|Thursday, July 18, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » ऐकें परीक्षिती प्रेम तिचें

ऐकें परीक्षिती प्रेम तिचें 

नंदबाबा उद्धवाला पुढे म्हणाले-उद्धवा! माझा कान्हा परत केव्हा येईल? मी त्याचा असा कोणता अपराध केला आहे की ज्यामुळे तो रुसून बसला आहे? उद्धवा! वसुदेवांना सांगा की कन्हैया त्यांचाच मुलगा आहे. मी तर त्यांचा दास आहे. कृष्णाला सांगा की त्याची आई साऱया दिवसभर रडत असते. तो जेव्हा येथे होता तेव्हा आईची समजूत घालीत असे. आता तिची समजूत कोण घालील? नंद इतके बोलता बोलता व्याकुळ होऊन
गेले.

उद्धवांना काय करावे सुचेना! मी यांना काय उपदेश द्यावा? यांना तर जिकडे तिकडे कृष्णच दिसत आहे. पाळण्यात, घरात, वनात, अंगणात, यमुनाकिनारी, कदंबाच्या डहाळीवर, जिकडे तिकडे कृष्णाचेच दर्शन करीत असतात हे नंदबाबा! ब्रह्माच्या सर्वव्यापकतेचा उपदेश होऊनही मला आजपर्यंत असा अनुभव आला नाही. अशी ब्रह्मनि÷ा असलेल्या नंदांना मी काय उपदेश देऊ? ते नंदांना मनोमन म्हणाले-बाबा! धन्य आहात तुम्ही! आपले जीवन सफल होऊन गेले आहे. आपण कृष्णमय झालेले आहात.

इतक्मयात तेथे यशोदा येऊन पोचली. ती उद्धवांना म्हणाली-उद्धवा! खरं खरं सांगा, माझा बाळकृष्ण खुशाल आहे ना? तो जेवायच्या वेळी खूप हट्ट करीत असे. तो दुबळा तर नाही झाला ना? तो आनंदात आहे ना? माझी कधीतरी तो आठवण काढतो का? त्याची तेथे कोण मनधरणी करीत असेल? गोकुळात होता तेव्हा तो माझे अश्रू पाहू शकत नव्हता. तो माझे सांत्वन करीत असे. माझी समजूत घालीत असे. जेव्हा मी यमुनेला जाते तेव्हा तिचा श्यामरंग मला कन्हैयाची आठवण करून देतो. मला असे वाटते, की आताच तो यमुनेच्या पाण्यातून बाहेर येऊन माझ्या कुशीत बसला आहे. पण पुन्हा पाहते तर तो तिथे नाही. त्याला विचारा कीं त्याच्या आईने असा कोणता अपराध केला आहे की तो येथे येण्याचे नावही काढीत
नाही.

मी एकदा त्याला मुसळाला बांधून ठेवले होते, त्याकरता रूसला नाही ना? त्याला कधी माझी आठवण तर येते का? मी त्याची आई तर नाहीच. त्याची आई देवकी आहे. देवकीला सांगा की सेविकेची आवश्यकता असली तर मला बोलावून घे. कृष्णविरहात आमचे प्राण तळमळत आहेत. तो जिथे असेल तिथे आम्हाला न्याल तर भगवान तुमचे कल्याण करील. मी नारायणाची प्रार्थना करते की वाटल्यास तो येथे न येवो पण जिथे कुठे तो असेल तिथे तो सुखी राहो!

उद्धव म्हणाले-माते! श्रीकृष्ण तुम्हा सर्वांची वारंवार आठवण करीत असतात. ते स्वतःच येथे येणार होते. परंतु मथुरेचे शासन त्यांनी सांभाळले आहे म्हणून त्यांना सवडच होत नाही. मला म्हणाले-मी मथुरेत येऊन या कारभारात गढून गेलो आहे, तू आईला माझी खुशाली कळवून ये. म्हणून मी तातडीने इथे त्यांचा निरोप द्यायला आलो.