|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » चिपळुणात लवकरच गॅसची पाईपलाईन!

चिपळुणात लवकरच गॅसची पाईपलाईन! 

प्रतिनिधी/ चिपळूण

शासनाला आता शहरातून गॅस सिलिंडर बंद करायचे असून ग्रामीण भागात होणारा लाकडांचा धूर कमी करण्यासाठी हे सिलिंडर तिकडे वळवायचे आहेत. त्यामुळे शहरात लवकरच गॅस पाईपलाईन टाकली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात खेंड, राधाकृष्णनगर व पाग परिसरात हे काम केले जाणार असल्याचे युनुसन एन्व्हायरो प्रा. लि. कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक मंदार गोखले यांनी मंगळवारी आयोजित नगर परिषदेच्या विशेष सभेत दिली.

भाजप सरकार सत्तेवर आल्यापासून नवनवीन योजना आणत आहे. यातूनच ग्रामीण भागातील लाकडांचा धूर कमी करण्यासाठी उज्ज्वला गॅस योजना आणली. त्यानुसार गरिबांनाही कनेक्शन मिळाले आहे. एवढेच नव्हे तर आता रॉकेल मुक्तीसाठी हमीपत्र घेतली जात आहेत. त्यामुळे लवकरच रॉकेल वितरणही बंद केले जाणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागात गॅस सिलिंडरचा मागणीप्रमाणे पुरवठा व्हावा म्हणून शहरातून सिलिंडर गायब करण्याचा विचार केंद्र सरकारने चालवला आहे.

त्यानुसार दिल्ली, मुंबई, पुणे या मोठय़ा शहरांबोबर आता गॅस पाईपलाईनने गॅस पुरवठा करण्याची योजना शासनाने आखली आहे. विशेष म्हणजे कोकणात रत्नागिरी व चिपळूण या दोन तालुक्यांची निवड झाली आहे. त्यानुसार रत्नागिरी-मिरजोळी परिसरात काही किलोमीटरवरही ही लाईन टाकण्यात आली आहे. त्यामुळे येथे नेमके काय केले जाणार आहे, हे सांगण्यासाठी कंपनीचे गोखले, प्रियांका लाड आदी येथे आले होते. यावेळी त्यांनी सध्या खेड तालुक्यातील लोटे येथे 10 किलोमीटरवर पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले. सध्या ग्राहकांनी 14 किलोचा सिलिंडर घेतल्यानंतर तो परत करताना त्यात काही गॅस शिल्लक रहातो. त्यामुळे त्याचे नुकसान होते.

मात्र आम्ही शासनाच्या योजनेतून नॅचरल व पीएनजी गॅस देणार आहोत. याची पाईपलाईन ज्यांची मागणी असेल त्यांच्या घरापर्यंत जाणार असून मीटर राहणार आहे. त्यामुळे तुम्ही जेवढा गॅस वापरला तेवढाच खर्च नागरिकांना येणार आहे. ही पाईपलाईन उच्च दर्जाच्या प्लास्टीकची राहणार असून पहिल्या टप्प्यात खेंड, राधाकृष्णनगर व पाग परिसरात ही पाईपलाईन टाकली जाणार असल्याचे सांगितले. यावर नगरसेवकांनी या गॅसच्या साठवण टाक्या कुठे असतील, पाईपलाईन नेमकी कशी जाणार, भविष्यात जागा विकसित करताना त्याची अडचण होणार आहे का, दुर्घटना घडल्यास तुमची काय यंत्रणा असेल, असे अनेक प्रश्न उपस्थित केले. यावर गोखले म्हणाले, यापूर्वी नगर परिषदेला याचा आराखडा देण्यात आला आहे. मात्र तरीही नव्याने तुमच्या असलेल्या शंका लक्षात घेऊन आम्ही नवा आराखडा लवकरच देऊ, असे स्पष्ट केले. यावर सर्वांनी तुमचा आराखडा आल्यानंतर आम्ही हा विषय मुख्य सभेत लावून त्याचा परिपूर्ण अभ्यास करून मंजुरी देऊ, असे स्पष्ट केले.