|Monday, March 25, 2019
You are here: Home » क्रिडा » सिरीयाला हरवून जॉर्डन बाद फेरीत

सिरीयाला हरवून जॉर्डन बाद फेरीत 

वृत्तसंस्था/ अबु धाबी

येथे सुरू असलेल्या आशिया चषक फुटबॉल स्पर्धेत जॉर्डनने गुरुवारी झालेल्या सामन्यात सिरीयाचा पराभव करत बाद फेरीत प्रवेश मिळविला आहे. या स्पर्धेत सर्वप्रथम बाद फेरी गाठणारा जॉर्डन हा पहिला संघ आहे.

गुरुवारी येथील खलिफा बिन झेयाद स्टेडियमवर झालेल्या सामन्यात जॉर्डनने सिरीयाचा 2-0 असा पराभव केला. या सामन्यात पूर्वार्धात मोसा मोहम्मद सुलेमान आणि तारिक खताब यांनी जॉर्डनतर्फे प्रत्येकी एक गोल केला. या विजयामुळे जॉर्डनने ब गटात 6 गुणासह पहिले स्थान मिळविले असून त्यांचा या गटातील शेवटचा सामना पॅलेस्टिन संघाबरोबर होणार आहे. जॉर्डनने या स्पर्धेत दणकेबाज प्रारंभ करताना विद्यमान विजेत्या ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का दिला होता.

या स्पर्धेतील अन्य एका सामन्यात थायलंडने बहरिनचा 1-0 असा निसटता पराभव केला. या स्पर्धेत थायलंडचा हा दुसरा विजय आहे. या सामन्यात थायलंडचा एकमेव निर्णायक गोल उत्तरार्धात सॅपोरोने केला. भारताने या स्पर्धेतील आपल्या यापूर्वीच्या सामन्यात थायलंडचा 4-1 असा पराभव केला होता.

Related posts: