|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » अर्ज न करताच आयुष्यमान भारत योजनेंतर्गत निवड

अर्ज न करताच आयुष्यमान भारत योजनेंतर्गत निवड 

बेळगाव / प्रतिनिधी

एकीकडे आरोग्य कार्ड मिळविण्यासाठी शहरातील बेळगाव वन केंद्रात गर्दी होत आहे. तर दुसरीकडे केंद्र सरकारची योजना असणारी ‘आयुष्यमान भारत’ योजनेंतर्गत निवड झालेल्या लाभार्थींना पोस्टाद्वारे घरपोच कार्ड मिळत आहेत. कोणतेही अर्ज केले नसताना अचानकपणे घरपोच हे कार्ड घरी येत असल्याने नागरिकांना आश्चर्याचा धक्का बसत आहे. आयुष्यमान भारत योजनेंतर्गत निवड झालेल्या कुटुंबाच्या नावासह हे कार्ड येत आहे. या कार्डासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विविध योजनांची माहिती असणारी पत्रके असल्याने येत्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा हा एक भाग आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

शहरातील काही जणांना स्पीड पोस्टाद्वारे अशी कार्डे आणि पत्रके येवू लागली आहेत. या कार्डाबरोबरच असणाऱया पत्रकामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छायाचित्रे तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (पीएमजेएवाय)असा लोगोही आहे. याबरोबरच केंद्र सरकारद्वारे राबविण्यात आलेल्या प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, अटल पेन्शन योजना, प्रधानमंत्री वयोवंदना योजना यासह मुद्रा योजना आदींचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदेश पत्राचाही समावेश आहे. यामुळे 2019च्या लोकसभा निवडणुकीचा यामाध्यमातून प्रचार सुरू करण्यात आला आहे का? अशी चर्चा सुरू आहे.

नागरिकांनी रेशन कार्डासाठी दिलेला (बीपीएल)डेटा द्वारे माहिती संग्रहीत करण्यात आली आहे. आणि आयुष्यमान भारत योजनेंतर्गत निवड करून  कुटुंबियांना घरपोच कार्डचे वितरण करण्यात येत आहे. सदर कार्ड नॅशनल हेल्थ एजन्सी,  एमआयडीसी एरिया,  नवी मुंबई या पत्यावरून घरपोच मिळत आहे. मात्र आपण आयुष्यमान भारत योजनेंतर्गत अर्ज केला नसताना सदर कार्ड येत असल्याने नागरिकांतून आश्चर्य व्यक्त होत आहे.

चौकट करणे

पंतप्रधान मोदींनी आयुष्यमान भारत योजनेतील कार्ड घरपोच पोहोचविण्याचे काम सुरू केले आहे. आता सर्वांच्या बँक खात्यात 15 लाख रूपये जमा करतील का? असा प्रश्न नागरिकांतून विचारला जात आहे.