|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » कचरा हलविण्यास प्रारंभामुळे दिलासा

कचरा हलविण्यास प्रारंभामुळे दिलासा 

प्रतिनिधी/ बेळगाव

 महापालिकेच्या हंगामी स्वच्छता कामगारांचा पगार देण्याबाबतच्या तोडगा काढण्यात आला आहे. पण वेतन ऑनलाईन देणार की, कंत्राटदारांकरवी याबाबतचा निर्णय झाला नाही. मात्र शहरातील स्वच्छतेची समस्या जाणून घेऊन स्वच्छता कामगारांनी आपले आंदोलन मागे घेऊन शुक्रवारी सकाळपासून स्वच्छता कामास सुरुवात केली. यामुळे शहरात साचलेले कचऱयाचे ढिगारे हटू लागल्याने शहरवासियांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

महापालिकेच्या स्वच्छता कामगारांनी गेले दोन दिवस आंदोलन छेडले होते. मागील तीन महिन्याचे वेतन देण्यात आले नसल्याने कामगारांनी काम बंद आंदोलन करून स्वच्छतेची कामे बंद ठेवली होती. त्यामुळे शहरातील विविध गल्ली कोपऱयात कचऱयाचे ढिगारे साचले होते. त्याचप्रमाणे घरातील कचरा उचलण्यात आला नसल्याने घरातील रस्त्यावरील कचरा कुंडीत टाकण्यात आला होता. यामुळे कचऱयाचे ढिगारे साचले होते. कचऱयाचे ढिगारे हटविण्यासाठी महापालिकेच्या कर्मचाऱयांना जुंपण्याचा प्रयत्न मनपाच्या अधिकाऱयांनी चालविला होता. पण हा प्रयत्न यशस्वी ठरला. अखेर महापालिकेच्या स्वच्छता कामगारांनाच कचऱयाचे ढिगारे हटविण्याची वेळ आली. घरोघरी जाऊन कचरा गोळा केला जात असे, पण  आंदोलनामुळे घरातील कचरा देखील रस्त्यावरील कचराकुंडीत टाकण्यात आला होता. यामुळे दुप्पट कचरा साचून सर्वत्र दुर्गंधी पसरली होती. तर महापालिकेच्या अधिकाऱयांनी स्वच्छता कामगारांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला, पण या प्रयत्नांना यश आले नव्हते. त्यामुळे हे आंदोलन एक दिवसावरून दोन दिवस गेले.   अखेर दुसऱया दिवशी याबाबत तोडगा निघाला आहे. वेतन ऑनलाईन देण्याची मागणी कामगारांनी केली होती. तर काही कर्मचाऱयांनी कंत्राटदारांकरवी वेतन देण्याची मागणी केली होती. यामुळे स्वच्छता कामगारांच्या संघटनेत दुमत निर्माण झाले होते. स्वच्छता कामगारांमध्ये दोन विविध मागण्या झाल्याने या आंदोलनाची तीव्रता कमी झाली. त्याचप्रमाणे थकलेले वेतन येत्या आठवडाभरात देण्यात येईल, असे महापालिकेच्या पर्यावरण सहाय्यक अभियंते उदयकुमार तळवार यांनी सांगितले. तसेच वेतन देण्याची व्यवस्था करण्यात येईल, स्वच्छतेच्या कामास प्रारंभ करावा, असे आवाहनही त्यांनी केले होते. याची दखल घेऊन स्वच्छता कामगारांनी शुक्रवारी सकाळपासून स्वच्छतेच्या कामास सुरुवात केली. पण सर्वत्र दोन दिवसाचा कचरा साचला असल्याने मोठमोठे ढिगारे साचले होते. यामुळे हे कचऱयाचे ढिगारे उपसताना स्वच्छता कामगारांना देखील आंदोलन नकोसे वाटले. विशेषत: बाजारपेठेत कचऱयाची समस्या व कचऱयाचे ढीग मोठय़ा प्रमाणात साचले होते. नरगुंदकर भावे चौक, गणपत गल्ली त्याचप्रमाणे अन्य भागात मोठमोठे ढिगारे साचले होते. सकाळी सहा वाजल्यापासून कचऱयाचे ढिगारे हटविण्यास प्रारंभ करण्यात आला होते. पण दुपारपर्यंत कचऱयाचे ढिगारे हटविण्यात कामगारांना यश आले नाही. पण स्वच्छता कामगारांनी आपले आंदोलन मागे घेऊन काम सुरू केल्याने शहरवासियांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.