|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » ‘महसूल’कडून दुरुस्तीच्या होडय़ा जाळण्याचा प्रयत्न!

‘महसूल’कडून दुरुस्तीच्या होडय़ा जाळण्याचा प्रयत्न! 

व्यावसायिक उल्हास नार्वेकर यांचा आरोप

प्रतिनिधी / मालवण:

मालवण तहसीलदार आणि त्यांचे पथक सध्या कर्ली खाडीत होडय़ा जाळण्याची करीत असलेली कारवाई अन्यायकारक आणि वाळू व्यावसायिकांवर दडपशाही करणारी आहे. नदीपात्रात दुरुस्तीसाठी उभ्या करून ठेवलेल्या होडय़ा जाळण्याचा प्रयत्न केला. तसेच काही होडय़ा जाळून स्थानिकांचे नुकसान तहसीलदारांनी केले, असा आरोप काळसे बागवाडी येथील बाळराजे फायबर्स आणि बोट बिल्डर्सचे मालक उल्हास नार्वेकर यांनी केला आहे. याप्रकरणी कायदेशीर बाबी तपासून लढा दिला जाईल, असेही नार्वेकर यांनी स्पष्ट केले आहे.

8 जानेवारी रोजी मालवण तहसीलदार समीर घारे यांच्या नेतृत्वाखाली महसूल पथकाने पोलीस बंदोबस्तात अनधिकृत वाळू उत्खननाविरोधात काळसे बागवाडी येथे कारवाई करून एक होडी जाळली. याबाबत नार्वेकर यांनी प्रसिद्धी पत्रक देऊन महसूलच्या कारवाईचा निषेध केला आहे. मालवण तहसीलदार आणि त्यांच्या पथकाने केलेली कारवाई अन्यायकारक आहे. गेल्या अनेक वर्षांपासून माझा व माझ्या कुटुंबियांचा बाळराजे फायबर्स आणि बोट बिल्डर्स हा फायबरच्या आणि लाकडी होडय़ा बांधण्याचा व्यवसाय आहे. हा कारखाना बागवाडी येथे कर्ली नदी किनारी आहे. या कारखान्यात दुरुस्तीसाठी आलेल्या होडय़ा नदीपात्रात उभ्या करून ठेवल्या होत्या. त्यापैकी दोन होडय़ा खातरजमा न करता जाळण्याचे आदेश तहसीलदार घारे यांनी कर्मचाऱयांना दिले परंतु दोन्ही होडय़ांमध्ये वाळू आढळली नाही तसेच आपण त्यांना या होडय़ा नोंदणी केलेल्या असून जून महिन्यात कारखान्यात दुरुस्तीसाठी आणून नदीपात्रात उभ्या केल्या होत्या. त्यासंबंधीचे कागदपत्र दाखविल्यानंतर त्या होडय़ा जळण्यापासून वाचल्या. परंतु त्यावेळी जर मी तेथे उपस्थित नसतो, तर लाखो रुपये किमतीच्या होडय़ा विनाकारण जाळल्या गेल्या असत्या. त्या नुकसानीची भरपाई महसूल विभागाने केली असती काय, असा सवालही नार्वेकर यांनी केला आहे.

 महसूल पथकाने बागवाडीतील शेतकरी श्रीकांत जावकर यांच्या मालकीची नदीच्या मधोमध असलेल्या जुवे बेटावर माडबागायत आणि शेतीच्या उद्देशाने ये-जा करण्यासाठी वापरण्यात येणारी होडी जाळली. कोणतीही खात्री न करता होडय़ा जाळणे म्हणजे दडपशाहीच आहे. अनधिकृत वाळू उत्खनन व वाहतूक करणाऱया वाळू व्यावसायिकांवर कारवाई करताना त्यात प्रामाणिकपणे वाळू व्यवसाय करणारे व्यावसायिक भरडले जाणार नाहीत, याची खबरदारी महसूलने घेणे आवश्यक होते, असेही त्यांनी म्हटले आहे.

लिलाव का रखडले?

ऑक्टोबरमध्ये वाळू लिलाव होणे अपेक्षित असताना अजूनही वाळू लिलाव न झाल्यामुळे जिल्हय़ात घर बांधणीसह अनेक विकासकामे रखडली आहेत. अधिकृत व प्रामाणिकपणे वाळू व्यवसाय करणाऱया बेरोजगार तरुणांवर उपासमारीची वेळ आली आहे. याची दखल महसूल अधिकारी का घेत नाहीत? का त्यांना फक्त होडय़ा जाळण्यात व बुडविण्यातच धन्यता वाटते? असेही नार्वेकरनी म्हटले आहे.