|Monday, July 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » भारतीय रेल्वेने मिळविले मोठे यश

भारतीय रेल्वेने मिळविले मोठे यश 

मानवरहित रेल्वे फाटकांपासून भारत झाला मुक्त

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारतीय रेल्वेने आणखी एक अजोड कामगिरी करून दाखविली आहे. जगाच्या सर्वात मोठय़ा रेल्वेजाळय़ांपैकी एक असलेली भारतीय रेल्वे आता मानवरहित रेल्वे फाटकांपासून (अनमॅन्ड लेव्हल क्रॉसिंग) मुक्त झाली आहे. रेल्वेचा मुख्य मार्ग म्हणजेच गेजवर आता एकही मानवरहित फाटक शिल्लक राहिलेले नाही. मागील एक वर्षत रेल्वेने देशभरात 3500 मानवरहित रेल्वेफाटकांचे अस्तित्व संपुष्टात आणले आहे. रेल्वेने मिळविलेले यश हे उल्लेखनीय असून यामुळे सुरक्षित प्रवासाचे उद्दिष्ट प्राप्त होण्यास मोठी मदत होणार आहे. मोदी सरकारने रेल्वेक्षेत्रात अनेक सुधारणा घडवून आणल्या असून त्याचे चांगले परिणाम देखील दिसून येत आहेत. रेल्वेमार्गांचे दुपदरीकरण, विद्युतीकरण, नव्या रेल्वेगाडय़ांचा वापर, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश इत्यादी गोष्टींमुळे रेल्वेप्रवासाचा दर्जा वाढल्याचे जाणकारांचे मानणे आहे.मानवरहित रेल्वेफाटक हटविण्यासाठी प्रामुख्याने चार पद्धती अवलंबिण्यात आल्या आहेत. ज्या ठिकाणी कमी प्रमाणात रेल्वेगाडय़ांची ये-जा व्हायची अशी फाटकेच बंद करण्यात आली आहेत. याचबरोबर अनेक ठिकाणी एक लेव्हल क्रॉसिंग बंद करून रस्त्याची निर्मिती करून त्याला दुसऱया रस्त्याशी जोडण्यात आले आहे. अनेक ठिकाणी सबवे, रस्ते किंवा भूमिगत सेतू निर्माण करण्यात आले असून मानवरहित फाटकांवर सुरक्षा रक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे.

केवळ एक ठिकाण शिल्लक 

रेल्वेनुसार मुख्य मार्ग म्हणजेच गेजवर आता केवळ एक मानवरहित क्रॉसिंग उत्तरप्रदेशच्या अलाहाबाद विभागात असून तेथे स्थानिक प्रशासनाने ते हटविण्याची अद्याप मंजुरी दिलेली नाहीत. परंतु चालू आर्थिक वर्षातच हे काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

दुर्घटनांचे प्रमाण घटले

रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी 2018-19 च्या डिसेंबरपर्यंत रेल्वेची सर्व मानवरहित क्रॉसिंग संपविण्याचे लक्ष्य बाळगले होते. अशा क्रॉसिंगवरील दुर्घटना रोखल्या जाव्यात याकरता सरकारने हा पुढाकार घेतला होता. 2014 मध्ये रेल्वेच्या ब्रॉडगेजर सुमारे 5500 मानवरहित क्रॉसिंग होते. 2013-14 मध्ये मानवरहित रेल्वे क्रॉसिंगवर 118 दुर्घटना झाल्या होत्या. तर 2017-18 मध्ये हे प्रमाण कमी होत 20 वर आले होते. तर चालू वर्षात आतापर्यंत केवळ 3 दुर्घटना मानवरहित क्रॉसिंगवर झाल्या आहेत. रेल्वेने मानवरहित क्रॉसिंगवर होणाऱया दुर्घटना रोखण्यास मोठे यश प्राप्त केल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होते.