|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » उपद्रवी व्यक्तींमुळे मालवणातील बिअर बार असोसिएशन त्रस्त

उपद्रवी व्यक्तींमुळे मालवणातील बिअर बार असोसिएशन त्रस्त 

पोलीस अधीक्षकांकडे केली तक्रार : लिलाधर पराडकर व मित्रमंडळावर कारवाईची मागणी

प्रतिनिधी / मालवण:

लिलाधर पराडकर व त्याच्या मित्रमंडळींमुळे मालवणातील बार असोसिएशन त्रस्त असून त्यांना बिअर बारमध्ये प्रवेश बंदी व कायदेशीर कारवाईची तक्रार  पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी, उत्पादन शुल्क अधिकारी, पोलीस निरीक्षक यांच्याकडे तालुका बार असोसिएशनने केली आहे. याबाबतची माहिती हॉटेल कोणार्क येथे तालुका संघटनेतर्फे देण्यात आली.

दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्हा विदेशी मद्य विक्रेता संघाच्या मालवण शाखेच्या अध्यक्षपदी मंदार केणी यांची निवड करण्यात आली. संघटनेतर्फे त्यांचा ज्येष्ठ व्यावसायिक बाळा पारकर यांच्या हस्ते सत्कार झाला. संघटनेने अतिरिक्त पोलीस अधीक्षकांची भेट घेतल्यावर त्यांनी मालवणातील उपद्रवी व्यक्तींवर कारवाईचे आदेश पोलीस अधिकाऱयांना दिले आहेत, असेही संघटनेतर्फे सांगण्यात आले.

बार बंद करण्याची आली वेळ!

पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आलेल्या तक्रारीत संघटनेने म्हटले आहे, लिलाधर पराडकर व त्याच्या मित्रमंडळाकडून बार असोसिएशनला सातत्याने त्रास होत आहे. बार व्यावसायिक हे शासनाच्या नियमात व कायद्याशी अधीन राहून व्यवसाय करतात. मात्र, उपद्रवी मंडळी सातत्याने बारमध्ये येऊन मारहाण करणे, बारच्या कामगारांना मारणे, बिल न देणे असे प्रकार करीत आहेत. त्यामुळे व्यवसाय करणे कठीण झाले आहे. उपद्रवी व्यक्ती बारमध्ये आल्यानंतर इतर ग्राहक बारमध्ये बसत नाहीत. संबंधित व्यक्तींच्या त्रासाने शहरातील एक बारही बंद झाला आहे. संबंधितांकडून अनेकदा मारहाणीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे लोक तक्रार देण्यासही धजावत नाहीत. अशा व्यक्तींमुळे आमच्या व्यवसायाची वार्षिक फी भरणेही आम्हाला शक्य होत नाही. त्यामुळे सादर केलेल्या यादीप्रमाणे संबंधित व्यक्तींना बारमध्ये प्रवेश बंदी करून कायदेशीर कारवाई करावी. अन्यथा सर्व व्यावसायिक बार बंद आंदोलन छेडतील, असेही म्हटले आहे.

प्रवेश बंदीवर व्यावसायिक ठाम

उपद्रवी व्यक्तींना बारमध्ये प्रवेश देण्यास बार असोसिएशनने बंदी घातली आहे. तक्रार अर्जावर बार असोसिएशनच्या संतोष परब, पूनम खोत, गणेश पारकर, राजेश मालवणकर, नतालीन डान्टस, लीगोर डान्टस, अमित भगत, प्रशांत तोंडवळकर, माधवी केणी, संतोष शिरगावकर, भालचंद्र सामंत, सर्वेश पाटकर, संदीप पेडणेकर, विष्णू मोंडकर, मिलिंद पन्हाळकर या सदस्यांच्या सहय़ा आहेत. पत्रकार परिषदेत नगरसेवक मंदार केणी, शेखर गाड, नगरसेवक यतीन खोत, सॅबी डान्टस, विवेक पारकर, अवि सामंत, राजू आचरेकर, प्रशांत वराडकर व अन्य सदस्य उपस्थित होते.