|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » संकेश्वरची जनावर बाजारपेठ दुसऱया आठवडय़ातही बंद

संकेश्वरची जनावर बाजारपेठ दुसऱया आठवडय़ातही बंद 

प्रतिनिधी/  संकेश्वर

जनावरांना लाळखुरकत रोगाच्या साथीने पछाडले आहे. ही साथ दिवसेंदिवस मोठय़ा प्रमाणात फैलावत आहे. त्यामुळे साथीच्या रोगाच्या जनावरांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. ही साथ नियंत्रणाखाली आणण्यासाठी जिल्हय़ातील पशू इस्पितळाने उपाययोजना हाती घेतल्या आहेत. मात्र आठवडी बाजारासाठी आलेल्या जनावरांवर अधिक परिणाम होत असल्याने जिल्हय़ातील आठवडी बाजार बंद ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकाऱयांनी दिला आहे. या आदेशाचे समर्थन करण्यासाठी संकेश्वर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने शुक्रवारी आठवडय़ाच्या बाजारादिवशी जनावर बाजारपेठेच्या प्रवेशद्वारालाच टाळे ठोकून बाजार बंदचा संदेश दिला आहे.

गेल्या पाच वर्षांपासून लाळखुरकत रोग आढळून आला आहे. या रोगाचे निदान समजेपर्यंत हजारो जनावरांचा या साथीने बळी गेला आहे. यंदा पशूखात्याच्या सर्वेक्षणात लाळखुरकत साथीच्या जनावरांची संख्या मोठय़ा प्रमाणात आढळून आली आहे. त्यामुळे ही साथ अधिक फैलावणार नाही याची काळजी घेत साथीचे जनावर आढळताच त्या जनावरांना रोगमुक्त करण्याचा प्रयत्न पशू आरोग्य खात्याने चालवला आहे. तसा आदेशही जिल्हय़ातील प्रत्येक पशू इस्पितळांना देऊन गंभीरपणे लक्ष देण्याची सक्तीची सूचना केली आहे.

कोटीची उलाढाल ठप्प

जिल्हाधिकाऱयांच्या आदेशानुसार 4 व 11 जानेवारी रोजी जनावर बाजारपेठ पूर्णपणे बंद केली आहे. या बाजारपेठेत सांगली, चंदगड, आजरा, गडहिंग्लज, अथणी, बेळगावसह सुमारे 200 ग्रामीण भागातील जनावरे खरेदी-विक्रीसाठी येतात. प्रत्येक आठवडी बाजारात 80 ते 90 लाखाची आर्थिक उलाढाल होतेय. सलग दुसऱया आठवडय़ातही बाजारपेठ बंद असल्याने कोटीची आर्थिक उलाढाल ठप्प झाल्याची चर्चा व्यापारी वर्गात होती.