|Sunday, June 16, 2019
You are here: Home » leadingnews » सहगल यांचे निमंत्रण रद्द करणे निषेधार्ह : अरूणा ढेरे

सहगल यांचे निमंत्रण रद्द करणे निषेधार्ह : अरूणा ढेरे 

ऑनलाईन टीम / यवतमाळ :

जगातील सर्व साहित्यकांना मराठीची दारे खुली आहेत. नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द करणे अत्यंत निषेधार्ह आहे. सहगल या आगळय़ावेगळय़ा लेखिका असून सहगल यांचे विचार जोपासायला हवेत, अशा तिखट शब्दात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा अरूणा ढेरे यांनी समाचार घेतला आहे. साहित्याशी किंवा भाषेच्या समृद्धतेशी ज्यांचा काडीचाही संबंध नाही अशा लोकांमुळे वाद निर्माण होतो ते चुकीचे आहे असे परखड मत ढेरे यांनी व्यक्त केले.

हे व्यासपीठ एकमेकांकडे बोट दाखविण्याचे नाही. जगातील सर्व साहित्यकांना मराठीचे व्यासपीठ खुले आहे. संमेलनामध्ये साहित्यबाह्य कारणांनी वाद होणे चुकीचे आहे. आपला विवेक जागृत ठेवण्याची ही वेळ आहे. निमंत्रणामागच्या हेतूंना आता राजकीय रंग आला आहे, असेही ढेरे म्हणाल्या. कुणीही यावे आणि साहित्य संमेलन वेठीला धरावे हे चालणार नाही, अशा शब्दात अरूणा ढेरे यांनी नयनतारा सहगल प्रकरणावर खडेबोल सुनावले. निमंत्रण रद्द करणं ही संयोजक मंडळींची चूक आहे असेही ढेरे यांनी म्हटले.

झुंडशाहीच्या बळावर जर कोणी आपल्याला भयभीत करत असेल तर आपण केवळ नमते घेऊन टीकेचे धनी होण्याच मार्ग स्वीकारणार का? असा सवाल करीत ज्ये÷ लेखिका नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द करून संयोजकांकडून गंभीर चूक घडली आहे. संमेलन साहित्यबाह्य शक्तीच्या ताब्यात जाण्याचा धोका स्पष्ट असताना ती जोखीम समजशाक्तीने उचलली गेलीच पाहिजे, ही काळाची गरज संयोजकांना ओळखता आली नाही, अशा शब्दांत साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा अरुणा ढेरे यांनी संमेलनाच्या आयोजकांना व्यासपीठावरूनच सुनावले.

साहित्य हा एक उत्सव असतो पण अनेक कारणांनी आपण त्या आनंदोत्सवाचे स्वरुप गढूळ होऊ दिले. आपले दुर्लक्ष, भाबडेपणा आणि मर्यादित समज, आपल्या लहानसहान मोहांना आणि वाडमयीन राजकारणाला सहज बळी पडणे, या सगळय़ा आणि इतर कारणांमुळे आपण हा उत्सव भ्रष्ट होऊ दिला, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

ढेरे म्हणाल्या, नयनतारा यांनी यावे आणि अगदी मोकळेपणाने, निर्भयपणे आपले विचार या व्यासपीठावरून मांडावेत. त्यांचे अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य अबाधित राखले जावे. त्यांची मते आपण जाणून घ्यावीत, ती आपल्याजवळच्या विवेकाने पारखावीत. स्वतःच्या मतांच्या मांडणीचे संपूर्ण स्वातंत्र्य त्यांना असलंच पाहिजे. त्या मतांशी संपूर्ण सहमत होण्याचे. असहमत होण्याचे, किंवा वेगवेगळय़ा बाजूंनी त्यांच्या मतांचा विचार करत त्यांची मौलिकता तपासायला हवी होती.