|Monday, June 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » महापालिका सहाय्यक आयुक्तांना बेदम मारहाण

महापालिका सहाय्यक आयुक्तांना बेदम मारहाण 

प्रतिनिधी/ कुपवाड

विनापरवाना बांधकामाच्या तक्रारी अर्जावरुन चौकशी करण्यासाठी गेले असता ‘तू मला कोण विचारणार?’ असे म्हणून एकाने कुपवाड महापालिकेचे सहा. आयुक्त गौतम भिसे यांना शिवीगाळ, धक्काबुक्की व बेदम मारहाण करुन जखमी केल्याचा खळबळजनक प्रकार शुक्रवारी कुपवाडमधील रामकृष्णनगर येथे घडला. यावेळी त्या तरुणाने हातात तलवार घेऊन अन्य दोघा अधिकाऱयाच्या अंगावर धावून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांत गेल्यास विनयभंगाची तक्रार देण्याची धमकी तरुणाच्या आईने दिली.

 हा प्रकार शुक्रवारी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास घडला असून याबाबत कुपवाड पोलिसांत नोंद झाली आहे. याप्रकरणी संशयीत रणजीत महादेव माहिमकर (22) व त्याची आई श्रीमती विद्या महादेव माहिमकर (46, दोघे रा.रामकृष्णनगर, कुपवाड) या दोघांना पोलिसांनी सायंकाळी अटक केली आहे. त्यांच्याविरोधात सहा. आयुक्त गौतम भिसे यांनी फिर्याद दिली आहे. दोघांवर सरकारी कामात अडथळा आणणे तसेच शासकीय अधिकाऱयांना मारहाण करुन जखमी करणे व तलवार घेऊन अधिकाऱयांच्या अंगावर धावून गेल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कुपवाडचे सहा.आयुक्त गौतम भिसे यांच्याकडे श्रीमती पुष्पा चंद्रकांत बागेवाडी (रा.कोल्हापुर) यांनी रामकृष्णनगर येथे सर्व्हे नंबर 302/अ/2 मधील मिळकतीवर अतिक्रमण करुन बांधकाम केल्याची तक्रार केली होती. त्यानुसार सहा.आयुक्त भिसे, शाखा अभियंता ए. पी. मगदूम व स्वच्छता निरीक्षक याकुब मद्रासी हे तिघे शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास मनपाच्या वाहनातुन रामकृष्णनगर येथे संबंधीत जागेवर गेले. यावेळी भिसे यांनी तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने त्या जागेवर उपस्थित असलेले रणजीत माहिमकर व त्याची आई विद्या माहिमकर यांच्याकडे घर बांधकामाचा परवाना आहे का? असे विचारले. यावेळी रणजीतने भिसे यांना ‘तू मला विचारणारा कोण?’ असे म्हणून शर्टाच्या कॉलरला धरुन खाली पाडून बेदम मारहाण केली. यात भिसेंच्या डाव्या हातावर गंभीर दुखापत होऊन रक्तस्त्राव झाला. त्यानंतर रणजीतने घरातुन तलवार आणुन शाखा अभियंता मगदूम व निरीक्षक मद्रासी यांच्या अंगावर धावून पाठलाग केला. त्यामुळे ते दोघे भितीने पळुन गेले. यावेळी विद्या माहिमकर या तिघा अधिकाऱयांना शिवीगाळ करत होत्या. ‘तुम्ही पोलिसांकडे गेलात, तर तुमच्या विरोधात विनयभंगाची तक्रार करीन’, अशी धमकी दिली. यावेळी भांडण सोडविण्याचा प्रयत्न करणाऱया पुष्पा बागेवाडी व त्यांचे पती चंद्रकांत बागेवाडी यांनाही शिवीगाळ करुन मारहाण केली. घटनेनंतर सहा.आयुक्त भिसे यांनी कुपवाड पोलिसांत धाव घेवुन रणजीत माहिमकर व विद्या माहिमकर यांच्याविरोधात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी दोघांवर गुन्हे दाखल करुन अटक केली. अधिक तपास पो.उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे करीत आहेत.