|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » प्रगतीसाठी मानवी व तंत्रज्ञानाच्या क्षमतेच्या एकत्रिकरणाची गरज

प्रगतीसाठी मानवी व तंत्रज्ञानाच्या क्षमतेच्या एकत्रिकरणाची गरज 

प्रतिनिधी/ मडगाव

मानवी क्षमता आणि तंत्रज्ञानाची क्षमता यांचे एकत्रिकरण करुन मानवाला आता  प्रगती साधायची आहे. मात्र, तंत्रज्ञानाने मानवावर मात करता कामा नये. माणसाचे नियंत्रण हे तंत्रज्ञानावर असावे आणि 21 व्या शतकामध्ये यावर जास्तीत जास्त लक्ष केंदेंत करावे लागणार असल्याचे विधान राष्ट्रीय पातळीवरचे शिक्षणतज्ञ, अनेक शोध निबंधाचे लेखक तसेच जपानातील क्युबा विद्यापिठाचे अभ्यागत प्राध्यापक डॉ. पंडित  विद्यासागर यांनी केले.

मडगावच्या गोमंत विद्या निकेतन या संस्थेने आयोजित केलेल्या ‘विचारवेध’ व्याख्यानात डॉ. विद्यासागर शुक्रवारी बोलत होते. ‘विज्ञान आणि विज्ञानप्रसार’ हा त्यांचा विषय होता.

मानवी क्षमता जास्तीत जास्त यंत्रामध्ये आणण्याचा मनुष्य प्रयत्न करीत आहे. प्रत्यक्षात, मानवी मेंदुची क्षमता प्रचंड असली तरी काळाबरोबर मानवी क्षमता कमी कमी होत चालेली आहे. संवेदना हा जर आपण अभ्यासासाठी विषय घेतला तर संवेदनाच्या बाबतीत इतर प्राण्यापेक्षा आपण खुपच मागे आहे. आपण जास्तीत जास्त 20 किलोहर्टझ एवढेच ऐकू शकतो. मात्र, कुत्र्याची ऐकण्याची क्षमता माणसापेक्षा जास्त आहे. वटवाघुळाची ऐकण्याची क्षमता 120 किलोहर्टझ इतकी आहे. याचाच अर्थ आपण ऐकण्याच्या बाबतीत खूप कमी आहोत. पाहण्याच्या बाबतीतही आपण मागे आहोत. एका ठरावीक कोनाइतकेच आपण पाहु शकतो. त्याच्या पलिकडे नाही. मात्र, काही प्राण्यांचे डोळे 360 अंशही फिरतात. लांब असलेली एखादी वस्तू आपण पाहू शकतो. मात्र ती वस्तू आपल्याला आहे त्या जागेवरुन मोठी करता येत नाही. मात्र गिधाडामध्ये ही क्षमता आहे. उंचावरुन हे गिधाड खाली गवतात हालचाल दिसली की तो उंदीर की आणखी काय हे तो गवताचा भाग मोठा करुन ते गिधाड पाहू शकते. काही काळापुर्वी इंडोनेशियामध्ये त्सुनामी आली त्यावेळी तेथील एकही प्राणी मृत झाला नाही. फक्त माणसांची हानी झाली. संवेदनाच्या बाबतीत आपण इतर प्राण्यापेक्षा मागे असलो तरी मानवी मेंदुची क्षमता इतर सर्व प्राण्यापेक्षा जास्त आहे तसेच संगणकापेक्षाही जास्ती आहे  आणि ही मानवी क्षमता यंत्रामध्ये कशी य्xईल याचे सध्या संशोधन चालू आहे असे डॉ. विद्यासागर यांनी यावेळी सांगितले.

विज्ञानामुळे संशोधन वाढते आणि त्यातून अनेक चांगल्या गोष्टींची उत्पत्ती झाली हे जरी बरोबर असले तरी याच विज्ञानाची दुसरी बाजु म्हणजे शस्त्रास्त्रे होय. आज हीच शस्त्रास्त्रs माणसांचा संहार करण्यासाठी वापरली जात आहे ही या विज्ञानाची दुसरी बाजु आहे, ते म्हणाले.

 रसायनशास्त्राचा विकास झाला आणि त्यामुळे मानवाच्या कल्याणासाठीच्या काही घटना घडल्या. रसायन शास्त्रामुळे व जीवशास्त्र विविध पद्धतीचे कपडे तयार झाले, जीवनमान वाढले. शिवाजी महाराज अवघे 50 वर्षे जगले. आज माणूस 80-90 वर्षे जगत आहे ती किमया याच शास्त्राची. आज लोकसंख्या वाढत आहे आणि इतक्या लोकांची भूक शमविण्यासाठी ‘जेनेटिकल्ली मोडय़ुलर फूड’ चा आता आधार घ्यावा लागत आहे. चीनने आता ‘जेनेटिकल्ली मोडय़ुलर मूल’ तयार केल्याचा दावा केला आहे, अशी माहितीही डॉ. विद्यासागर यांनी यावेळी दिली.

एक रॉबर्ट दुसऱया रॉबर्टला प्रशिक्षण कसा देईन याचा अभ्यास सध्या इस्त्राईल देशात चालू आहे अशी माहितीही त्यांनी दिली.

व्यक्तीनिरपेक्ष विचार आपण जोपर्यंत करीत नाही तोपर्यंत आपला समाज पुढे जाऊ शकत नाही असे सांगून विदेशात एकही कर्मचारी नसताना ट्रम कशा चालतात तसेच इतर वाहने कशी चालतात याचे उदाहरण त्यांनी दिले आणि याचे सारे श्रेय विज्ञानाला जाते, ते म्हणाले.

 

‘नाव दर्शवते फक्त ओळख, कर्तुत्व नव्हे’

डॉ. पंडित भालचंद्र विद्यासागर या नावासंबंधी एका प्रेक्षकाने विचारणा केली तेव्हा पंडित हे नाव आपल्याला कर्तुत्व नसताना मिळालेली बाब आहे. पंडित हे नाव आई -वडिलांनी ठेवले. ते नाव का ठेवले हे माहित नाही. मात्र, कोणाचेही नाव ही फक्त ओळख दर्शवते, कर्तुत्व नव्हे’ असे डॉ. विद्यासागर यांनी सांगितले तेव्हा त्यांच्या या प्रामाणिक उत्तराला पेक्षकांनी टाळय़ा वाजवून प्रतिसाद दिला.

सुरुवातीला, गोमंत विद्या निकेतन संस्थेचे अध्यक्ष जनार्दन वेर्लेकर यांनी डॉ. विद्यासागर यांना पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन स्वागत केले. प्रेक्षकांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना व्याख्यात्यानी समाधानकारक उत्तरे दिली.