|Sunday, June 16, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » मित्र धर्म पाळायचा कोणी?

मित्र धर्म पाळायचा कोणी? 

राजकीय पक्षांना आता लोकसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. कर्नाटकातील युती सरकारला घरघर लागणार याची लक्षणे दिसून येत आहेत. मित्रधर्म कोणी पाळायचा या मुद्दय़ावरही सध्या चर्चा रंगली आहे.

 

राजकीय पक्षांना आता लोकसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. एप्रिल अखेर व मे महिन्याच्या पहिल्या पंधरवडय़ात देशभरात या निवडणुका होतील असे संकेत आहेत. त्यामुळे कर्नाटकातील प्रमुख राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कर्नाटकातील काँग्रेस-निजद युतीमध्ये महामंडळांवरील नियुक्त्यांवरून मतभेद वाढले आहेत. याबरोबरच माजी पंतप्रधान  देवेगौडा यांनी 28 पैकी किमान 12 जागा काँग्रेसने निजदला सोडून द्याक्यात, अशी मागणी केली आहे. गेले सहा महिने युती सरकारमध्ये सहभागी असलेले नेते आपल्याच सरकार विरुद्ध उघडपणे टीका करणे टाळत होते. आता काँग्रेस निजद नेते एकमेकांवर कुरघोडय़ा करू लागले आहेत. प्रदेश काँग्रेस अध्यक्ष दिनेश गुंडूराव व सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री एच. डी. रेवण्णा यांच्यात तर चांगलीच जुंपली आहे. काँग्रेसने आपल्या पक्षावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करू नये उलट काँग्रेस आमदारांवर लक्ष ठेवा, असा सल्ला एच. डी. रेवण्णा यांनी काँग्रेस नेत्यांना दिला आहे. युती सरकार स्थापन करताना काँग्रेसकडून कोणत्याही अटी नक्हत्या. आता सरकारने सहा महिने पूर्ण केल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी एक एक करत अटी लादण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळेच निजदचे सर्वेसर्वा एच. डी. देवेगौडा यांनी काँग्रेस नेतृत्वाविरुद्ध उघडपणे टीका करण्यास सुरुवात केली आहे.

38 संख्याबळ असलेला निजद कोणाबरोबरही युती करण्यास स्वतंत्र आहे, असा संदेशच निजद नेत्यांनी काँग्रेस नेतृत्वाला दिला आहे. कारण युती सरकार अस्थिर करण्यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून देव पाण्यात घातलेल्या भाजपबरोबर जर निजदने घरोबा केला तर काँग्रेसच्या बाबतीत लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर बसणारा तो मोठा धक्का असणार आहे. सद्य परिस्थितीत निजद कोणताही निर्णय घेऊ शकतो. जर निजदने काँग्रेसबरोबरची युती तोडली तर भाजपबरोबर घरोबा करण्यास त्यांचा मार्ग मोकळा होणार आहे. भाजपलाही ऑपरेशन कमळ राबवून देशाच्या राजकीय पटलावर होणारी पक्षाची बदनामी टाळता येणार आहे. जर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतलीच तर निजदचा मार्ग नव्या युतीसाठी मोकळा होणार आहे. याची कल्पना असल्यामुळेच काँग्रेसचे राष्ट्रीय नेतृत्व निजद नेतृत्वाबद्दल सौम्य झाले आहे. राज्यातील काँग्रेस नेते मात्र निजद विरुद्ध आगपाखड करीत आहेत. आम्ही जर निजदबरोबरच राहिलो तर भविष्यात पक्षाच्या अस्तित्वाला धक्का पोहोचणार याची स्थानिक नेत्यांना भीती वाटते. त्यामुळेच प्रदेश काँग्रेस अध्यक्षांसह बहुतेक नेते आक्रमक बनले असले तरी भाजपच्या विरोधात देशाच्या राजकारणात होऊ घातलेल्या महागठबंधनचा विचार करून राहुल गांधी यांनी सौम्य धोरण स्वीकारले आहे. राष्ट्रीय नेतृत्वांने घेतलेले हे सौम्य धोरणच काँग्रेसला राज्य राजकारणात अडचणीचे ठरू लागले आहे.

या कुरघोडीच्या राजकारणाचा एक भाग म्हणून मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी महामंडळावरील नियुक्त्यांची यादी रोखून धरली होती. सरकारचे दिल्ली प्रतिनिधी म्हणून माजी मुख्यमंत्री एन. धरमसिंग यांचे चिरंजीव अजय सिंग यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. काँग्रेसने यादी जाहीर केल्यानंतरही मुख्यमंत्र्यांनी या यादीवर स्वाक्षऱया केल्या नाहीत. कारण मुख्यमंत्री निजदचा आहे. ज्या पक्षाचा मुख्यमंत्री असतो, दिल्लीत त्याच पक्षाचा प्रतिनिधी असावा लागतो. कारण मुख्यमंत्री दिल्लीतील आपल्या कामकाजासाठी दिल्ली प्रतिनिधींवर विसंबून असतात. हा अलिखित नियम आहे. असे असताना काँग्रेस आमदाराच्या खांद्यावर दिल्ली प्रतिनिधीची जबाबदारी सोपविणे कितपत योग्य ठरणार आहे असा प्रश्न उपस्थित करून दिल्ली प्रतिनिधींबरोबरच आणखी काही नियुक्त्या मुख्यमंत्र्यांनी रोखून धरल्या आहेत. यामुळे असंतुष्ट काँग्रेस आमदारांनी एक बैठक घेऊन आपल्या मनातील खदखद बोलून दाखविली आहे. समन्वय समितीचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या समोरही असंतुष्ट आमदारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अलीकडेच मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी नवी दिल्ली येथे पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांच्या वागण्या बोलण्यात बदल झाला आहे, असा संशय काँग्रेस आमदारांनी व्यक्त केला आहे.

एकीकडे महामंडळावरील नियुक्त्यांवरून युती सरकारमध्ये सहभागी असलेल्या मित्र पक्षामधील संबंध ताणलेले असतानाच मागासवर्गीय कल्याण मंत्री सी. पुट्टरंग शेट्टी यांच्या स्वीय सहाय्यकाकडून विधानसभेच्या पश्चिम प्रवेशद्वारावर पोलिसांनी 25 लाख 76 हजार रु.  रोकड असलेली बॅग ताब्यात घेतली आहे. बॅगमधील पैशाच्या पाकिटावर मंत्री पुट्टरंगशेट्टी यांचे नाव लिहिले होते. मंत्र्यांचा स्वीय सहाय्यक मोहन याला पोलिसांनी अटक केली आहे. यावरून विधानसौधमधील भ्रष्टाचार पुन्हा एकदा चव्हाटय़ावर आला आहे. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपने या मुद्दय़ावरून युती सरकार विरोधात टीकेची झोड उठविली आहे. सुरुवातीला काँग्रेस नेतृत्वाने पुट्टरंग शेट्टी यांचे समर्थनच केले. आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर या प्रकरणामुळे पक्षाची प्रतिमा डागळणार हे लक्षात येताच मंत्री पट्टरंग शेट्टी यांना मंत्रीपदावरून हटविण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यांनी राजीनामा द्यावा, यासाठी दबाव वाढला आहे. युती सरकारमधील मंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकाकडे सापडलेली मोठी रक्कम कोणाची आहे, याचा तपास सुरू आहे. महामंडळावरील नियुक्त्या, आगामी लोकसभा निवडणुकीतील जागा वाटप व मंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकाकडे सापडलेली बेनामी रक्कम आदी मुद्दय़ांवरून राजकीय घडामोडी गतिमान झाल्या आहेत. आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी कर्नाटकातील राजकारणात थेट हस्तक्षेप करीत लोकसभा निवडणुकीच्या आधी कर्नाटकात भाजपची सत्ता स्थापन करता येते का याची चाचपणी सुरू केली आहे. मंत्री डी. के. शिवकुमार यांच्यावरील प्राप्तीकर खात्याची कारवाईही तीव्र झाली आहे. दोन दिवसांपूर्वीच येडियुराप्पा यांनी अमित शाह यांची भेट घेतली. येडियुराप्पा शिवकुमार एकाच विमानातून नवी दिल्लीला रवाना झाल्याची माहितीही मिळाली आहे. युती सरकारला घरघर लागणार याची लक्षणे दिसून येत आहेत. मित्रधर्म कोणी पाळायचा या मुद्दय़ावरही सध्या चर्चा रंगली आहे.