|Sunday, June 16, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » ‘सुभाषित रस’ आगळाच!

‘सुभाषित रस’ आगळाच! 

सुभाषित- नायं प्रयाति विकृतिं विरसो न यः स्यात्

न क्षीयते बहुजनैर्नितरां निपीतः।

जाडय़ं निहन्ति रुचिमेति करोति तृप्तिम्

नूनं सुभाषित रसो ।़ न्यरसातिशायी ।।

अन्वय- अयं ( सुभाषित रसः) विकृतिं न प्रयाति । (सः तादृशः)

यः विरसः न स्यात् । (अयं) बहुजनैः नितरां निपीतः (अपि)

न क्षीयते । (स च) जाडय़ं निहन्ति, रुचिम् एति (तथा)

तृप्तिं करोति । नूनं, सुभाषितरसः अन्यरसातिशायी (अस्ति) ।

अनुवाद- सुभाषितरस (आगळाच आहे कारण) हा (कधीच) बिघडत नाही. त्याची गोडी कमी होत नाही. अनेक लोकांनी आकंठ प्राशन केले तरी तो संपत नाही. तो प्राशन करणाऱयांचे जाडय़ (मंदपणा) दूर करतो. त्यांच्यामध्ये रूची निर्माण करतो आणि त्यांना तृप्त करतो. खरोखर सुभाषितरस हा इतर रसांपेक्षा उजवा आहे.

विवेचन- या सुभाषितामध्ये सुभाषिताचेच महत्त्व वर्णन केलेले आहे. आपणास काव्यातील शृंगार वीर, करुण, अद्भूत, हास्य, भयानक, बीभत्स, रौद्र आणि शांत हे नवरस माहीत आहेत. परंतु सुभाषितरस हा त्यांच्याहून वेगळा आणि वरचढ आहे असे इथे मांडले आहे. इतर रस बिघडू शकतात, त्यातील गोडी कमीही होऊ शकते. पेये रस तर खूप लोकांनी प्राशन केले तर संपू शकतात. काही रसांनी सुस्तीही येते! त्यांचा कंटाळा येऊ शकतो. काहीवेळा त्या रसांनी समाधानही होत नाही. परंतु सुभाषितरस मात्र इथे सांगितल्याप्रमाणे, बिघडत नाही, संपत नाही. बेचव होत नाही. मंदपणा देत नाही, रूची वाढवितो आणि रसिकांची तृप्तीही करतो! याचे कारण काय बरे असावे? यासाठी सुभाषित म्हणजे काय हे प्रथम पहावे लागेल. सु-भाषित म्हणजे चांगले वचन. मार्मिक वचन. सुंदर अर्थपूर्ण विचार, सुंदर शब्दात करणारी उक्ती म्हणजे सक्ती किंवा सुभाषित.

संस्कृत ही प्राचीन आणि अत्यंत समृद्ध अशी वैशिष्टय़पूर्ण भाषा आहे आणि तिच्या वैशिष्टय़ांमध्ये असंख्य सुभाषित आहेत, त्यापैकी हे एक आहे. सुभाषितांना विषयांचे बंधन नसते. विद्या, धन, दारिद्रय़, सज्जन, दुर्जन, सद्गुण, दुर्गुण स्वभाव, शील, विद्वत्ता, मूर्खपणा, औदार्य, कंजूषपणा, उद्योगीपणा, आळस, परोपकार, दैव, आशा याचना, क्रोध, तेजस्वीपणा, क्षुद्रपणा, अशा असंख्य विषयांवर असंख्य सुभाषिते आपणास संस्कृत भाषेत आढळतात. सुभाषिते, एकीकडे जीवनातील शाश्वत सिद्धांत सोप्या भाषेत, व्यवहारातील उदाहरणे देऊन  मांडतात तर दुसरीकडे मनुष्य स्वभावातील व घटनातील विसंगती विनोदी पद्धतीने दाखवून तुम्हाला अंतर्मुख करतात तर तिसरीकडे प्रखर व्यावहारिक सत्य उपहासगर्भ शैलीत सांगून तुम्हाला चिमटाही काढतात. काही वेळा एखाद्या कोडय़ाच्या रूपाने येऊन तुमच्या बुद्धीला चालनाही देतात, पण तुम्हाला आनंदच देतात म्हणूनच म्हटले आहे की सुभाषितरस हा आगळाच आहे.                          

(समाप्त)