|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे » झुंडशाहीपुढे नमती भूमिका नको !

झुंडशाहीपुढे नमती भूमिका नको ! 

संमेलनाध्यक्षांचे खडे बोल, साहित्यबाहय़ शक्तींचा संमेलनाला धोका

सुकृत मोकाशी, संकेत कुलकर्णी / राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरी, यवतमाळ

झुंडशाहीच्या बळावर कुणी भयभीत करीत असेल, तर आपण नमती भूमिका घेऊन टीकेचे धनी होण्याचा मार्ग स्वीकारणे योग्य नाही. साहित्य संमेलन साहित्यबाहय़ शक्तींच्या ताब्यात जाण्याचा धोका स्पष्ट दिसत असून, आता यासंदर्भातील जोखीम समाजशक्तीनेच उचलली पाहिजे, अशा शब्दात संमेलनाध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांनी नयनतारा सहगल प्रकरणावर शुक्रवारी आपली भूमिका मांडली. तर झुंडशाहीपुढे आपण झुकलो आहोत. नयनतारा सहगल यांनी विचार मांडले असते, तर आभाळ कोसळले नसते, अशी परखड टीका मावळते अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी केली.

92 व्या अखिल भारतीय मराठी संमेलनाचे उद्घाटन आत्महत्या केलेले शेतकरी सुधाकर येडे यांच्या पत्नी वैशाली येडे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी अध्यक्षपदावरून डॉ. ढेरे बोलत होत्या. मावळते अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख, शिक्षणमंत्री विनोद तावडे, स्वागताध्यक्ष मदन येरावार व मान्यवर उपस्थित होते.

नयनतारा सहगल यांच्या निमंत्रणवापसी प्रकरणाचा डॉ. ढेरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात संयमितपणे समाचार घेतला. त्या म्हणाल्या, निमंत्रण दिल्यानंतर ते मागे घेणे, ही संयोजकांची गंभीर चूक आहे. या प्रकारामुळे केवळ संमेलनाचीच नव्हे, तर साहित्यप्रेमींची मानही खाली गेली आहे. साहित्याशी किंवा भाषेच्या जाणत्या प्रेमाशी ज्यांचा सुतराम संबंध नाही, अशा कोणा समूहाने दिलेल्या धमक्मयांपुढे वाकणे अशोभनीय आहे. आपण झुंडशाहीपुढे असेच वाकणार आहोत का? कुणीही यावे आणि संमेलनाला वेठीस धरावे, हा प्रकार काही योग्य नाही.

डेहराडूनवरून प्रवास करीत नयनतारा संमेलनाला येणार होत्या. खुल्या मंडपात, संमेलनाच्या गर्दीत त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न मोठा होता. म्हणून म्हणे हा निर्णय संयोजकांनी घेतला. त्यातली स्वाभाविकता समजून घेतली, तरी परिस्थितीची मागणी त्याहून मोठय़ा निर्णयाची होती. त्यांचे नियोजित भाषण आता आपल्यासमोर आले आहे. त्यांचे राजकीय विचार थोडेफार अपवाद वगळता वाचकांसमोर आले आहेत. त्यांच्या विचारांशी सहमत असणारे आणि नसणारे असे दोन्ही प्रकारचे वर्ग मराठी वाचकांमध्ये अद्याप तयार व्हायचे असतानाच त्यावरून एक लढाई सुरू होणे दुर्दैवी आहे. साहित्य हा एक उत्सव असतो. मात्र, या आनंदोत्सवाचे स्वरूप गढूळ करण्यात वा त्याला भ्रष्ट करण्यातच धन्यता मानली गेली, याचा खेद वाटतो.

…तर आभाळ फाटले नसते : लक्ष्मीकांत देशमुखांकडून निषेध

लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले, संमेलनावर एक गडद छाया पडली आहे. सहगल यांच्या निमंत्रण वापसीवरून मी चिंतीत झालो आहे. निमंत्रण मागे घेऊन आपण झुंडशाहीपुढे झुकलो आहोत. राज्याच्या सहिष्णुतेचा हा अवमान असून, याद्वारे देशभर वेगळा संदेश गेला आहे. संमेलनाची इतर भाषांना लाजवेल अशी परंपरा आहे. ही परंपरा पुढे सुरू राहणार म्हणून आनंदित झालो होतो. पण निमंत्रण देऊन आता येऊ नका, असे सांगणे उदारामतावादाला तिलांजली देण्यासारखे आहे. सहगल या गेली अनेक वर्षे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या प्रश्नासाठी झगडत आहेत. संमेलनाला त्या आल्या असत्या, तर आभाळ फाटले नसते नि राजकीय भूकंपही झाला नसता. आधीही त्यांनी या भूमिका वेळोवेळी मांडल्या आहेत. याबाबत आयोजकांनी एकमेकांकडे बोट दाखवले नसते, तर बरे झाले असते. यामध्ये मीही अप्रत्यक्ष सहभागी असल्याने मलाही शरम वाटते. या घटनेचा मी निषेध करतो. आपल्या देशाची सहिष्णू परंपरा खंडित होत आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

शेतमाल, साहित्याला भाव नाही : शेतकरी पत्नीची खंत

वैशाली येडे म्हणाल्या, संमेलनाचे उद्घाटन माझ्या हस्ते होत आहे, हे मी माझे भाग्य समजते. मी साहित्य वाचले नाही. पण, माणसे वाचली आहेत. माणसे वाचण्यासाठी माणसांमध्येच जावे लागते. मी बहिणाबाईंची लेक आहे. पती गेल्याचे दु:ख आपल्यावर नियतीने नव्हे, तर व्यवस्थेने लादले आहे. शेतकऱयांनी धीर धरावा. आज शेतमाल व साहित्य दोघांची एकच अवस्था असून, त्यांना भाव मिळेनासा झाला आहे. शेतकऱयांना सावरण्यासाठी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार दीडपट भाव मिळाला पाहिजे.

निमंत्रण वापसी आम्हालाही आवडलेली नाही : विनोद तावडे

तावडे म्हणाले, सहगल यांना निमंत्रण दिल्यानंतर परत येऊ नका, असे सांगणे हे शासनालाही आवडलेले नाही. प्रत्येकाचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपले गेले पाहिजे. याबाबतचा सगळा निर्णय हा महामंडळाचा आहे. आम्ही कधीच काही सांगायला जात नाही. मग मुख्यमंत्र्यांनी सांगितले, असे का वाटते. आम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचाच विचार करणारे आहोत. महाराष्ट्रासाठीचा विषय आहे म्हणून मी आज एवढे बोललो, असेही ते म्हणाले.

नयनतारांचे मुखवटे घालून असहिष्णुतेचा निषेध

संमेलनाचा उद्घाटन सोहळा सुरू असताना काही महिलांनी नयनतारा सहगल यांचे मुखवटे घालून साहित्य महामंडळ, आयोजक संस्था आणि शासनाचा निषेध केला. त्यांच्या घोषणा सुरू असताना व्यासपीठावर स्वागताध्यक्ष व पालकमंत्री मदन येरावार यांचे भाषण सुरू होते. निषेधामुळे काही काळ सभामंडपात गोधळ निर्माण झाला. त्यामुळे येरावार यांना भाषण आटोपते घ्यावे लागले. त्यानंतर पोलिसांनी पुढाकार घेऊन महिलांकडून मुखवटे ताब्यात घेतले. निषेध करणाऱया महिलांना ताब्यात घेऊन सोडून देण्यात आले.