|Sunday, June 16, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » …पालक सजग का नाहीत ?

…पालक सजग का नाहीत ? 

आपण आपल्या मुलांकडे किती लक्ष देतो हा प्रश्न आताच्या काळात प्रत्येक पालकाला विचार करायला लावणारा ठरला आहे. कारणही तसेच आहे; लहान मुलांच्या मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येते. यामध्ये अपघात असू दे किंवा आजारपण किंवा अत्याचार-अंधश्रद्धेचे बळी! आज आपल्या देशात बालमृत्यूचे प्रमाण म्हणजे अल्पवयीन (साधारण 1 ते 10 वर्षे) मुलांच्या मृत्यू होण्याच्या घटना वाढल्या आहेत.

मुख्य म्हणजे लहान मुलांच्या मृत्यूच्या घटना या सर्व स्तरातून पहायला मिळतात. यात गरीब असो किंवा श्रीमंत! एकंदरीत अभ्यास केल्यास आजच्या काळात पालकांना आपल्या मुलांकडे पाहण्यासाठी वेळ नसतो. आई-वडील दोघेही नोकरीच्या उद्देशाने बाहेर गेले की, एकतर लहान मुलांना त्यांचे आजी-आजोबा, आया किंवा पाळणाघरे सांभाळतात. आपले मूल घरी सुरक्षित तर आहे ना, असा प्रश्न फार कमी जणांनाच पडत असेल. कारण, हे आई-वडिलही आपल्या दैनंदिन कामात एवढे गुरफटून गेलेले असतात की, त्यांना संध्याकाळी घरी गेल्यावर आपल्या मुलांची आठवण येते.

आज, मनुष्य प्रत्येक क्षेत्रात प्रगती करतो आहे, अगदी ‘नासा’ यान अंतराळातील आपली आजवरील सर्वात लांब कक्षा पार करून गेले आहे. पण, एकीकडे प्रगती होत असताना म्हणजे समाजात सकारात्मक घटना घडत असताना दिवसेंदिवस दुर्घटना, अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. भारतात दर दिवसा किती दुर्घटना किंवा अत्याचाराच्या घटना घडत असतील, याचे गणित मांडणेही शक्य होणार नाही. आज आपल्या मुलांकडे पहायला आपल्याला वेळ नाही किंवा आपले मूल काय करते याकडे दुर्लक्ष होत आहे. आपण हे दुर्लक्ष जाणून बुजून करत नाही, हे मान्य असले तरी याबाबतीत जरा आळस झटकायला हवाच! देशात लहान मुलांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत चालले आहे. मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, पुणे, बेंगळूर या मेट्रो शहरांमध्येही दररोज लहान मुले दगावणे किंवा अपघात, अत्याचाराचे बळी पडल्याच्या घटना समोर येत आहेत.

मागील आठवडय़ात शनिवारी मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या वसई पूर्व येथे सात मजली टॉवरच्या लिफ्टमध्ये अडकून एका सात वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. अंशकुमार गौड असे दुर्दैवी मुलाचे नाव. शनिवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास अंशकुमार हा भाऊ ईशानकुमार व अन्य मित्रांसोबत सोसायटी परिसरात खेळायला गेला होता. खेळून झाल्यावर पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी लिफ्टचे दार उघडून आत जात असताना अचानक लिफ्ट सुरू झाली. लिफ्ट आणि भिंत यामधील मोकळय़ा जागेत अंशकुमार अडकला गेला. अंशचे डोके आणि पोट पूर्णपणे चेपले गेल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी विकासकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. अंशचे कुटुंब ज्या डायस रेसिडेन्सीमध्ये राहत होते त्याची लिफ्ट काही दिवसांपासून नादुरुस्त होती. मात्र, तब्बल सहा वर्षे झाली तरी सोसायटीने दुरुस्त केलीच नाही. याबाबत रेसिडन्सी बांधणाऱया डायस ब्रदर्स या विकासकाला वारंवार सांगूनही लिफ्टच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात आले. या घटनेच्या दुसऱया भागाचा अभ्यास केल्यास आपला लहान मुलगा बाहेर खेळायला गेला आहे, त्याच्यावर लक्ष ठेवायला घरातील कोणतीही व्यक्ती  नव्हती. म्हणजेच या दुर्घटनेला डायस ब्रदर्स या विकासकाला जबाबदार ठरविण्यात आले, तसेच त्या मुलाचे पालकही या दुर्घटनेला जबाबदार असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. आजच्या धकाधकीच्या काळात बऱयाच जणांना आपल्या कुटुंबाकडे पाहणेही कठीण होऊन बसले आहे हे सत्य आहे. पण, अशा दुर्घटना घडून आपल्या कुटुंबातील एक सदस्य निघून जातो; त्यावेळी पश्चाताप करण्याशिवाय गत्यंतर नसते. म्हणजे शनिवार सुटीचा दिवस असूनही आपले लहान मूल काय करते, कुठे जाते याकडे पालकांना लक्ष ठेवण्यासही वेळ नसतो. हा एक हलगर्जीपणाच मानावा लागेल. जन्माला घातल्यापासून त्या मुलाला मोठे करेपर्यंत आई-वडिलांना बरेच कष्ट घ्यावे लागतात. पण, केवळ एका चुकीमुळे आपण आपल्या मुलांना गमावून बसतो, हे समोर येते. वसईतील या दुर्घटनेनंतर त्या इमारतीच्या विकासकाला जबाबदार ठरविण्यात आले. पण, मागील सहा वर्षे इमारतीची लिफ्ट नादुरुस्त होती. याकडे त्या इमारतीतील रहिवाशांनी दुर्लक्ष का केले? आज अंशच्या मृत्यूने अनेक प्रश्न पुढे आले आहेत. मागील सहा वर्षे लिफ्ट बंद असताना तेथील रहिवासी दुर्घटना घडण्याची वाट पहात होते का, विकासकाने लिफ्ट का दुरुस्त केली नाही असे प्रश्र समोर येतात.

वरील दुर्घटनेसारख्या अनेक घटना यापूर्वीही आपल्या देशात घडल्या आहेत. त्यापैकी लहान मुलांवर केले जाणारे लैंगिक अत्याचार आणि त्यातून त्या मुलांना गमवावा लागणारा जीव. आज आपला समाज जसजसा प्रगती करत गेला तसतशी गुन्हेगारीमध्ये वाढ झाली. आज महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाली असतानाच लहान मुलांवर होणाऱया अत्याचारांच्या घटनांमध्येही मोठी वाढ झाल्याचे दिसून येते. लहान मुलांवर शाळेतील कर्मचाऱयांकडूनच लैंगिक अत्याचार होण्याच्या घटना तर अनेकदा असे अत्याचार करून मुलांची निर्घृण हत्या केली जाते. यामध्ये मुलींचे प्रमाणही अधिक आहे.

देशात खळबळ माजविणारे नागपूर येथील युग चांडक प्रकरण थरकाप उडविणारे होते. 1 सप्टेंबर 2014 रोजी नागपूरमध्ये आठ वर्षीय युग चांडक या मुलाची हत्या करण्यात आली. घटनेची पार्श्वभूमी पाहता या घटनेतील आरोपी राजेश हा युगचे वडील डॉ. मुकेश चांडक यांच्या रुग्णालयात कर्मचारी होता. युग नेहमीच रुग्णालयात येत असे. एक दिवस राजेशने युगला चापटी मारली. परिणामी, डॉ. चांडक राजेशवर रागावले. या घटनेचा बदला म्हणून राजेशने युगची हत्या केली. अशीच घटना 24 मे 2018 रोजी उघडकीस आली. मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या डोंबिवलीत 8 वर्षीय अथर्व वारंगवर अनैसर्गिक अत्याचार करून त्याचा मृतदेह ड्रेनेजच्या टाकीत टाकण्यात आला. या घटनेचा तपास सुरू असून आरोपींनाही गजाआड करण्यात आले आहे. पण या घटनेच्या मुळाशी जाऊन माहिती काढल्यास अथर्वची हत्या करणारे आरोपींचे त्याच्या कुटुंबाबरोबर वाद होते. एकंदरीत अशा घटना घडण्याचे मुख्य कारणही पालकच ठरतात. कारण, आपले मूल काय करते किंवा जर शाळा किंवा क्लासेसला जात असेल तर तेथील परिस्थिती किंवा सभोवतालचा भाग योग्य आहे का याची माहिती घेतली जात नाही. म्हणजेच आजच्या काळात मुलांवर लक्ष ठेवण्याची पालकांची जबाबदारी वाढली आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी पालकांनी सजग राहायला हवेच.

रोहन नाईक