजित करण्यासाठी आवाहन केले. तर राष्ट्रीय कुस्ती महासंघाचे उपाध्यक्ष डी. आर. जाधव यांनी पहिल्या चार क्रमांकाच्या कुस्त्यांसाठी मानाच्या गदा भेट दिल्या.  गलाई बांधवांसह कुस्ती प्रेमींनी उदार अंतकरणाने आंतरराष्ट्रीय कुस्त्या विटय़ात होण्यासाठी पुढाकार घेतला.

मैदानात कुस्ती परिषदेचे राज्य उपाध्यक्ष नामदेव मोहिते, अर्जून पुरस्कार विजेते काका पवार, पै. गोविंद पवार, हिंदकेसरी दिनानाथसिंह, महाराष्ट्र केसरी धनाजी फडतरे, प्रा. राम सारंग, पैलवान ग्रुपचे अध्यक्ष पै. मारूती जाधव, बेळगावचे शिवाजी पाटील, सुधीर बर्गे, तानाजीशेठ बाबर, सयाजी बाबर, पै. नामदेव बडरे, पै. नजरूद्दीन नायकवडी, महाराष्ट्र केसरी हणमंत जाधव, पै. राजेंद्र शिंदे, पै. आलम मुल्ला, पै. अभिजीत पाटील, पै. सतोष वेताळ, कुंडलीक गायकवाड यांच्यासह राज्यभरातील कुस्तीप्रेमी उपस्थित होते.

 

Related posts: