|Monday, June 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » रानटी प्राण्यासाठी केलेल्या गोळीबारात घराच्या काचा फुटल्या

रानटी प्राण्यासाठी केलेल्या गोळीबारात घराच्या काचा फुटल्या 

वार्ताहर/ लाटंबार्से

डिचोली तालुक्यातील जंगली भागात सध्या रानटी जनावरांच्या शिकारीत मोठय़ा प्रमाणात वाढ झालेली असून केबलचे फासे, जिलेटीन बाँब तसेच काडतूस बंदुकीनेही जनावरांची रात्रीच्या वेळी शिकार होत असल्याची चर्चा सध्या परिसरात होत आहे. रविवारी 6 रोजी रात्री रानटी जनावरांची शिकार करताना कारतुसच्या बंदुकीतून केलेल्या गोळीबारात नानोडा-उसप येथील एका घराच्या काचा फुटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

 शिकारीमुळे अनेक वेळा पाळीव प्राण्यांना आपला जीव गमवावा लागल्याची अनेक उदाहरणे आपल्यासमोर आहेत. या वाढत्या प्रकारांबद्दल वनखाते सुस्तच असल्याचे दिसून येत आहे. लोकवस्तीपासून अवघ्या अंतरावरील जंगल भागात  राजरोसपणे काडतूस बंदुकीने तसेच अन्य प्रकारच्या घातक प्रयोगातूनही शिकार होत असल्याने त्याचा पाळीव प्राण्यांबरोबर मानवी जीवनालाही मोठा धोका निर्माण झाला आहे.

  रविवारी 6 रोजी रात्री 10.30 च्या सुमारास रानटी प्राण्यासाठी काडतूस बंदुकीतून केलेल्या गोळीबारात नानोडा-उसप येथील लोकवस्तीतील मृदुला महेंद्र किनळेकर यांच्या घराच्या मागील बाजूच्या खिडकीच्या काचा फुटल्या. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे. या प्रकारापूर्वी मृदुला किनळेकर त्याठिकाणाहून निघून गेल्या होत्या. याप्रकरणाची माहिती किनळेकर कुटुंबाने डिचोली पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन या प्रकरणी गुन्हा नोंद करून सदर ठिकाणाचा पंचनामा केला.

काडतुसचे तुकडे जप्त

   घटनास्थळी सापडलेले काडतुसचे तुकडे पोलिसांनी जप्त करून चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले आहेत. घराच्या खिडकीच्या काचा खरोखरच गोळीबारानेच  फुटल्या की अन्य प्रकाराने याबद्दल साशंकता असून त्यादृष्टीनेही तपास सुरू आहे. मात्र या घटनेला सामोरे गेलेल्या कुटुंबाने जंगली प्राण्याच्या शिकारीसाठी केलेल्या गोळीबारात सदर प्रकार घडला असावा अशीही शंका व्यक्त केली आहे. पोलीस निरीक्षक संजय दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रीतेश मडगावकर अधिक तपास करीत आहेत.

   गेल्या महिन्यात कोल्हय़ाचा मृत्यू

   रानडुकरासाठी लावलेल्या केबल रोपच्या फासात अडकून एका कोल्हय़ाचा मृत्यू झाल्याची घटना गेल्या महिन्यातच खोलपे-साळ येथे घडली होती. कोणताही विपरित प्रकार घडण्यापूर्वी अशी घटना पुन्हा घडू नये तसेच या शिकारीच्या प्रकारामुळे मानवी जीवनावर परिणाम होवू नये याची गांभीर्याने काळजी वनखात्यासह पोलीस खात्यानेही घेणे गरजेचे आहे, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

 वनखात्याने सतर्क रहावे : संजय शेटये 

पाळीव तसेच वन्य पाण्याची हत्या करणे हा गुन्हा आहे. तसेच वन्य प्राण्यांमुळे शेतकऱयांच्या होणाऱया नुकसानीवर वन्य खात्याने सतर्क असणे गरजेचे असल्याचे मत  लाटंबार्से जिल्हा पंचायतीचे सदस्य संजय शेटये यांनी व्यक्त केले.

  परिसरात मोठय़ा प्रमाणात शिकार : प्रशांत घाडी

  रानटी जनावरांची शिकार करणे हा अदखलपात्र गुन्हा असून परिसरात मोठय़ा प्रमाणात रानटी जनावरांची शिकार होत असल्याचे दिसून येत आहे. या घडलेल्या प्रकारामुळे रानटी जनावरांबरोबर मानवी जीविताला धोका होवू शकतो. असे प्रकार घडू नये यासाठी वनखात्याने लक्ष देणे गरजेचे असल्याचे लाटंबार्से पंचायतीचे सरपंच प्रशांत घाडी यांनी सांगितले.