|Monday, June 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » महामार्ग चौपदरीकरणातील कंत्राटे स्थानिक नेत्यांकडे!

महामार्ग चौपदरीकरणातील कंत्राटे स्थानिक नेत्यांकडे! 

प्रतिनिधी /चिपळूण :

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम रखडलेले असताना एकही लोकप्रतिनिधी अथवा स्थानिक राजकारणी चकार शब्दही काढत नसल्याने जनतेत आश्चर्य व्यक्त होत आहे. राजकीय नेते, लोकप्रतिनिधांना मिळालेली या कामातील कंत्राटे हे त्यामागील खरे कारण असल्याचे पुढे आले आहे. महामार्ग चौपदरीकरणात जमीन, डोंगर खोदकामासह पाणी पुरवठा, वीज वाहिनी स्थलांतर ते अगदी बारदाने पुरवण्यापर्यंतच्या बहुतांशी कामे राजकीय नेतेमंडळींनी मिळवल्याचे समजते.

  चौपदरीकरणात जिल्हय़ातील खेड तालुक्याचा टप्पा वगळता उर्वरित सर्वच टप्प्यातील कामे रखडली आहेत. खेड टप्प्यात 15 ते वीस कि.मी.चे चौपदरीकरण पूर्ण झाले असतानाही चिपळूण टप्प्यात केवळ कॉंक्रीटचा प्रारंभ झाला आहे. या टप्प्यात चेतक कंपनीला कामाची गती राखता आलेली नाही. खेरशेत, कोंडमळा, कापसाळ, वालोपेसह अन्य काही भागातील सपाटीकरणाचे काम सोडल्यास कुठे यंत्रणाच फारशी काम करताना दिसत नाही.

  या टप्प्यात शहरासह परशुराम, पेढे, वालोपे, कळंबस्ते, कापसाळ, कामथे, कामथे खुर्द, कोंडमळा, सावर्डे, कासारवाडी, आगवे, असुर्डे आणि खेरशेत या तेरा गावांमधून महामार्ग जातो. वाशिष्ठीसह रेल्वे पुलांची कामे थांबलेली आहेत. शहरात मोठा उड्डाण पूल होणार आहे. एकूणच सारी ठप्प झालेली आणि धिम्यागतीने सुरू असलेल्या कामांमुळे या टप्प्यातील चौपदरीकरणाला किती काळ लागेल, हे सांगता येत नाही. त्यातच चौपदरीकरणात ग्रामस्थांनी काही बदल सूचवले आहेत. राजकारण्यांनीही तशी आश्वासने दिली आहेत. मात्र या रखडलेल्या कामांबाबत  एकही राजकीय पक्ष अथवा लोकप्रतिनिधी चकार शब्द काढताना दिसत नाहीत.