|Monday, June 17, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » पत्रकार हत्येप्रकरणी रामरहिमसह चौघे दोषी

पत्रकार हत्येप्रकरणी रामरहिमसह चौघे दोषी 

17 रोजी शिक्षा सुनावणार : पंचकुला येथील सीबीआय विशेष न्यायालयाचा निर्णय

वृत्तसंस्था/ चंदीगढ

पत्रकार रामचंद्र छत्रपती यांच्या हत्येप्रकरणी गुरमीत रामरहिम याला दोषी ठरवण्यात आले आहे. 17 रोजी त्याच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले जाणार आहे. रामरहिम याच्यासह याप्रकरणी कृष्णलाल, कुलदीप आणि निर्मलसिंह हेही दोषी ठरवले आहेत.

पंचकुला येथील सीबीआय विशेष न्यायालयाने शुक्रवारी हा निकाल दिला आहे. तर निकाल जाहीर केल्यानंतर कायदा सुव्यवस्था कायम राहावी म्हणून हरियाणा आणि पंजाबमधील काही क्षेत्रात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. विशेषतः पंचकुला, सिरसा येथील रामरहिमचे डेरा मुख्यालय आणि रोहतक जिल्हय़ातील पोलीस सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सशस्त्र पोलीस दल, दंगाविरोधी पथक आणि सीआयएसएफ जवानांच्या अनेक कंपन्या तैनात केल्या आहेत, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱयाने सांगितले.

याशिवाय पंचकुला न्यायालयाबाहेरही कडक सुरक्षा व्यवस्था केल्याचेही या अधिकाऱयाने सांगितले. हरियाणा पोलिसांनी कारागृह ते न्यायालय मार्गावर अनेक ठिकाणी अडथळे व सुरक्षा यंत्रणा तैनात केली आहे. तसेच या मार्गावरील वाहतूक अन्यत्र वळवली आहे. जिल्हा पोलीस प्रमुखांनी अनावश्यकरित्या तीनपेक्षा अधिकजणांनी एकत्र येण्यावर निर्बंध घातले आहेत. सिरसा येथे डेरा सच्चा सौदा मुख्यालयाजवळ अतिरिक्त पोलीस फौजफाटा तैनात केला आहे.

याआधी ऑगस्ट 2017 मध्ये तो दोषी आढळल्यानंतर सिरसा परिसरात प्रचंड हिंसाचार उफाळून आला होता. या पार्श्वभूमीवर विशेष न्यायालयाने रामरहिमला दोषी ठरवल्यानंतर शुक्रवारी पुन्हा आपद्परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था तैनात करण्याची खबरदारी घेतली आहे. त्यावेळी उसळलेल्या दंग्यांमध्ये 40 हून अधिकजणांचा मृत्यू झाला होता.

51 वर्षीय रामरहिम सध्या रोहतकमधील सुनारिया जेलमध्ये 20 वर्षे कारावासाची शिक्षा भोगत आहे. दोन महिला अनुयायांवर बलात्कार व लैंगिक शोषण केल्याच्या आरोपामध्ये दोषी सिद्ध झाला आहे. पंजाबमध्ये त्याच्या समर्थकांची संख्या जादा असल्याने भटिंडा आणि फिरोजपूरमध्येही सुरक्षा यंत्रणा कडक केल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले.

पत्रकार रामचंद्र छत्रपती यांची 2002 मध्ये हत्या झाली होती. यामध्ये रामरहिमला मुख्य सुत्रधार ठरवण्यात आले होते. रामचंद्र याने डेरा मुख्यालयामध्ये रामरहिम महिलांचे लैंगिक शोषण करत असल्याचे प्रसिद्ध केल्याने त्याची ऑक्टोबर 2002 मध्ये गोळय़ा झाडून हत्या केली होती. त्यानंतर 2003 मध्ये याबाबत गुन्हा दाखल केला होता. तर 2006 साली याचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता.

घटनाक्रम….

रामचंद्र छत्रपतीने सच्चा डेरा सौदामधील गैरप्रकार केले उघड

चिडलेल्या रामरहिमने चालकाला हत्येचे दिले आदेश

24 ऑक्टोबर 2002 रोजी रामचंद्रवर गोळीबार,

21 नोव्हेंबरला मृत्यू, ऑगस्ट 2003 मध्ये गुन्हा दाखल

2006 मध्ये तपास सीबीआयकडे