|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » शेतकऱयांच्या संरक्षणासाठी डबलबार बंदूक

शेतकऱयांच्या संरक्षणासाठी डबलबार बंदूक 

प्रतिनिधी/ मिरज

मल्लेवाडी येथे गुरूवारी रात्री बाळासाहेब पाटील यांच्या घरावर पडलेल्या सशस्त्र दरोडय़ा प्रकरणी या भागातील संतप्त आणि भयभीत नागरिकांनी शुक्रवारी ग्रामीण पोलिस ठाण्यात अधिकाऱयांना घेरावो घातला. मळ्यात राहणाऱया शेतकऱयांच्या संरक्षणासाठी आता डबलबार बंदुकीचा परवाना द्यावा, अशी जोरदार मागणी करण्यात आली. शेतकऱयांनी संरक्षणासाठी योग्य कागदपत्रांच्या पूर्ततेसह मागणी केल्यास त्यांना डबलबार बंदुकीचा परवाना देऊ, असे आश्वासन पोलीस उपाधीक्षक अनिल पोवार यांनी या नागरिकांना दिले. जिल्हा बँक संचालक बाळासाहेब होनमोरे यांनी यावेळी शेतकऱयांच्यावतीने बाजू मांडली.

जिह्यात मिरज पूर्व भागातील गावांमध्ये सशस्त्र दरोडय़ाचे प्रमाण वाढले आहे. काही दिवसापूर्वी मालगाव आणि परिसरातील चार घरांवर सशस्त्र दरोडा टाकून चोरटय़ांनी अनेकांना मारहाण करीत लाखो रुपयांचा मौल्यवान ऐवज लंपास केला होता. हे चोरटे अद्याप पोलिसांच्या हाती लागले नाहीत. या प्रकारामुळे पूर्वभागात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. गुरूवारी मध्यरात्री मल्लेवाडी येथील मालगाव रोडवर शेतात राहणाऱया बाळासाहेब धनपाल पाटील यांच्या घरावर सहा ते सात दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकला. यामध्ये चोरटय़ांनी रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने लंपास केले.

दरोडेखोरांकडून दरोडा टाकण्यापूर्वी दहशतीचे वातावरण निर्माण केले जाते. घराच्या दरवाजावर मोठी दगडे घालून ती मोडली जातात आणि आतील लोकांना शस्त्रांचा धाक दाखवून, वेळप्रसंगी धारदार शस्त्राने मारहाण करीत गंभीर जखमी करुन दरोडा टाकला जातो. यावेळी घराचीही मोठय़ा प्रमाणात नासधूस केली जाते. मालगांव आणि मल्लेवाडीमध्ये अशाच पध्दतीने दरोडेखोरांनी दरोडा टाकून मौल्यवान ऐवज लंपास केला. यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. शुक्रवारी जिल्हा बँक संचालक बाळासाहेब होनमोरे यांच्या पुढाकाराने रावसाहेब दरुरे, रवींद्र हुळ्ळे, रविंद्र किनींगे, अरुण जाधव, विश्वास पाटील, लक्ष्मण पाटील, गुंडाप्पा उगारे, खंडू पाटील, प्रकाश क्षिरसागर, अण्णासाहेब पाटील, सुनील गुळवणे, स्वराज्य पाटील, दस्तगीर मुजावर, समीर जमादार, बाळासाहेब साळुंखे, महावीर किनींगे, धनराज सातपूते, सुजित लकडे अशा अनेकांनी पोलीस उपाधीक्षक अनिल पोवार यांची भेट घेऊन गाऱहाणे मांडले.

शेती व्यवसायामुळे अनेकजण मळाभागात राहतात, त्यामुळे त्यांच्या संरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर येतो. दरोडेखोर याचा गैरफायदा घेउढन रोख रक्कमेसह मौल्यवान वस्तू, शेळ्या-मेंढय़ा, गायी, म्हैशी, विहिरीवरील मोटर चोरुन नेताना दिसतात. त्यामुळे या शेतकऱयांना आता संरक्षणासाठी डबलबार बंदूक परवाना द्यावा, अशी मागणी बाळासाहेब होनमोरे यांनी दिली. शेतकऱयांनी योग्य कागदपत्रांची पूर्तता करुन मागणी करावी, वरिष्ठ अधिकाऱयांसमवेत त्याची छाननी करुन परवाना देण्याबाबत विचार करु, अशी हमी उपाधीक्षक अनिल पोवार यांनी दिली. यावेळी पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे, संदीप कोळेकर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. शेतकऱयांनी टिकाव, फावडे, पार, कुऱहाड, विळे, खुरपी ही शेती उपयोगी हत्यारे आता घराबाहेर न ठेवता घरात ठेवावी. ज्यामुळे अशा आणीबाणीच्यावेळी त्याचा स्वरक्षणासाठी वापर करता येईल. शिवाय घराच्या दरवाजाला आता लोखंडी ग्रील बसवावे, असे आवाहन पोलीस अधिकाऱयांनी केले.