|Thursday, June 20, 2019
You are here: Home » क्रिडा » भारत-ऑस्ट्रेलिया पहिली वनडे आज

भारत-ऑस्ट्रेलिया पहिली वनडे आज 

आयसीसी विश्वचषकापूर्वी रंगीत तालमीचा पहिला टप्पा सुरु

सिडनी/ वृत्तसंस्था

ऐतिहासिक विजय संपादन केल्यानंतर मनोबल उंचावलेला भारतीय संघ आता आजपासून खेळवल्या जाणाऱया वनडे मालिकेतही कांगारुंचे आणखी खच्चीकरण करण्यासाठी निर्धाराने मैदानात उतरेल, अशी अपेक्षा आहे. उभय संघात आज (शनिवार दि. 12) पहिली वनडे खेळवली जाणार असून भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 7 वाजून 50 मिनिटांनी लढतीला प्रारंभ होईल. मालिकेत तीन सामने होतील.

या सामन्याच्या पूर्वसंध्येला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने हार्दिक पंडय़ा व केएल राहुल यांना संघातून निलंबित केले असून अर्थातच, ते या वनडे मालिकेतून बाहेर फेकले गेले आहेत. पंडय़ाचा अंतिम संघातील समावेश जवळपास निश्चित होता तर बहरात नसलेला केएल राहुल मात्र निवडला जाण्याची शक्यता कमी होती. कर्णधार विराट कोहलीने पत्रकार परिषदेला संबोधित करताना संघ चुकीची टिपणी करणाऱया खेळाडूंच्या मागे नसेल, हे स्पष्ट केले.

विराटसेनेसाठी फेररचना क्रमप्राप्त

पहिल्या वनडेत रोहित शर्मा व शिखर धवन ही जोडी सलामीला उतरेल, हे निश्चित आहे. त्यामुळे केएल राहुलला संधी मिळण्याची अजिबात शक्यता नव्हती. पंडय़ाला निलंबित केल्याने मात्र भारताला क्रमवारीत काही फेररचना करावी लागणार आहे. पंडय़ा 10 षटकांचा कोटा पूर्ण करण्याबरोबरच मध्यफळीत फटकेबाजीही करु शकतो. पण, तो आता राहुलसह मायदेशी परतणार असल्याने हा कोटा कसा भरुन काढायचा, याचा निर्णय संघव्यवस्थापनाला घ्यावा लागेल. जसप्रीत बुमराहला या मालिकेतून, तसेच न्यूझीलंड दौऱयातूनही विश्रांती दिली गेली आहे. भुवनेश्वर संघात परतला असून पंडय़ा नसल्याने तीन जलद गोलंदाज खेळवायचे का, हे विराटला ठरवावे लागेल.

अशा परिस्थितीत मोहम्मद शमी व खलील अहमद यांना संघात स्थान मिळू शकते. सिडनीतील खेळपट्टीवर बरेच गवत असल्याने विराट कोहली येथे तीन जलद-मध्यमगती व दोन फिरकीपटू खेळवण्याचा निर्णय घेऊ शकतो, असे संकेत आहेत. पंडय़ा उपलब्ध नसताना रवींद्र जडेजा अष्टपैलू खेळाडूची भूमिका चोखपणे पार पाडू शकतो, हे विराट कोहलीने पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे. जडेजासह डावखुरा मनगटी फिरकीपटू कुलदीप यादवला देखील पसंती मिळू शकेल. आवश्यकतेनुसार, केदार जाधवही पार्टटाईम फिरकी गोलंदाजी करु शकतो.

धोनी-रायुडूच्या फॉर्मविषयी उत्सुकता

रोहित-धवन सलामीला तर विराट कोहली तिसऱया स्थानी, अशा आघाडी फळीनंतर केदार जाधव, महेंद्रसिंग धोनी व अम्बाती रायुडू अशी फलंदाजी लाईनअप असेल. यात धोनी व रायुडूच्या फॉर्मविषयी औत्सुक्य असणार आहे. धोनीला यापूर्वी 2018 मध्ये खराब फॉर्मचा सामना करावा लागला. त्याला 20 वनडे सामन्यात 25 च्या किरकोळ सरासरीने केवळ 275 धावा जमवता आल्या आणि आश्चर्याची बाब म्हणजे यात अगदी एकाही अर्धशतकाचा समावेश नव्हता. सरत्या वर्षात धोनीचा स्ट्राईक रेट 87.89 वरुन 71.42 वर घसरला असून ही संघासाठी सर्वात चिंतेची बाब ठरली आहे.

गतवर्षी सप्टेंबरमध्ये झालेल्या आशिया चषक स्पर्धेपासून भारतीय संघाने चौथ्या स्थानी अम्बाती रायुडूला सातत्याने उतरवले आहे. या कालावधीत त्याने आशिया चषक व विंडीजविरुद्ध खेळलेल्या 11 वनडे सामन्यात 392 धावा झळकावल्या. यात त्याची सरासरी 56 ची राहिली. शिवाय, त्याने एक शतक व 3 अर्धशतकेही झळकावली. अर्थात, या सर्व धावा त्याने इंग्लंडपेक्षा बऱयाच वेगळय़ा वातावरणात केल्या होत्या. त्यामुळे, आता ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडमध्ये त्याची फलंदाजी किती बहरेल, हे महत्त्वाचे ठरणार आहे.

यापूर्वी भारतीय संघ जानेवारी 2016 मध्ये ऑस्ट्रेलियात यजमान संघाविरुद्ध 1-4 फरकाने पराभूत झाला, त्यावेळी धोनी कर्णधार होता. रोहित शर्मा व कोहली यांनी अनुक्रमे 441 व 381 धावा फटकावल्या तर धवनने 287 धावांचे योगदान दिले. पण, 5 वनडे सामन्यांच्या मालिकेत भारताचे मध्यफळीतील फलंदाज मात्र सपशेल अपयशी ठरले होते. शेवटच्या वनडेमध्ये केवळ मनीष पांडेच्या शतकामुळेच भारताला त्या मालिकेत 0-5 असा नामुष्कीजनक पराभव टाळता आला होता. तसे पाहता, भारताची ऑस्ट्रेलियातील वनडे कामगिरी अगदीच निराशाजनक ठरत आली असून त्यात सुधारणा करण्यासाठी विराटसेनेला प्रयत्न करावे लागतील. 1985 वर्ल्ड चॅम्पियनशिप व 2008 सीबी मालिकाविजय वगळता भारताला तेथे सातत्याने अपयशाला सामोरे जावे लागले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्या भूमीत खेळताना भारताने 48 वनडेत चक्क 35 पराभव स्वीकारले आहेत.

ऑस्ट्रेलियासमोर अनेक चिंता

यजमान कांगारुंनी 2016 मध्ये एकतर्फी मालिकाविजय संपादन केला असला तरी यंदा त्यांच्यासाठी बरीच प्रतिकूल स्थिती असेल, हे स्पष्ट आहे. डेव्हिड वॉर्नर व स्टीव्ह स्मिथची उणीव त्यांना प्रकर्षाने जाणवेल, हे सुर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे. 2016 मध्ये वॉर्नरने 3 सामन्यात 220 तर स्टीव्ह स्मिथने 5 सामन्यात 315 धावांचे योगदान दिले होते. यंदा मिशेल स्टार्क, पॅट कमिन्स व जोश हॅझलवूड यांना विश्रांती दिली असल्याने त्यांचीही उणीव यजमान संघाला जाणवणार आहे.

ऑस्ट्रेलियाने या पहिल्या वनडेसाठी आपला 11 सदस्यीय अंतिम संघ जाहीर केला असून नॅथन लियॉन त्यांचा एकमेव फिरकीपटू असेल. पीटर सिडलने 2010 नंतर प्रथमच राष्ट्रीय वनडे संघात पुनरागमन केले आहे. यष्टीरक्षक-फलंदाज ऍलेक्स कॅरे वनडे क्रिकेटमध्ये प्रथमच सलामीला उतरणार असून कर्णधार ऍरॉन फिंच त्याचा सहकारी सलामीवीर असेल. मध्यफळीची भिस्त उस्मान ख्वाजा, शॉन मार्श व पीटर हँडस्कॉम्ब यांच्यावर असणार आहे.

मार्कस स्टोईनिस व ग्लेन मॅक्सवेल सहाव्या व सातव्या स्थानी फलंदाजीला उतरत असल्याने कांगारुंची फलंदाजी भक्कम असेल. गोलंदाजी लाईनअप मात्र बरीच कमकुवत ठरण्याची चिन्हे आहेत. सिडल आठ वर्षांनंतर संघात परतत असून डावखुरा जलद गोलंदाज जेसॉन बेहरेनडॉर्फ येथे वनडे पदार्पण करणार आहे.

संभाव्य संघ

भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, शिखर धवन, अम्बाती रायुडू, दिनेश कार्तिक, केदार जाधव, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), हार्दिक पंडय़ा, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.

ऑस्ट्रेलिया (अंतिम संघ) : ऍरॉन फिंच (कर्णधार), ऍलेक्स कॅरे (यष्टीरक्षक), उस्मान ख्वाजा, शॉन मार्श, पीटर हँडस्कॉम्ब, मार्कस स्टोईनिस, ग्लेन मॅक्सवेल, नॅथन लियॉन, पीटर सिडल, झाय रिचर्डसन, जेसॉन बेहरेनडॉर्फ.

सामन्याची वेळ : सकाळी 7.50 पासून.