|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » सावर्डे, कोंडमळा परिसरात चार भुयारी मार्ग मंजूर!

सावर्डे, कोंडमळा परिसरात चार भुयारी मार्ग मंजूर! 

प्रतिनिधी/ चिपळूण

   मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या आराखडय़ात कोणताही बदल होणार नसल्याचे सांगून स्थानिकांच्या मागण्या फेटाळून लावणाऱया राष्ट्रीय महामार्ग विभागाने अखेर नमते घेतले आहे. दाट लोकवस्ती आणि स्थानिकांचे हित याला प्राधान्य देत आराखडय़ात बदल करण्यात आला आहे. त्यानुसार आता सावर्डे, वहाळ फाटा, कोंडमळा आणि आगवे येथे पाईप ऐवजी आयताकृती भुयारी मार्गाला मुंबईत झालेल्या बैठकीत तत्वतः मंजुरी मिळाली आहे.

  जिल्ह्य़ात कशेडीपासून चौपदरीकरणाला सुरूवात झाल्यानंतर अनेक ठिकाणाहून वेगवेगळे बदल सुचवण्यात आले. त्यामध्ये उड्डाणपूल, बोगदे, सर्व्हिस रोड, अंडरपास, पर्यायी मार्ग यासाठी मागण्यांसह दुरूस्त्या सुचवण्यात आल्या. या मागण्यांसाठी मोर्चे, आंदोलने, राजकीय नेत्यांबरोबर बैठका झाल्या. मात्र केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाकडून आराखडय़ात बदल करण्याच्यादृष्टीने कोणत्याच हालचाली दिसत नव्हत्या.

  चिपळूणमध्ये उड्डाणपुलाची लांबी वाढवण्याबरोबरच, अंडर पास तसेच सावर्डेत एक खांबावरील उड्डाणपूल होण्याच्यादृष्टीने मागणी करण्यात आली. सावर्डेसह कोंडमळा, आगवे येथील दाट लोकवस्तीचा विचार करून पर्यायी मार्गाची मागणी पंचायत समिती सभापती पूजा निकम यांच्या माध्यमातून येथील ग्रामस्थांनी केली होती. अखेर मुंबईत 4 जानेवारी रोजी झालेल्या बैठकीत सावर्डे परिसरात आयताकृती भुयारी मार्गाला तत्वतः मंजुरी देताना अंदाजपत्रक सादर करण्याच्या सूचना चेतक कंपनीला दिल्या आहेत.

 चिपळूणहून रत्नागिरीकडे जाताना कामथे घाट उतरल्यानंतर लागणाऱया कोंडमळा गावात रस्त्याशेजारी दाट लोकवस्ती असूनही प्रस्तावित केलेले भुयारी मार्ग भलत्याच ठिकाणी ठेवले गेल्याने नाराजी होती. ग्रामपंचायत अथवा ग्रामस्थांना विश्वासात न घेता केलेल्या या बदलाबाबत ग्रामस्थांनी पंचायत समिती सभापती निकम यांच्याकडे कैफियत मांडली होती. त्यानंतर त्यांनी दिलेले निवेदन आणि केलेल्या पाठपुराव्यानंतर महामार्ग विभागाने आता कोंडमळा निवाचीवाडी, घाणेकरवाडी, आगवे ग्रामपंचायत समोर आणि वहाळ फाटय़ाजवळील महावितरण उपकेंद्रासमोर बारा फूट रूंद आणि आठ फूट उंचीचे आयताकृती भुयारी मार्ग मंजूर केले आहेत.

पाठपुराव्याला यश : निकम

सावर्डे, कोंडमळा परिसरात चौपदरीकरण करताना ग्रामपंचायत अथवा ग्रामस्थांना विश्वासात न घेता बदल केले. याचा ग्रामस्थांना कोणताच फायदा नव्हता. आपण ग्रामस्थांच्या मदतीने सातत्याने या प्रश्नासाठी पाठपुरावा केला. त्याला आज यश आले आहे.