|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » खानापूरनजीक रेल्वे अपघात टळला

खानापूरनजीक रेल्वे अपघात टळला 

रेल्वेलाईनवर जुनाट झाडाची फांदी तुटून पडल्याने जलद रेल थांबली

खानापूर / वार्ताहर

खानापूरजवळील महामार्गावरील रेल्वे ओव्हरब्रिजच्या बाजूला असलेल्या जुनाट  वडाच्या झाडाची फांदी तुटून रेल्वेमार्गावर पडल्याने बेळगावहून लोंढय़ाकडे जाणाऱया सोलापूर-कोल्हापूर ते मन्नूपूर एक्स्प्रेस रेल्वेला अपघात होताöहोता टळला. चालकाच्या प्रसंगावधानाने रेल्वे लागलीच थांबवण्यात आली व मोठा अनर्थ टळल्याची घटना शुक्रवारी दुपारी 12.45 वाजता घडली. अखेर रेल्वेतील काही कर्मचारी तसेच महामार्गावरून ये-जा करणाऱयांनी रेल्वे थांबल्याचा प्रकार लक्षात घेऊन पडलेली फांदी हटविली. त्यानंतर रेल्वे मार्गस्थ झाली. पण या प्रकारामुळे मोठा अनर्थ तर टळलाच शिवाय एक्स्प्रेस तब्बल 20 मिनिटे थांबल्याने रेल्वेचे वेळापत्रकही कोलमडले.

  दुपारी 12.45 च्या सुमारास खानापूरमार्गे जाणारी सोलापूर-कोल्हापूर ते मन्नूपूर एक्स्प्रेस येत असताना खानापूरजवळ महामार्गावर बेळगाव रेल्वे ओव्हरब्रिजला लागून जुनाट वडाचे मोठे झाड आहे. या झाडाची रेल्वे लाईनच्या बाजूला असलेली मोठी फांदी अचानकपणे तुटून पडल्याने ब्रिजवर व महामार्गावरही वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. तसेच फांदीचा मोठा भाग रेल्वेलाईनवर पडल्याने हा प्रकार घडला. सदर सोलापूर एक्स्पेस येण्यापूर्वी केवळ अर्धातास अगोदर म्हणजे 11.53 ला हुबळी पॅसेंजर रेल्वे खानापूरकडे गेली होती. त्यानंतर सदर झाडाची फांदी पडल्याने एकच धावपळ उडाली. सदर फांदी पडताच काही नागरिकांनी पोलीस कंन्ट्रोलरूमला सदर बाब कळवली. तर दुसरीकडे महामार्गावर झाडाच्या फांदीचा काही भाग पडल्याने एकच गर्दी झाली होती. तेवढय़ात सोलापूर एक्स्प्रेस  येत असल्याचे काहीच्या निदर्शनाला आले व रेल्वेला ब्रिजवरून लाल बावटय़ाचा इशारा दिल्याने तसेच ब्रिजवरील गर्दीचा अंदाज लक्षात घेता प्रसंगावधान साधून रेल्वेचालकाने वेग कमी केला व समोर मोठे झाड पडल्याचे लक्षात येताच फांदीवरच रेल्वे थांबवली. चालकाने पुन्हा रेल्वे 50 फूट पाठीमागे घेतल्यानंतर झाडाची फांदी उपस्थित लोकांच्या सहकार्याने हटविण्यात आली व रेल्वे पुन्हा मार्गस्थ झाली.  त्यानंतर रेल्वे कर्मचारी तसेच वनखात्याच्या कर्मचाऱयांनी फांदी हटविली.

     वडाचे झाड अद्यापही धोक्मयाचे

  खानापूर-बेळगाव या रेल्वे लाईनचे ब्रॉडगेज झाल्यानंतर या ठिकाणी असलेल्या बेळगाव ब्रिजचे नूतनीकरण 1995 च्या काळात करण्यात आले. त्यावेळी जुन्या ब्रीजच्या बाजूला असलेले हे जुनाट वडाचे झाड आता धोकादायक बनले आहे. या झाडाच्या फांदय़ा यापूर्वी अनेकवेळा तुटून पडल्या आहेत. पण ते झाड हटविण्यात आले नाही. अजूनही रेल्वेलाईनच्या बाजूने झाडाच्या धोकादायक फांद्या आहेत. असा अनर्थ पुन्हा घडू नये, याकरिता सदर झाड हटविण्यात यावे, अशी मागणी होत आहे.