|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » शासनाचे नवे धोरण खेळापासून दूर नेणारे

शासनाचे नवे धोरण खेळापासून दूर नेणारे 

खेळाडूंना 25 ऐवजी मिळणार फक्त सात गुण : खेळाडू, पालक, क्रीडा संघटनांकडून विरोध

संदीप गावडे / सिंधुदुर्गनगरी:

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी सीएम चषक क्रीडा स्पर्धा आयोजित करून राज्यातील 50 लाख तरुणांना मैदानावर उतरविल्याचा दावा केला आहे. दुसरीकडे याच राज्य सरकारने दहावी व बारावी परीक्षेसाठी खेळाडू विद्यार्थी, एनसीसी, स्काऊट गाईडमधील विद्यार्थ्यांना यापूर्वी मिळणाऱया 25 गुणांना कात्री लावली आहे. आता 25 ऐवजी फक्त सात गुणच मिळणार आहेत. शासनाचे हे क्रीडा धोरण खेळाडूंना पोषक ठरण्याऐवजी क्रीडा स्पर्धांपासून दूर नेणारे आहे.

2012 पासून दहावी व बारावीत नापास होणाऱया खेळाडू विद्यार्थ्यांनाच क्रीडा गुण सवलतीचा लाभ मिळत असल्याने खेळाबरोबर अभ्यासातही प्रगती करणाऱया खेळाडू विद्यार्थ्यांना डावलले जात असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त झाली. त्यामुळे 21 एप्रिल 2015 च्या शासन निर्णयाने यात बदल करण्यात आला व  खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा गुणांचा लाभ झाला. परंतु, त्यात पुन्हा बदल करण्यात आल्याने खेळाडूंच्या सहभागावर परिणाम होणार आहे.

क्रीडा क्षेत्रावर परिणाम होणार

दहावी व बारावीच्या परीक्षेसाठी खेळाडू विद्यार्थी, एनसीसी, स्काऊट-गाईड मधील विद्यार्थ्यांनी राज्यस्तरावर सहभाग घेणाऱया खेळाडूंना 10 गुण मिळत होते, ते आता सात मिळणार आहेत. राज्यस्तरावर सुवर्णपदक विजेत्यांना पूर्वी 25 गुण होते, ते आता सात मिळणार आहेत. राष्ट्रीय स्तरावर प्रावीण्य मिळवणाऱया खेळाडूंना 25 गुण पूर्वी होते, ते आता 10 गुणच मिळणार आहेत. शासनाने 20 डिसेंबर 2018 रोजी या संबंधीचा आदेश काढला आहे. त्यामुळे शासनाच्या या नव्या धोरणाचा क्रीडा क्षेत्रावर परिणाम होणार आहे.

एकाचवेळी अभ्यास, खेळाकडे लक्ष द्यावे लागणार

जी मुले खेळांत प्रावीण्य मिळवतात, त्यांना अभ्यासाकडे पुरेसे लक्ष देता येत नाही. अशांना या गुणांचा फायदा होत होता. परंतु, त्यांचे गुण कमी केल्याने मुलांना एकाचवेळी अभ्यास व खेळाकडेही लक्ष द्यावे लागणार आहे. त्याचा खेळाडूंवर ताण येणार आहे.

नवे धोरण खेळापासून दूर नेणारे

महाराष्ट्र राज्यातील खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकावेत, ऑलम्पिकमध्ये यश मिळवावे, या दृष्टीने राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सीएम चषक क्रीडा स्पर्धा राज्यात घेतल्या आणि या स्पर्धांच्या माध्यमातून 50 लाख तरुण-तरुणी मैदानावर उतरले. त्यामुळे भविष्यात यातीलच काही खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकू शकतात. परंतु, शासनाने नव्याने जाहीर केलेले क्रीडा धोरण पाहिले, तर खेळाडूंचा सहभाग क्रीडा स्पर्धांमधून वाढविण्याऐवजी क्रीडा स्पर्धांपासून खेळाडूंना दूर नेणारा आहे.

क्रीडामंत्र्यांची विसंगत विधाने

राज्यस्तरावर सहभाग घेणाऱया खेळाडूंना 10 गुण हेते, ते सात गुण झाले आणि सुवर्ण विजेत्या खेळाडूलाही पूर्वी 25 होते ते सात गुण केले असतील, तर खेळाडूंना स्पर्धांमध्ये सहभाग कसा काय घ्यायचा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सीएम चषक क्रीडा स्पर्धेच्या समारोप कार्यक्रमास राज्याचे क्रीडामंत्री विनोद तावडे सिंधुदुर्गात आले होते. त्यावेळी ते म्हणाले होते, राज्य शासनाने आता चांगले क्रीडा धोरण आखले आहे. नववी दहावीमधील विद्यार्थ्यांनी आपला अभ्यास बुडणार म्हणून खेळायचे थांबू नये. आपले शैक्षणिक नुकसान होणार नाही असे सांगत उपस्थितांकडून टाळय़ा मिळवल्या. परंतु, दुसरीकडे मात्र क्रीडा धोरणात खेळाडूंच्या गुणांना कात्री लावली. त्यामुळे क्रीडा मंत्र्यांचे भाषण विरोधाभासच ठरणार आहे.

क्रीडा धोरणाविरोधात मुख्यमंत्र्यांना भेटणार – नंदन वेंगुर्लेकर

शासनाचे नवे क्रीडा धोरण खेळाडूंना मारक ठरणार आहे. दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना खेळातील सहभागासाठी 25 गुण मिळत होते, ते आता कमी करून फक्त सात गुणच दिले जाणार आहेत. याचा आम्ही निषेध करीत असल्याची प्रतिक्रिया सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा समन्वय समितीचे अध्यक्ष नंदन वेंगुर्लेकर यांनी व्यक्त केली. जे विद्यार्थी खेळाडू असतात, त्यांना अभ्यासाला पुरेसा वेळ देता येत नसल्याने त्यांना दहावी-बारावीच्या परीक्षेत गुण दिले जातात. तसेच नोकर भरतीतही थेट पाच टक्के आरक्षण खेळाडूंना असते. परंतु शासनानेच यालाच कात्री लावली असेल, तर विद्यार्थी खेळाडू खेळामध्ये सहभाग घेणार कसा, असा हा प्रश्न आहे. सर्व खेळाडू पहिल्या तीनमध्ये येऊ शकत नाहीत. त्यामुळे राज्यस्तरावर सहभागी खेळाडूंना गुण दिलेच पाहिजेत, असे ते म्हणाले. दरम्यान, या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हय़ातील विविध 28 क्रीडा संघटनांच्या जिल्हा क्रीडा समन्वय समित्यांमार्फत 12 जानेवारीला सकाळी 10 वाजता कुडाळ येथील हॉटेल ‘कोकण स्पाईस’ येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला क्रीडा संघटनांचे पदाधिकारी, पंच, क्रीडा शिक्षक व क्रीडाप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहनही वेंगुर्लेकर यांनी केले आहे. या बैठकीनंतर राज्यातील सर्व संघटना मिळून शासनाविरोधात आवाज उठवणार असल्याचेही ते म्हणाले.