|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » बलात्कारप्रकरणी तरूणास 10 वर्षे सक्तमजुरी

बलात्कारप्रकरणी तरूणास 10 वर्षे सक्तमजुरी 

प्रतिनिधी/ खेड

घरात कुणीही नसल्याची संधी साधत गतिमंद 28 वर्षीय महिलेवर बलात्कार करणाऱया नराधमास येथील जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश अनंत आवटे यांनी मंगळवारी 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. मुराद इक्बाल मेटकर (40, कोंडिवली) असे आरोपीचे नाव आहे. ही घटना 10 नोव्हेंबर 2014 रोजी दुपारी घडली होती.

शिव बुद्रूक येथे वास्तव्यास असलेली 28 वर्षीय पीडित महिला गतिमंद व अधू आहे. 10 नोव्हेंबर 2014 रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास पीडित महिला दार बंद करून घरात बसली होती. घराचे मागील दार धक्का देऊन उघडत नराधमाने अनधिकृतपणे प्रवेश करत पीडित महिलेशी लज्जास्पद वर्तन केले. या बाबत कुणाला काही सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी नराधमावर भादंवि कलम 376 (2) (ल), 354, (ब), 452, 506 अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती.

या खटल्याच्या सुनावणीदरम्यान 13 साक्षीदार तपासण्यात आले. यात अवधूत बर्वे, शिक्षिका सरिता टिकम यांची साक्ष महत्वाची ठरली. जिल्हा न्यायाधीश अनंत आवटे यांनी बलात्कारप्रकरणी नराधमास दोषी ठरवून 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावत पीडित महिलेस 10 हजार रूपये नुकसान भरपाई देण्याचे आदेशही दिले. सरकार पक्षातर्फे ऍड. मेघना नलावडे यांनी काम पाहिले. तपासिक अंमलदार म्हणून येथील तत्कालीन पोलीस निरीक्षक विकास गावडे व परि. पोलीस उपअधीक्षक डॉ. नीलेश पांडय़े यांनी काम पाहिले.