|Thursday, June 27, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » भाजपने फुंकले लोकसभेचे रणशिंग

भाजपने फुंकले लोकसभेचे रणशिंग 

भाजप राष्ट्रीय कार्यकारिणी अधिवेशनात अमित शहांचे भाषण,

आगामी निवडणूक विचारसरणींचे युद्ध असल्याचे प्रतिपादन, विजयाचा विश्वास

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

आगामी लोकसभा निवडणुकीत पुन्हा भाजपचाच पूर्ण बहुमताने विजय होणार, असा विश्वास पक्षाध्यक्ष अमीत शहा यांनी व्यक्त केला आहे. ते येथील रामलीला मैदानावर आयोजित भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी अधिवेशनात भाषण करीत होते. ही लोकसभा निवडणूक हे भाजप आणि विरोधी पक्ष यांच्या विचारसरणींचे युद्ध आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. विरोधी पक्षांचे महागठबंध पोकळ असून ते केवळ भाजपविरोधासाठी बनविण्यात आले आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

दोन दिवस चालणाऱया भाजप राष्ट्रीय कार्यकारिणी अधिवेशनास शुक्रवारी प्रारंभ करण्यात आला. या अधिवेशनासाठी देशभरातून असंख्य भाजप कार्यकर्ते, भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री व इतर नेते उपस्थित आहेत. शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उपस्थितांसमोर भाषण होणार आहे.

अत्याधिक महत्वाची निवडणूक

आगामी लोकसभा निवडणूक केवळ भाजपसाठी नव्हे, तर देशासाठी महत्वाची आहे. भाजप आणि रालोआ सरकार विकासाच्या मार्गावर अग्रेसर आहे. आतापर्यंत केव्हाही नव्हते तेवढे कार्य मोदी सरकारने गरीब व दुर्बल घटकांसाठी केले आहे. ते पुढे सुरू रहायचे असेल तर हेच सरकार पुन्हा निवडून आले पाहिजे. तसेच नरेंद्र मोदीच पुन्हा देशाचे पंतप्रधान बनले पाहिजेत. कार्यकर्त्यांनी त्यासाठी आपले सर्वस्व झोकून पक्षासाठी काम करावे आणि भाजपला विजयी करावे, असे आवाहन त्यांनी केले.

विरोधक असहाय्य

विरोधकांना निराशेने घेरले आहे. स्वतंत्रपणे आपण मोदींसमोर टिकाव धरू शकणार नाही, अशी खात्री त्यांना पटली आहे. परिणामी. त्यांनी अगतिकपणे एकत्र येण्याचा प्रयत्न चालविला असून महगठबंधनाचा घाट घातला आहे. तथापि, या गठबंधनाजवळ नेता आणि नीती  नाही. केवळ सत्तास्वार्थ या एकाच सूत्राने हे पक्ष बांधले गेले आहेत. ही आघाडी भाजपला विरोध या एकाच हेतूने करण्यात आल्याची टीका त्यांनी केली.

ऐातिहासिक उदाहरणे

या निवडणुकीचे महत्व ठसविण्यासाठी त्यांनी विविध ऐतिहासिक युद्धांची उदाहरणे दिली. छत्रपती शिवाजी महाराजांवर त्यांनी स्तुतिसुमने उधळली. मराठय़ांचा इतिहास पराक्रमाने भरलेला असून तसाच पराक्रम भाजप कार्यकर्त्यांनी या निवडणुकी करून दाखवावा व पक्षाला विजय मिळवून द्यावा, असे प्रतिपादन त्यांनी केले.

सरकारवरील आरोप फेटाळले

राफेल व इतर मुद्दय़ांवरून सरकारवर होत असलेले आरोप त्यांनी फेटाळले. राफेलचे भूत काँगेसने निर्माण केले असून केवळ सरकारला बदनाम करणे हा त्यामागचा हेतू आहे. राफेल व्यवहार सच्छ असल्याची ग्वाही सर्वोच्च न्यायालयाने दिली असूनही विरोधक केवळ राजकीय लाभासाठी खोटे आणि बनावट आरोप करीत आहेत. तथापि, देशातील जनता सूज्ञ असून विरोधकांना उघडे पाडल्याशिवाय राहणार नाही, असा दावा त्यांनी केला.

अब की बार, फिरसे मोदी सरकार

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शहा यांनी भाजप कार्यकर्त्यांना नवा मंत्र दिला. ‘अब की बार, फिरसे मोदी सरकार’ ही घोषणा देत देशाचा कानाकोपरा पालथा घाला, अशी सूचना अमीत शहा यांनी कार्यकर्त्यांना केली. मोदी सरकारने उज्ज्वला योजना, आवास योजना, आयुषमान योजना, जनधन योजना आदींच्या माध्यमातून गरीबांचे जीवनमान उंचावले. त्यांच्या जीवनात प्रकाश आणला, असे प्रतिपादन त्यांनी केले.