|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » 10 कैद्यांच्या सुटकेसाठी सरकारकडे शिफारस

10 कैद्यांच्या सुटकेसाठी सरकारकडे शिफारस 

जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत निर्णय

प्रतिनिधी/ बेळगाव

वागणुकीत सुधारणा झालेल्या व 14 वर्षे शिक्षा पूर्ण केलेल्या कैद्यांची सुटका करण्यासाठी राज्य सरकारकडे शिफारस करण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमिवर हिंडलगा मध्यवर्ती कारागृहातील 10 कैद्यांची सुटका करण्यासाठी जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत शिफारस करण्यात आली असून जर ही प्रक्रिया लांबली तर 26 जानेवारी रोजी कैद्यांची सुटका होण्यास विलंब होणार आहे.

गुरुवारी सायंकाळी जिल्हास्तरीय समितीची बैठक झाली. जिल्हा मुख्यसत्र न्यायाधीश, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख, जिल्हा शल्य चिकित्सक यांचबरोबरच सामाजिक क्षेत्रातील दोन सदस्य या बैठकीत उपस्थित होते. हिंडलगा मध्यवर्ती कारागृहाचे मुख्य अधिक्षक टी. पी. शेष यांनीही या बैठकीत भाग घेतला होता.

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमिवर कारागृह प्रशासनाने सुटकेसाठी पात्र 16 कैद्यांची यादी तयार ठेवली होती. जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत 10 नावे अंतिम करुन त्या सरकारला पाठविण्यात आल्या आहेत. महम्मद, राजप्पा, श्रीराज, यल्लाप्पा, फर्नांडीस, बसय्या, मल्लाप्पा, गंगाधर, लक्ष्मी व रेणुका यांचा यामध्ये समावेश आहे. यामध्ये 8 पुरुष व दोन महिलांचा समावेश आहे.

जिल्हास्तरीय समितीने शिफारस केलेल्या नावावर बेंगळूर येथे होणाऱया राज्यस्तरीय समितीच्या बैठकीत चर्चा करुन शिक्कामोर्तब केला जातो. त्यानंतर मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय घेऊन सुटकेसाठी पात्र कैद्यांची अंतिम यादी राज्यपालांकडे पाठविण्यात येते. राज्यपालांनी हिरवा कंदील दाखविल्यानंतर सुटकेचा मार्ग मोकळा होतो.

प्रजासत्ताक दिनाला केवळ 15 दिवस शिल्लक असताना ही प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यामुळे प्रजासत्ताक दिनी कैद्यांची सुटका होईल, याची शक्मयता कमीच आहे. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच सुटकेचा मार्ग मोकळा होता. या प्रक्रियेसाठी किमान दीड ते दोन महिन्याचा कालावधी लागणार आहे. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच कैद्यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा होणार आहे.