|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पेटले पाणी

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पेटले पाणी 

प्रतिनिधी/ सोलापूर

शुक्रवारी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शिरभावी योजनेचे पाणी जणू पेटले. नियमीत पाणी पट्टी भरणाऱया या योजनेवरील तब्बल साधारण 82 गावच्या नागरिकांचा घसा कोरडा ठेवून रत्नागिरी-नागपूर या राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याच्या कामासाठी हे पाणी वापरल्याचा भांडाफोड या बैठकीत  झाला. साधारण 5 कोटी रूपये किंमतीचे पाणी योजना फोडून रस्त्यासाठी वापरल्याचा आरोप  सांगोला तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत देशमुख यांनी करून या गंभीर प्रकरणचा जणू पर्दाफाशच या बैठकीत केला.

  दरम्यान या प्रकरणत संबंधीतांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन  जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी लोकप्रतिनिधींना दिल्यानंतर बैठकीत  पेटलेले पाणी थंड झाले.

    सांगोला तालुक्यातील 82 गावांना पाणीपुरवठा करणाऱया शिरभावी योजनेतील पाणी लेंडवे चिंचोळी परिसरात रत्नागिरी- नागपूरच्या रस्त्यासाठी अनिधकृतपणे 4 इंची पाईप लावून वापरण्यात आल्याचे आरोप जि.प. सदस्य श्रीकांत देशमुख यांनी डीपीसी बैठकीत उपस्थित केला. या योजनेत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी व ठेकेदारांच्या संगनमताने 5 कोटींचे पाणी परस्पर पळवून भ्रष्टाचार झालेला असून याप्रकरणी संबधित अधिकाऱयावर कारवाई करून ते पाणी त्वरीत थांबवावे अशी मागणी जि.प. देशमुख यांनी बैठकीत केली.

    मंगळवेढा – पंढरपूरचे  आमदार नाना भालके यांनीही या प्रकरणाला दुजोरा दिला आहे. 82 गावच्या नागरिकांसाठी असलेल्या शिरभावी योजनेमधून राष्ट्रीय महामार्गासाठी  पाणी सोडण्याचे आदेश तुम्हाला कोणी दिले असा प्रश्न ज्येष्ठ आमदार गणपत देशमुख, आमदार नाना भालके यांनी केला. घडलेल्या प्रकरणाची त्वरीत चौकशी करून संबंधित अधिकारींवर कारवाई करून ते पाणी त्वरीत थांबवावे अशी मागणी देशमुख यांनी पालकमंत्र्यासह, जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्याकडे केली. 

  चौकशी करून दोंषीवर कारवाई करणार

सांगोल्यातील शिरभावी योजनेतील पाणी कुठे वापरले याची चौकशी करून घेतो.  अधिकाऱयांना याविषयी तात्काळ अहवाल सादर करण्यास सांगिते आहे.  लवकरच एमजीपी विभागाची बैठक घेणार असून  या प्रकरणात कोणी दोषी असेल त्यावर कारवाई करणार. संबंधित विभागाला पाणी पुरवठा बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहे.