|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » मल्लेवाडीत सशस्त्र दरोडा

मल्लेवाडीत सशस्त्र दरोडा 

प्रतिनिधी/ मिरज

दरोडेखोरांच्या टोळीने गुरूवारी मध्यरात्री मल्लेवाडी येथील बाळासाहेब धनपाल पाटील यांच्या शेतातील घरावर सशस्त्र दरोडा टाकला. यावेळी चाकूने मारल्याने महावीर पाटील यांच्यासह काही महिला जखमी झाल्या. दरोडेखोरांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा सुमारे एक लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. दरम्यान, पोलिसांनीही रात्रीच कोम्बिंग ऑपरेशन राबवून एका अट्टल दरोडेखोराला अटक केली. यावेळी पारधी वस्तीवरुन पोलिसांवर दगडफेक झाल्याने दोन पोलीस कर्मचारीही जखमी झाले. अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांनी घटनास्थळी भेटी दिल्या.

मल्लेवाडी गावच्या हद्दीत मल्लेवाडी-बेडग रोडवर बाळासाहेब धनपाल पाटील यांचे शेतात घर आहे. या घरावर गुरूवारी मध्यरात्रीच्या सुमारास सात ते आठ जणांच्या दरोडेखोरांच्या टोळीने सशस्त्र दरोडा टाकला. प्रारंभी त्यांनी घराचा दरवाजा वाजवून तो उघडण्यास सांगितले. पण, आतून विरोध होताच, त्यांनी मोठी दगडे घालून दरवाजा तोडला व खिडक्यांच्या काचा फोडल्या. आत प्रवेश करुन त्यांनी शस्त्राचा धाक दाखवित महिलांच्या गळ्यातील गंठण आणि अन्य दागिने काढून घेतले. यावेळी त्यांनी महिलांना जीवे मारण्याची धमकी दिली. यावेळी महावीर पाटील आणि त्यांच्या आईने दरोडेखोरांना विरोध करताच त्यांच्या पायावर चाकूने भोकसण्यात आल्याने ते गंभीर जखमी झाले.

दरोडेखोरांनी आतील तिजोऱया आणि कपाटे फोडून त्यातील रोख रक्कम, मौल्यवान वस्तू, चांदीचे दागिने असा सुमारे एक लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. यावेळी घरातील सर्वच साहित्य विस्कटून टाकण्यात आले. सहा ते सात दरोडेखोर असून, प्रत्येकांच्या हातात हत्यारे होती. ते सतत जीवे मारण्याची धमकी देत होते. याशिवाय बाहेर तिघेजण थांबल्याचे पाटील कुटुंबियांकडून सांगण्यात आले. महावीर पाटील यांच्या मांडीवर खोलवर जखम झाल्याने घरात सर्वत्र रक्त पसरले होते. याशिवाय मोठी दगडे घालून कपाटे तोडण्यात आल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

दरोडा पडण्यापूर्वीच त्याची चाहुल पाटील कुटुंबीयांना लागली होती. रात्री 12च्या सुमारास काहीजणांच्या घरासभोवतील हालचाली सुरू असल्याचा संशय त्यांना आला होता. त्यामुळे त्यांनी दरोडा पडण्यापूर्वीच ग्रामीण पोलीस आणि गावातील काही महत्त्वाच्या लोकांना मोबाईलवरुन या प्रकाराची माहिती कळविली होती. यामुळे पोलिसांसह गावातील काही लोकही या मळ्याकडे जाण्यास रवाना झाले होते. पण, यासाठी एक तासाचा कालावधी गेल्याने यावेळेत दरोडेखोर आपला सर्व कार्यभार उरकून पसार झाले होते. त्यांनी आपले तोंड वेगवेगळ्या रंगाच्या कपडय़ांनी बांधून घेतले होते.

या प्रकाराची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांचे पथक रात्रीतच घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी घडल्या प्रकाराची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱयांना दिल्याने तात्काळ श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले होते. श्वानपथकाने रात्री बेडग आडव्या रस्त्यापर्यंतचा मार्ग दाखविला. या आडव्या रस्त्यापासून काही अंतरावरच फासेपारध्यांची वस्ती आहे. त्यामुळे पोलिसांनी या वस्तीवर तात्काळ कोंबिंग ऑपरेशन राबविण्यास सुरूवात केली. त्याला प्रतिकार म्हणून पारधी वस्तीवरुन पोलिसांवर आणि त्यांच्या वाहनांवर जोरदार दगडफेक झाली. यामध्ये पोलीस कर्मचारी किशोर कदम व विनोद कदम हे जखमी झाले. यावेळी एका अट्टल दरोडेखोरास पोलिसांनी ताब्यात घेतले. शुक्रवारी त्यास अटक करण्यात आली. पोलीस आणि गाडीवर दगडफेक केल्याप्रकरणी पाच महिलांनाही पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी अट्टल फरारी दरोडेखोर कल्लू भोसले यास अटक केली. बेळंकीत दोन महिलांचा खून करुन त्यांच्या अंगावरील दागिने लंपास केल्याप्रकरणी कल्लू भोसले याच्यावर पोलिसांचा संशय आहे. तेव्हापासून तो पसारच होता. कोम्बिंग ऑपरेशनात तो पोलिसांच्या हाती लागला. मल्लेवाडीतील दरोडा प्रकरणात या आरोपींचा सहभाग असल्याचा संशय आहे. या प्रकारामुळे मल्लेवाडी आणि परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मळाभागातील अनेक शेतकरी कुटुंब तर भयभीत झाले आहेत. मल्लेवाडीतील प्रकाराची राहुल पाटील यांनी ग्रामीण पोलिसांत फिर्याद दिली आहे. दरम्यान, पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, उपाधीक्षक अनिल पोवार, निरीक्षक संदीप कोळेकर यांच्यासह अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांनी घटनास्थळी भेट देऊन कारवाईबाबत योग्य त्या सूचना दिल्या.

दरोडेखोरांचे मिरज पूर्वभाग टार्गेट

दरोडेखोरांनी मिरज पूर्व भागातील मळाभागातील घरे हे दरोडय़ाचे टार्गेट बनविले आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी मालगांव येथे मळाभागात अशाच स्वरुपाचा दरोडा टाकून घरातील लोकांना मारहाण करीत मौल्यवान ऐवज लंपास केला होता. त्यानंतर गुरूवारी त्यांनी मल्लेवाडीत दरोडा टाकून दोघांना चाकूने मारहाण करण्याबरोबर आतील मौल्यवान ऐवज लंपास केला. मालगावमधील चोरटे अद्याप पोलिसांच्या हाती लागले नाहीत. यावरुन दरोडेखोरांनी मिरज पूर्व भागात टार्गेट केल्याचे दिसते.