|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » सहा एकरातील उसाला आग

सहा एकरातील उसाला आग 

वार्ताहर/   येडूर

येडूर (ता. चिकोडी) येथील शॉर्टसर्किटने सहा एकरातील उसाला आग लागून लाखो रुपयाचे नुकसन झाल्याची घटना गुरुवारी घडली. या दुर्घटनेत तीन शेतकऱयांना आर्थिक फटका बसला आहे. आग लागताच परिसरातील नागरिकांनी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविल्याने अन्य पाच एकरातील ऊस आगीपासून वाचविण्यात यश मिळाले.

घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, गावाशेजारील सर्व्हे नंबर 12 व 13 मधील शेतकरी नागेश जोशी, संजय शिंगाडे व विष्णू शिंगाडे यांच्या मालकीचा सहा एकरात ऊस आहे. सदर उसाच्या फडात गुरुवारी सकाळी 11 सुमारास विद्युतभारीत तारा एकमेकांना घर्षण होऊन आगीची ठिणगी पडली. यामुळे उसाच्या फडाला आग लागली. आग लागल्याचे समजताच गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला व त्याला यशही मिळाले. यामुळे परिसरातील पाच एकरातील ऊस आगीपासून बचावला.

तत्पूर्वी आगीत जोशी, शिंगाडे या शेतकऱयांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सदर आग हेस्कॉमच्या दुर्लक्षामुळेच लागल्याचा आरोप येथील शेतकऱयानी केला. हेस्कॉमने त्वरित नुकासान भरपाई द्यावी, अशी मागणीही केली. जळालेला ऊस शिरोळ व टाकळीवाडी येथील कारखान्यांनी तोड करून गाळपास नेण्याचे तत्काळ नियोजन केल्याने थोडी आर्थिक मदत शेतकऱयांना होणार आहे. या घटनेची नोंद अंकली पोलिसात झाली आहे.