|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » मोती तलावात पडलेल्या तरुणाला जीवदान

मोती तलावात पडलेल्या तरुणाला जीवदान 

सावंतवाडी:

 येथील मोती तलावाच्या काठावर बसलेल्या तरुणाचा तोल जाऊन पाण्यात पडला. तिघा तरुणांनी धाडस दाखवित त्याला सुखरुप बाहेर काढून जीवदान दिले. हा प्रकार बुधवारी सकाळी घडला. त्याला उपचारासाठी पोलिसांनी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. सदरचा तरुण चंदगड (महालेवाडी) येथील आहे, असे पोलिसांनी सांगितले. हा तरुण दोन दिवसापूर्वी सावंतवाडीत आला होता. तो एका इन्शुअरन्स कंपनीचा एजन्ट म्हणून काम करतो. त्या कामासाठी आल्याचे त्यानी पोलिसांना सांगितले. बुधवारी सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास हा तरुण तलावाच्या काठावर बसला असता अचानक तोल जाऊन तलावाच्या पाण्यात पडला. काही क्षणातच तेथे असलेले रतीश साटम, राजाराम धुरी, नेल्सन फेराव या तिघांनी धाडस दाखवित बांबूचा आधार देत सुखरुप बाहेर काढले. पोलिसांना माहिती देताच घटनास्थळी रमाकांत दळवी, वाहतूक पोलीस सखाराम भोई, प्रमोद काळसेकर यांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती स्थिर आहे. पोलिसानी त्याच्या नातेवाईकांशी संपर्क साधून माहिती दिली. नातेवाईक आल्यानंतर त्याला त्यांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.