|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » प्रत्येकाने अनुभवातून अन् चुकातूनच शिकले पाहिजे!

प्रत्येकाने अनुभवातून अन् चुकातूनच शिकले पाहिजे! 

प्रतिनिधी / बेळगाव

ध्येयापर्यंत पोहोचायचे असेल तर वेळ, शिस्त, आत्मविश्वास यांचे पालन करून वय आणि भूतकाळ यांच्याकडे न पाहता वाटचाल केल्यास यश नक्कीच मिळते. स्पर्धा ही स्वतःने स्वतःशीच करावी म्हणजे आपल्यातील कमी जाणवते. प्रत्येकाने आपल्या अनुभवातून आणि चुकातूनच शिकले पाहिजे. नकाराने खचून न जाता चुकतोय कुठे, हे समजून घेतले की पुढील वाटचाल सुखकर बनते, असे मत मॅरेथॉनपटू मयुरा शिवलकर यांनी व्यक्त केले. येथील बेळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षण समितीच्या स्थापना दिन कार्यक्रमप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून मयुरा शिवलकर बोलत होत्या.

शुक्रवारी मराठा मंदिर येथे स्थापना दिन मोठय़ा उत्साहात पार पडला. प्रारंभी हेरवाडकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी ईशस्तवन-स्वागतगीत सादर केले. यानंतर मयुरा शिवलकर, संस्थेचे अध्यक्ष आर. डी. शानभाग, संचालक सेवंतीभाई शाह, भालचंद्र कलघटगी, खजिनदार राजेश शिवलकर, अजित कुलकर्णी, पंकज शिवलकर, दिलीप चिटणीस, संस्थेच्या समन्वयक अलका कुलकर्णी, संचालिका बिंबा नाडकर्णी, हिमांगी प्रभू या मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून संस्थेचे संस्थापक बाबुराव ठाकुर, चतुरदास शाह, गोविंद हेरेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यानंतर मान्यवरांच्या हस्ते शालेय स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या कविता, लेख तसेच शाळेची सविस्तर माहिती असणारी ‘मधुकेरियन’ ही स्मरणिका प्रकाशित करण्यात आली. अध्यक्षीय भाषणात आर.डी. शानभाग यांनी संस्थेची वाटचाल स्पष्ट करून दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा  दिल्या. यावेळी 2018-2019 या शैक्षणिक वर्षातील उत्कृष्ट विद्यार्थी व विद्यार्थिनी तसेच विविध स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले.

मराठी टिचर्स ट्रेनिंग कॉलेजच्या प्राचार्या एच. पी. परुळेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. जे. एन. भंडारी स्कूल ऑफ आर्टचे प्राचार्य जे. फडके यांच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. एम. व्ही. हेरवाडकर हायस्कूलच्या मुख्याध्यापिका वृंदा जिनराळ यांनी अहवाल वाचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. एम. बी. हुंदरे यांनी केले. जयश्री सज्जन यांनी आभार मानले. 

कलांचे सादरीकरण

संस्थेची स्थापना 1937 साली झाली असून संस्थेचा 82 वा स्थापना दिवस शुक्रवारी साजरा करण्यात आला. वार्षिक दिनाबरोबरच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा सांस्कृतिक कार्यक्रम यावेळी पार पडला. शृंगार, हास्य, करुणा, वीर, रौद्र, भयानक, बीभत्स, अद्भूत, शांतश्च हे नवरस थीमच्या माध्यमातून नृत्य, नाटय़, संगीत या कलांचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले.

सदर कार्यक्रमात संस्थेच्या मराठी टीचर्स टेनिंग कॉलेज, एम. व्ही. हेरवाडकर हायस्कूल, रामकुमार जांग्रा किंडरगार्डन, राधाबाई रामकृष्ण साळगावकर कॉम्प्युटर स्कूल-टिळकवाडी, जे. एन. भंडारी स्कूल ऑफ आर्ट-शिनोळी या शिक्षण संस्थेच्या सहभागातून कार्यक्रम पार पडला.