|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » कुस्तीक्षेत्रात अजुनही धुमसताहेत आठवणींचे निखारे!

कुस्तीक्षेत्रात अजुनही धुमसताहेत आठवणींचे निखारे! 

वांगी जवळील पैलवानांच्या अपघाताचा काळा दिवस

फिरोज मुलाणी/ औंध

12 जानेवारी 2018 हा दिवस कुस्ती शौकीनासाठी एक काळाकुट्ट दिवस ठरला होता. औंधच्या कुस्ती मैदानात मर्दुमकी गाजवून विजयी मुद्रेने माघारी फिरणाऱया  कुंडलच्या क्रांती कुस्ती संकुलातील पाच उमद्या मल्लांवर काळाने झडप घातली होती. या घटनेला आज एक वर्ष झाले तरी देखील कुस्ती शौकिनांच्या मनात या घटनेच्या आठवणींचे निखारे अद्यापही धुमसत आहेत.

    कुंडलच्या क्रांती कुस्ती संकुलातील पैलवानांनी दिवसभर प्रवास करुन औंधचे मैदान गाठले. मैदानात कुस्त्याही लागल्या. आपल्या कर्तृत्वाने मैदानात प्रतिस्पर्धी मल्लावर नेत्रदीपक विजय मिळवून मल्लांनी मर्दुमकी गाजविली. रात्री मित्र आणि नातेवाईक यांच्या घरी झालेल्या जेवणामुळे तृप्तीचा ढेकर देऊन भरल्या मनाने औंधकरांचा निरोप घेऊन गाडीने परतीच्या दिशेने कुंडलकडे प्रयाण केले होते. 

  मैदानातील कुस्तीमुळे कष्टाने शरीर थकून गेले होते. आणि पोटात दोन घास गेल्यामुळे गाडीत डोळे झाकले. मैदानातील कुस्तीचा पट डोळ्यासमोरून जात होता. विजयाची नवीन स्वप्ने डोळ्यांत साठवुन आनंदाने जात असताना अचानक वांगी (ता. कडेगांव) जवळ जीप आणि ट्रक्टरचा भीषण अपघात झाला. आणि क्षणात होत्याचे नव्हते झाले होते. डोळ्यात साठवलेल्या स्वप्नांचा चक्काचूर झाला होता. नव्या दमाच्या पै. सौरभ माने (मालखेड ता. कराड), पै. शुभम घार्गे (सोहोली ता. कडेगाव जि. सांगली), पै. विजय शिंदे (रामापूर ता. कडेगाव जि. सांगली), पै.आकाश देसाई (काले ता.कराड जि.सातारा), पै.अविनाश गायकवाड फुफिरे ता.शिराळा जि. सांगली हे उमद्ये मल्ल जागीच ठार झाले तर जखमी मल्लांची दवाखान्यात मृत्युशी झुंज सुरू होती. घटनास्थळी रक्तमासांचा चिखल झाला होता. वास्तविक दररोज आखाडय़ात सराव करणाऱया आपल्या सहकारी मल्लांवर अचानक झालेल्या आघाताने अनेक मल्ल उन्मळून पडले होते. तर क्रांती कुस्ती संकुलावर एक प्रचंड आघात झाला होता. रात्री उशिरा झालेली घटना जेव्हा सकाळी अनेकांना समजली तेव्हा कुस्ती शौकीनांसह औंधच्या ग्रामस्थांना या घटनेचा मोठा धक्का बसला होता. आदल्या दिवशी ज्या विजयी मल्लांची नेत्रदीपक कामगिरी पाहून टाळ्या वाजवून मैदानात कौतुक केले. त्याच औंधमधील ग्रामस्थांवर दुसऱया दिवशी सकाळी शोकसभा घेऊन घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मल्लांना श्रद्धांजली अर्पण करण्याची वेळ आली होती. पैलवान आणि कुस्ती क्षेत्रातील तमाम कुस्ती शौकीन पालकांना या ह्रदयद्रावक घटनेची मनाला हुरहूर लागून गेली होती. अनेक मल्ल आणि पालक या घटनेतून अद्याप सावरलेले नाहीत. गेली वर्षभर सातत्याने कुस्ती मैदानात या घटनेच्या आठवणी जाग्या होत होत्या. त्यामुळे या आठवणींचे निखारे अद्यापही धुमसत आहेत. 

      तो दिवस विसरुच शकत नाही.

 गेल्या वर्षी औंधचे मैदान अतिशय नेटके झाले होते. यामुळे मी आनंदी होते.  आखाडय़ात विजयी झालेले मल्ल जेवण करून राजवाडय़ात मला भेटून गेले होते. यामध्ये कुंडलच्या तालमीतील पैलवान देखील होते. परंतु जेव्हा सकाळी मला दुर्देवी घटना समजली तेव्हा प्रचंड धक्का बसला. हा दिवस मी कधीच विसरु शकत नाही.

  गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी

 चीफ ट्रस्टी श्री यमाई देवस्थान औंध. 

        घटनेमुळे आजही अंगावर शहारे येतात

     वांगीजवळ पैलवानांच्या गाडीला अपघात झाल्याची बातमी रात्री समजताच तडक घटनास्थळी धाव घेतली आणि मिरजेच्या मिशन हॉस्पिटलमध्ये जखमी मल्लांवर उपचारासाठी मदतीची धावाधाव सुरू होती. घटनास्थळावरील दृश्य आणि नातेवाईक पालकांचा आक्रोश काळजी पिटाळून टाकत होता. ती घटना आजही आठवली तर अंगावर शहारे येतात.

 चंद्रहार पाटील डबल महाराष्ट्र केसरी.