|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » अश्वारुढ शिवपुतळय़ाचे आज कडोलीत लोकार्पण

अश्वारुढ शिवपुतळय़ाचे आज कडोलीत लोकार्पण 

महाराष्ट्र-कर्नाटकातील दिग्गज नेत्यांची उपस्थिती : जय्यत तयारी

वार्ताहर/ कडोली

शनिवार दि. 12 रोजी होणाऱया येथील अश्वारूढ शिवपुतळय़ाच्या लोकार्पण सोहळय़ासाठी कडोली गाव सज्ज झाला आहे. शिवाजी महाराजांनी निर्मिलेले गड-किल्ले आजही त्यांचा स्फूर्तिदायी इतिहास नजरेसमोर उभा करतात. विविध गुणांनी संपन्न असणाऱया राजांचा इतिहास लोकांसमोर यावा. त्यांच्यापासून प्रेरणा व स्फूर्ती मिळावी यासाठी कडोली येथे संपूर्ण बेळगाव जिल्हय़ाचे लक्ष वेधून घेणारा सर्वाधिक उंचीचा अश्वारुढ शिवपुतळा उभारण्यात आला आहे. या भव्य पुतळय़ाचा लोकार्पण सोहळा शनिवार दि. 12 रोजी अत्यंत उत्साहात आणि दिमाखात साजरा होत आहे.

येथील ग्रा. पं. कार्यालयासमोर सकाळी 11 वाजता दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा साजरा होणार आहे. यावेळी कर्नाटकाचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, शिवरायांचे 13 वे वंशज खासदार उदयनराजे भोसले, वनमंत्री सतीश जारकीहोळी, खासदार प्रकाश हुक्केरी, बेळगाव जिल्हय़ातील आमदार, वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

उद्घाटन सोहळा

शनिवारी सकाळी 11 वाजता लोकार्पण सोहळय़ाला प्रारंभ होणार आहे. पूज्यश्री जगद्गुरु डॉ. सिद्धराम स्वामी आणि श्री दुरदुंडेश्वर वीरक्त मठाचे पूज्यश्री गुरुबसवलिंग स्वामीजी यांच्या दिव्यसानिध्यात मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्या हस्ते शिवपुतळय़ाचे पूजन होणार आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या व खासदार उदयनराजे भोसले यांच्याहस्ते  अनावरण होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बेळगाव जिल्हा पालकमंत्री व वनमंत्री सतीश जारकीहोळी राहणार आहेत. तसेच यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार प्रकाश हुक्केरी, माजी मंत्री रमेश जारकीहोळी, आमदार गणेश हुक्केरी, माजी खासदार अनिल लाड, विधान परिषद सदस्य विवेकराव पाटील, विधानपरिषद सदस्य महांतेश कवटगीमठ, आमदार श्रीमंत पाटील, आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार अंजली निंबाळकर आदी जिल्हय़ातील नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत.

या पार्श्वभूमीवर गावात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. रहदारीची कोंडी होऊ नये यासाठी व्ही. आय. पी. वगळता इतर सर्व वाहनांवर गावात बंदी करण्यात आली आहे. गावच्या वेशीत उत्तरेकडे हनुमाननगर येथे वाहन पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. तर दक्षिणेकडे रामनगर येथे वाहन पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

शिवपुतळा विद्युत रोषणाईने झळाळला

आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आल्याने अश्वारूढ शिवपुतळा उजळून निघाला आहे. हे सुंदर मनोहरी दृष्ट टिपण्यासाठी रात्रीच्यावेळी शिवभक्तांची गर्दी वाढत आहे. सायंकाळी सात वाजता प्रफुल्ल महाराज कोल्हापूर प्रस्तुत ‘जय जय महाराष्ट्र’ माझा’ हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.