|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » मोहाट पुलावरून उडी घेऊन विद्यार्थ्याची आत्महत्या

मोहाट पुलावरून उडी घेऊन विद्यार्थ्याची आत्महत्या 

प्रतिनिधी/ मेढा

मेढा (ता. जावळी) येथील फॉर्मसी कॉलेजमध्ये डिप्लोमाच्या दुसऱया वर्षात शिकणाऱया नकुल बालाजी दुबे या विद्यार्थ्याने शुक्रवारी दुपारी 12 च्या सुमारास मेढा मोहाट पुलावरून उडी मारून वेण्णा जलाशयात आत्महत्या केली असल्याची घटना घडली. महाबळेश्वर ट्रेकर्स व सहय़ाद्री ट्रेकर्सची शोधमोहिम रात्री उशिरापर्यंत सुरू होती. परंतु मृतदेह मिळून आलेला नाही.

  या घटनेमुळे मेढा व परिसरात तसेच कॉलेजमध्ये खळबळ उडाली आहे. नकुल दुबे हा परभणीचा राहणारा असून गेले दोन वर्षापासून तो मेढा येथे शिकत होता. शुक्रवारी सकाळी 10 ते 10.30 च्या दरम्यान तो कॉलेजमध्ये गेला होता. जेमतेम एक तासभर क्लासमध्ये बसल्यानंतर त्यांच्याच क्लासमधील त्याचा मित्र वाळणे याला नाष्टय़ाला जावू म्हणून मेढा बाजारपेठेत घेवून आला. व पुढे फोटोच्या निमित्ताने मेढा मोहाट पुल गाठला. मित्राला फोटो काढण्यास सांगून नकुल पुलाच्या कठडय़ाला धरून उभा राहिला त्याचा मित्र व त्याने मनसोक्त फोटो काढले. दरम्यान, हे तुझ्यासाठी गिफ्ट म्हणत एक चिट्टी हातात कोंबली. व कठडय़ाचा हात सोडून पाण्यात पाठमोरी उडी घेतली. नकुल बरोबर असणाऱया मित्राला काही करावे कळले नाही. त्याने आरडाओरडा केला पण मदतीला कोणी धावले नाही. शेवटी त्याने कॉलेज गाठले व घडला प्रकार कॉलेजमध्ये सांगितला तेव्हा पळापळ झाली. सकाळपासुन घटनास्थळी कॉलेजचे अध्यक्ष सुधीर पवार, त्यांचा सर्व स्टाफ, पोलीस व युवक यांनी हजेरी लावली होती. 

   या घटनेमुळे त्याच्या मित्राने चांगलाच धसका घेतला आहे. पोलिसाने नकुलच्या मित्राचा मोबाईल ताब्यात घेतला असून मित्राचीही चौकशी केली आहे. या प्रकारामुळे उलट सुलट चर्चा सुरू आहे. आज माझा मित्र येणार आहे तेव्हा एक जादा जेवण ताट बनवा असे नकुलने सकाळीच मेसमध्ये सांगून ठेवले होते.

  नकुल दुबेच्या घरची परिस्थिती बेताची असून वडील आजारी असतात. आई वृध्द असून मोठा भाऊ मेडिकल चालवतो. घटनेची माहिती पोलिसांनी फोनवरून नातेवाईकांना पाठविली तेव्हा त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला.

 रात्री उशिरापर्यंत पोलीस व टेकर्सचे कार्यकर्ते नकुलची बॉडी शोधण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना स्थानिक युवकही सहकार्य करत होते. घडल्या प्रकारामुळे मेढा व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

      रक्तदानाची इच्छा अपूर्ण 

 दोनच दिवसापूर्वी नकुलचा वाढदिवस झाला. त्यादिवशी त्याला रक्तदान करायचे होते. मात्र ते काही कारणास्तव करता आले नाही तर दि. 10 रोजी कॉलेजला दांडी मारून दिवसभर रूमवरच होता. शांत संयमी असणारा नकुल गेले दोन तिन दिवस डिर्स्टब असल्यासारखा वाटत होता असे हॉस्टेल चालकांनी सांगितले.  

आत्महत्येस कोणास जबाबदार धरू नये

माझ्या आत्महत्येस कोणासही जबाबदार धरू नये असे त्याने मित्राकडे आत्महत्त्ये पूर्वी दिलेल्या चिठ्ठीत लिहिले आहे. ती चिठ्ठी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. रात्री उशिरापर्यंत सह्याद्री टेकर्स व महाबळेश्वर टेकर्स यांच्या मदतीने शोधमोहीम सुरूच होती.

 शांत, संयमी अन् हुशार

 नकुल हा कॉलेजमध्ये शांत व सयमी वागायचा, वर्गात तो हुशार असून नेहमी परीक्षेत पहिल्या तीनमध्ये असायचा. असे काही होईल असे स्वप्नातही वाटले नाही अशी प्रतिक्रिया कॉलेजचे प्राचार्य श्री. देशमुख यांनी व्यक्त केली.