|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » Top News » राजमाता जिजाऊंची जयंती, सिंदखेड राजाला शिवभक्तांची मोठी गर्दी

राजमाता जिजाऊंची जयंती, सिंदखेड राजाला शिवभक्तांची मोठी गर्दी 

ऑनलाईन टीम / मुंबई :

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांची आज 421 वी जयंती आहे. त्यानिमित्त बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे शिवभक्तांनी मोठी गर्दी केली आहे. राजमाता जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी इ.स.1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे झाला होता. शिवाजी महाराजांच्या स्वराज्य आणि सुराज्य संकल्पनेला मूर्तरुप देण्यात राजमाता जिजाऊंच्या मार्गदर्शनाचा मोठा वाटा आहे. त्यामुळेच जिजाऊंचे जन्मस्थळ आज केवळ ऐतिहासिकच नाही तर एक पर्यटन स्थळ बनले असून दरवर्षी राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवभक्त मावळे येथे माँसाहेबांच्या दर्शनासाठी गर्दी करतात.

जिजाऊ माँसाहेबांचा जन्म भुईकोट राजवाड्यामध्ये 12 जानेवारी 1598 साली झाला. आकर्षक भव्य प्रवेशद्वार असणारा हा राजवाडा सिंदखेड राजा नगरीमध्ये मुंबई-नागपूर हायवेजवळच आहे. याच वस्तूसमोर नगरपालिका निर्मित एक बगीचादेखील आहे. येथे राजे लखुजीराव जाधवांचे समाधीस्थळ आहे. ही भव्य वस्तू भारतातील संपूर्ण हिंदुराज्यांच्या समाधीपेक्षा मोठी वस्तू आहे. ज्या ठिकाणी जिजाऊंनी रंग खेळला तो महाल म्हणजे रंगमहाल. याच महालात शहाजीराजे आणि जिजाऊंच्या विवाहाची बोलणी करण्यात आली होती.

येथे नीलकंठेश्वराचे प्राचीन मंदिर आहे, या मंदिरामध्ये संपूर्ण पाषाणातून साकारलेले हरीहाराचे सुंदर शिल्प आहे, तर राजे लखुजीराव जाधवांनी मंदिराचे पुर्नजीवन केल्याचा शिलालेख कोरलेला आहे. या मंदिरासमोरच चौकोनी आकारात तळापर्यंत उतरण्यासाठी पायऱ्यांची व्यवस्था असणारी एक भव्य बारव आहे. तर 8 व्या ते 10 व्या शतकातील अतिप्राचीन असे हेमाडपंथी रामेश्वर मंदिरही आहे.