|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » मुद्रक, प्रकाशकाचे नाव फलकांवर बंधनकारक!

मुद्रक, प्रकाशकाचे नाव फलकांवर बंधनकारक! 

चिपळूण

शहरात बेकायदा फलकबाजीवर न्यायालयाने ताशेरे ओढत गुन्हे दाखल करण्याचे दिलेले आदेश व त्यानंतर दाखल झालेले गुन्हे यातून धडा घेत बेकायदा फलकांना आळा घालण्यासाठी चिपळूण नगरपरिषदेने नवी नियमावली तयार केली आहे. यापुढे प्रत्येक फलकावर मुद्रक आणि प्रकाशकाचे नाव  बंधनकारक असून परवानगी न घेता फलक उभारल्यास प्रकाशकासह मुद्रकावर कारवाई केली जाणार आहे.

 शहरातील मुख्य चौक आणि वर्दळीच्या ठिकाणी बिनधास्तपणे लावण्यात येणाऱया फलकांमुळे शहरांचे विद्रुपीकरण होत असल्याने उच्च न्यायालयाने फलक लावण्यावर बंदी घातली आहे. मात्र तरीदेखील शहरातील मोक्याच्या जागेत काही व्यावसायिक, राजकीय नेते आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून फलकबाजी सुरू आहे. नगर परिषदेकडून फलक लावण्यासाठी शुल्क आकारून परवानगी दिली जाते. मात्र अनेक फलक विनापरवानाच लावले जातात. त्यामुळे अधूनमधून नगरपरिषद प्रशासन फलक जप्त करण्याची मोहीम राबवते.

गेल्याच आठवडय़ात चक्क न्यायालयाच्या फलकावरच फलक लावण्यापर्यंत राजकीय मजल गेल्यानंतर याची गंभीर दखल घेत येथील न्यायाधिशांनी मुख्याधिकाऱयांना बोलावून असे फलक लावणाऱयांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार 18 जणांवर येथील पोलीस स्थानकात गुन्हे दाखल केले आहेत.

दरम्यान, न्यायालयाने केलेल्या सूचना, त्यानंतर दाखल झालेले गुन्हे यातून धडा घेत नगरपरिषदेने यापुढे आपल्या हद्दीत फलक उभारणाऱयांसाठी नवीन नियमावली तयार केली आहे. यामध्ये यापुढे फलकावर मुद्रक व प्रकाशकाचे नाव बंधनकारक केलेले आहे. या नियमावलीचे उल्लंघन करणाऱया मुद्रकांना थेट कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे यापुढे परवानगी नसल्यास प्रकाशकाबरोबर मुद्रकावरही कारवाई होणार आहे. मुख्याधिकरी वैभव विधाते यांनी याबाबत कार्यवाहीच्या सूचना कर्मचाऱयांना केल्या आहेत.