|Thursday, June 20, 2019
You are here: Home » Top News » सन्मानजनक तोडगा निघेपर्यंत संप सुरूच राहणार : शशांक राव

सन्मानजनक तोडगा निघेपर्यंत संप सुरूच राहणार : शशांक राव 

ऑनलाईन टीम / मुंबई :

बेस्ट कर्मचाऱयांच्या संपावर चौथ्या दिवशीही तोडगा निघू शकलेला नाही. त्यामुळे बेस्टचा संप सुरूच राहणार आहे. सन्मानजनक तोडगा द्या तरच संप मागे घेऊ, असे शशांक राव यांनी स्पष्ट केले आहे. परळमध्ये बेस्ट कृती समितीच्या कामगार मेळाव्यात संपावर ठाम राहण्याचा निर्णय झाला आहे.

बेस्ट संपात विद्युत पुरवठा कर्मचारी आणि म्युनिसीपल मजदुर युनियनचे महापालिका कर्मचारी सहभागी होणार आहेत. संप मिटवण्यासाठी उद्धव ठाकरे, मुंबई महापालिका आयुक्त यांच्यासोबत चर्चा सुरु होती. मात्र मागण्या पुढय़ात ठेवल्या की ‘पैसा नाही’ हेच उत्तर मिळत होते. त्यामुळे शिवसेनेच्या भूमिकेवरुन त्यांना प्रश्न पडलाय की बेस्टला किती मदत करायची. आता कामगारांनाही ठरवावे लागेल की येत्या निवडणुकीत त्यांना किती मदत करायची, असा इशारा शशांक राव यांनी दिला. बेस्ट बजेट महापालिका बजेटमध्ये विलीन करणार नाही. बेस्ट महापालिकेत विलिनीकरणाचा प्रस्ताव महापालिकेत पास झाला तरी तो राज्य सरकारकडे पाठवणार नाही, असे महापालिका आयुक्तांनी सांगितले आहे. त्यामुळे आयुक्त आणि सत्ताधारी आम्हाला वेठीस धरत आहेत, असे शशांक राव म्हणाले. जेव्हा आंदोलन सुरू केले तेव्हाच ठरवले होते की आता माघार घ्यायची नाही आणि मातोश्रीवर जायचे नाही. सरकार आणि महापालिकेने अट घातली आहे की संप मागे घ्या मग चर्चा करु. ही अट आम्हाला मान्य नाही त्यामुळे प्रश्न सुटत नाही तोपर्यंत संप सुरुच राहणार असल्याचे शशांक राव यांनी स्पष्ट केले. बेस्ट संपाबाबत राज्य सरकारच्या उच्च स्तरीय समितीची उद्या सकाळी 11 वाजता बैठक होणार आहे. बेस्ट कर्मचाऱयांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी तीन सदस्यीय समिती नेमण्यात आल्याची माहिती राज्य सरकारच्या वतीने मुंबई हायकोर्टात देण्यात आली.