|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » नंदादीप केमिकल्समध्ये वायूगळती

नंदादीप केमिकल्समध्ये वायूगळती 

वार्ताहर/ लोटे

खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील नंदादीप केमिकल्स प्रा. लि. कंपनीच्या युनिट 2मधून ओलियम वायूची गळती झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी 11.30 वाजता घडली. मात्र या वायूगळतीत कोणासही इजा पोहोचली नाही. लोटेमाळ परिसरातील ग्रामस्थांना श्वासोच्छवास घेण्यास त्रास झाल्याने त्यांनी आक्रमक भूमिका घेत कंपनीच्या प्रवेशद्वारावर धडक दिली.

कंपनीत झालेल्या वायूगळतीवर तब्बल अडीच तासांनी नियंत्रण मिळवण्यात यश आले. औद्योगिक सुरक्षेविषयक यंत्रणा व सामुग्रींचा अभाव तसेच व्यवस्थापनाची सुरक्षेविषयीच्या उदासीनतेमुळे वायूगळतीवर तत्काळ नियंत्रण मिळवणे शक्य झाले नसल्याचे यावेळी दिसून आले. कंपनीने संबंधित यंत्रणेला न कळवल्याने संतप्त ग्रामस्थांनी हंगामा केला.

जिल्हा पर्यावरण समितीचे सदस्य व लोटेतील ग्रामस्थ चंद्रकांत चाळके यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून कोल्हापूर येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विभागीय अधिकाऱयांना घटनेची माहिती दिली. लोटे येथे भेटीवर असलेले विभागीय अधिकारी लोहाळकर यांनी घटनास्थळी तातडीने भेट दिली. लोहाळकर यांनी कंपनीची पाहणी करून वायूगळतीचा अहवाल पूर्ण होईपर्यंत उत्पादन बंद ठेवण्याचे आदेश दिले.