|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » कणकवलीची एक ‘ओळख’ पुसली गेली!

कणकवलीची एक ‘ओळख’ पुसली गेली! 

महामार्गावरील कित्येक वर्षांचा वटवृक्ष अखेर हटविला

प्रतिनिधी / कणकवली:

मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे सिंधुदुर्गातील काम सुरू झाले, तेव्हापासूनच कणकवली बस स्थानकानजीकचा कित्येक वर्षांचा महाकाय वटवृक्ष चर्चेत राहिला. जेसीबी काही क्षणात मोठ-मोठय़ा इमारती, वृक्ष भुईसपाट करीत होता. त्याचवेळी सोशल मीडियासह सर्वत्रच सहय़ाद्री हॉटेलसमोरील हा वटवृक्ष वाचविता येईल का, याचीच चर्चा सुरू होती. हा वटवृक्ष जाणार म्हणून लोक अक्षरश: हळहळ व्यक्त करीत होते. आठ दिवसांपूर्वी पारंपरिक 1 जानेवारीच्या सत्यनारायण पूजेचा अखेरचा प्रसाद या वटवृक्षाने घेतला अन् बुधवारी 9 जानेवारीला हाहा म्हणता हा वटवृक्ष धारातिर्थी पडला. कित्येक वर्षांची कणकवलीची एक ओळख पुसली गेली. या वटवृक्षावरील रात्री निवारा घेणारे पक्षी कुठे जातील, या प्रश्नानेही अनेकांच्या मनाची घालमेल झाली. वटवृक्ष नष्ट झाल्याने उजाड परिसर पाहताना वृक्षाच्या शीतल थंडावा देणाऱया आठवणीही सर्वांच्याच मनात दाटून आल्या.

महामार्ग चौपदरीकरणात सहय़ाद्री हॉटेलसमोरील वटवृक्ष वाचविण्यासाठी सर्वच स्तरातून प्रयत्न झाले होते. 1 जानेवारीपर्यंत वटवृक्षाला हात लावू नये, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार बाजूने सर्व्हिस रोड काढण्यात आला. अखेर 1 जानेवारीची सत्यनारायण पूजा झाल्यानंतर बुधवारी वटवृक्ष हटविण्यात आला. वटवृक्ष हटविल्याने अनेक पक्षांचे रात्रीचे निवासस्थान उद्ध्वस्त झाले.

सर्व पक्षियांनी हा वटवृक्ष वाचविण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, महामार्गात मध्येच हा वटवृक्ष येत असल्याने तो हटविण्यात येणार यावर शिक्कामोर्तब झाले होते. काही महिन्यांपूर्वी शहरातील नागरिकांनी एकत्र येत वटवृक्षाच्या आठवणीही जागृत केल्या होत्या. 

राज्यच नव्हे, तर देशभरातून कणकवलीत येणाऱया प्रवाशांना कुठे जायचे असल्यास, प्रवास करायचा असल्यास, लक्झरी पकडायची असल्यास अशा अनेक कामासाठी ‘लँडमार्क’ म्हणून ‘वडाखाली’ हा शब्द अनेकांच्या परवलीचाही झाला होता. मात्र, आता कणकवलीची ही ओळख पुसली गेली आहे.