|Monday, June 17, 2019
You are here: Home » क्रिडा » पंडय़ा, केएल राहुल वनडे मालिकेतून निलंबित

पंडय़ा, केएल राहुल वनडे मालिकेतून निलंबित 

कॉफी वुईथ करण’ कार्यक्रमातील महिलांविषयक वादग्रस्त टिपणी भोवली

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

एका खासगी टीव्ही शोमध्ये महिलांविषयी आक्षेपार्ह टिपणी करणाऱया हार्दिक पंडय़ा व केएल राहुल या युवा खेळाडूंना सदर टिपणीचा जबरदस्त फटका बसला असून बीसीसीआयने त्यांना ऑस्ट्रेलियाविरुद्ध आजपासून खेळवल्या जाणाऱया वनडे मालिकेतून निलंबित करण्याचा निर्णय घेतला. पंडय़ा व राहुल यांना चौकशी पूर्ण होईतोवर निलंबित केले असल्याची माहिती प्रशासक समितीचे अध्यक्ष विनोद राय यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना दिली. बीसीसीआयमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, औपचारिक सुनावणी सुरु करण्यापूर्वी या उभयतांना नव्याने कारणे दाखवा नोटीसही बजावली जाणार आहे. कॉफी वुईथ करण कार्यक्रमातील ही टिपणी त्यांना चांगलीच भोवल्याचे येथे स्पष्ट झाले.

‘बीसीसीआयची अंतरिम समिती चौकशी करेल की ऍड हॉक ओम्बुड्समनकडे ही जबाबदारी दिली जाईल, हे अद्याप निश्चित झालेले नाही. पण, नव्याने चौकशी होणार, हे निश्चित आहे’, असे मंडळातील सूत्राने येथे नमूद केले. ‘निलंबनानंतर या उभयतांना संघासमवेत थांबवायचे की, मायदेशी पाठवायचे, हा निर्णय भारतीय संघव्यवस्थापन घेईल. त्यांना मायदेशी पाठवल्यास या प्रकरणाचा भडका उडू नये, असा विचारप्रवाह होता. मात्र, त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई व्हावी, असाच बीसीसीआयमधील बहुतांशी घटकांचे मत आहे’, असेही सदर सूत्राने म्हटले आहे.

पंडय़ा व केएल राहुल यांना ऑस्ट्रेलियातून मायदेशी धाडण्याचा निर्णय झाला तर पर्यायी खेळाडू या नात्याने ऋषभ पंत व मनीष पांडेला पाचारण केले जाईल, असे संकेत आहेत. याशिवाय, विजय शंकर, श्रेयस अय्यरचाही विचार होऊ शकतो. प्रशासक समितीतील राय यांची सहकारी डायना एडल्जी यांनी पुढील कारवाई होईतोवर पंडय़ा व राहुल यांना निलंबित करण्यास मान्यता दिली आणि त्यानंतर त्यांच्यावर निलंबन लादले गेले. एडल्जी यांनी प्रारंभी या उभयतांवर दोन सामन्यांची बंदी लादण्याची शिफारस केली. पण, नंतर बीसीसीआयच्या कायदेशीर विभागाने हे प्रकरण हाताळावे, असे म्हटले होते.

यापूर्वी शारीरिक छळ केल्याप्रकरणी बीसीसीआय सीईओ राहुल जोहरी यांची चौकशी सुरु असताना त्यांना निलंबित केले गेले होते. त्या पार्श्वभूमीवर, तोच नियम या उभय क्रिकेटपटूंनाही लागू होतो, असे डायना एडल्जी यांनी म्हटले होते.

काय म्हणाले होते पंडय़ा, राहुल?

एकापेक्षा जास्त महिलांशी मी रिलेशनशिपमध्ये होतो आणि त्याबाबत माझ्या पालकांना देखील कल्पना होती, असे हार्दिक पंडय़ाने या शोमध्ये म्हटले व यावरुन या वादंगाला सुरुवात झाली. पंडय़ाच्या या वक्तव्याचे संतप्त पडसाद उमटत राहिले, बीसीसीआयने याची गांभीर्याने दखल घेतली व पंडय़ाने लगोलग आपल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली होती. त्या तुलनेत केएल राहुलने महिला व रिलेशनशिपबद्दल संयमाने मते व्यक्त केली. पण, पंडय़ा व तो एकाच वेळी शो मध्ये असल्याने तो ही या वादात बराच भरडला गेला. या वादंगानंतर भविष्यात करमणुकीच्या अशा कार्यक्रमात सहभागी होण्यावर बीसीसीआय भारतीय खेळाडूंवर कडक बंधने लादण्याविषयीही विचाराधीन असेल, असे संकेत आहेत.