|Thursday, June 27, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » भाजप सरकार चले जाव…

भाजप सरकार चले जाव… 

असंघटीत कामगारांचा नारा

प्रतिनिधी/कोल्हापूर

   भाजप सरकार सत्तेवर आल्यापासून असंघटीत कामगारांना त्यांच्या प्रलंबित मागण्यांची पूर्तता करण्याचे केवळ आश्वासन देत आले आहे. गेल्या चार वर्षांमध्ये कामागारांच्या एकाही मागणीची पूर्तता झालेली नाही. त्यामुळे अगामी निवडणुकांमध्ये असंघटीत कामगारांची ताकद दाखवत भाजप सरकारला घरी पाठवूया, असा निश्चय करत असंघटीत कामगारांनी ‘चले जाव चले जाव भाजप सरकार चले जाव’ चा नारा देत जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून सोडला. तर विविध संघटनांनी त्यांच्या मागण्यांचो निवेदन जिल्हा प्रशासनाला दिले.

  असंघटीत कामगारांनी त्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत, धरणे आंदोलन केले. मोर्चामध्ये बांधकाम कामगार, आशा वर्कस, शालेय पोषण आहार, पेट्रोल पंप कर्मचारी आणि इंजिनिअर कामगार संघटना सहभागी झाली होती. मोर्चामध्ये आशा वर्कसची संख्या लक्षणीय होती. दसरा चौक मैदानामधून मोर्चास प्रारंभ झाला. पुढे व्हिनस कॉर्नर, ऍसेंब्ली रोड मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरता आला. यावेळी कामगारांनी हम सब एक है, कामगार एक जुटीचा विजय असो, लबाड सरकारच करायच कायं…, इनकलाब जिंदाबाद आदी घोषणा देत परिसर दणाणून सोडला.

  याप्रसंगी बोलताना कॉम्रेड चंद्रकांत यादव म्हणाले, असंघटीत कामगारांच्या प्रश्नांकडे भाजप सरकाचे दूर्लक्ष झाले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये भाजप सरकारला कोणत्याही परिस्थितीत घरी बसवा, असे आवाहन यादव यांनी केले. लाल बावटा बांधकाम व्यवसाय कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष भरमा कांबळे म्हणाले, मोदी आणि फडणवीस सरकार जनतेची फसवणूक करतयं. देशाचे पंतप्रधान नरेंद मोदी एकीकडे असंघटीत कामागारांना किमान वेतन 18 हजार मिळाले पाहिजे असे म्हणतात. मात्र याची अंमलबजावणी त्यांच्याकडून होत नाही. त्यामुळे त्यांचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे असल्याचा आरोप कांबळे यांनी केला.

 आशा वर्कस संघटनेच्या उज्वला पाटील म्हणाल्या, सत्तेवर येण्यापूर्वी भाजप सरकाने सर्वांन अच्छे दिनची स्वप्ने दाखविली. मात्र हे अच्छेदिन आजतागायत दिसलेले नाही. आशा वर्कसना केवळ विविध योजनांची कामे सांगितली जातात. मात्र अशांची किमान वेतनाही मागणी अद्यापही प्रलंबित आहे. त्यामुळे आता आशांची ताकद सरकारला दाखविण्याची वेळ आली आहे. आपल्या न्याय हक्काच्या मागणीसाठी एकजुटीने लढा दिला तरच यश मिळेल, असा विश्वास पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

 शालेय पोषण आहार संघटनेचे भगवान पाटील म्हणाले, मगील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारने असंघटीत कामगारांना त्यांच्या मागण्यांबाबत केवळ गाजर दाखविण्याचे काम केले. त्यामुळे अच्छे दिनची स्वप्ने दाखविणाऱया भाजप सरकारला    निवडूण दिले. मात्र हे सरकार मागील सरकारच्या पलीकडचे निघाले. त्यामुळे अगामी निवडणूकीत त्यांना रोखणे गरजेचे आहे, असे मत पाटील यांनी व्यक्त केले.

फेबुवारीमध्ये तीव्र आंदोलन

 असंघटीत कामगार अनेक वर्षांपासून त्यांच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी लढा देत आहेत. मात्र अद्याप एकाही मागणीची पूर्तता झालेली नाही. त्यामुळे सध्या सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मोर्चा व धरणे आंदोलन केले आहे. जानेवारी अखेरपर्यंत मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर सीटूच्या राज्य पदाधिकाऱयांच्या बैठकीत फेबुवारीमध्ये तीव्र आंदोलन छेडण्याचे नियोजन करणार असल्याची माहिती भरमा कांबळे यांनी दिली.