|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » भयभीतांची आघाडी टिकणे अशक्य

भयभीतांची आघाडी टिकणे अशक्य 

महाआघाडीवर जेटलींचे शरसंधान : मोदींच्या नेतृत्वासमोर टिकाव लागणे अशक्य

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

उत्तरप्रदेशात सप-बसप आघाडीच्या घोषणेच्या काही मिनिटांतच अर्थमंत्री अरुण जेटलींनी शाब्दिक हल्ला चढविला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या करिष्म्याच्या भीतीने सर्व नेते एक होत आहेत, परंतु भीतीपोटी एकत्र आलेल्या अशा आघाडय़ांना जनता स्वीकारणार नाही. भाजपकडे नेतृत्व तसेच संघटनेसह सहकारी पक्ष देखील असल्याचे म्हणत जेटलींनी भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनातून विरोधकांवर टीकेची झोड उठविली आहे.

स्वार्थासाठी करण्यात आलेली आघाडी काही काळासाठीच असते. अशा महाआघाडय़ांबद्दल भीती बाळगण्याची कोणतीच गरज नाहे. मोदींच्या नेतृत्वासमोर कोणीच टिकू शकत नाही, भले मग तो काँग्रेसचा युवराज असो, पश्चिम बंगालमध्ये दीदी असो, आंध्रप्रदेशात चंद्राबाबू असो किंवा उत्तरप्रदेशात मायावती असो. या सर्वांनाच पंतप्रधानपद खुणावत असून निवडणुकीनंतरच त्यांच्या म्यानातील तलवारी बाहेर पडतील. भीतीमुळे एकत्र आलेल्या या आघाडय़ांचे वय काही महिन्यांपेक्षा अधिक नसते असे उद्गार जेटलींनी काढले.

2014 मध्ये रालोआत 24 घटकपक्ष होते, यंदा ही संख्या वाढून 35 वर पोहोचली आहे. महाआघाडी कशाप्रकारे देशाचे नुकसान घडवून आणते हे आम्ही जनतेला सांगणार आहोत. स्वार्थी आघाडीचे राजकारण जनतेसमोर प्रभावीपणे मांडण्याची गरज असल्याचे जेटली म्हणाले.

आज देशात सर्वत्र उत्साह संचारला असून भारत जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. आमच्याकडे राष्ट्रीय अध्यक्षांचे नेतृत्व तसेच संघटना देखील आहे. मागील निवडणुकीत 282 जागा मिळाल्या होत्या. यंदा हा आकडा देखील आम्ही ओलांडणार आहोत. भारतात अपेक्षा तसेच आकांक्षांनी भरलेला समाज असून अशाप्रकारच्या भयग्रस्त आघाडय़ांना कोणताही समाज स्वीकारण्यास तयार होणार नसल्याचे विधान जेटलींनी केले आहे.

2019 ची निवडणूक जिंकूच : शाह

नवी दिल्ली येथील रामलीला मैदानात भाजपच्या दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनादरम्यान पक्षाध्यक्ष अमित शाह यांनी नाव न घेता सप-बसप आघाडीवर टीका केली आहे. कोणी कितीही आघाडी करावी, 2019 ची लोकसभा निवडणूक आम्ही मोदींच्या नेतृत्वाखाली जिंकू असे उद्गार शाह यांनी काढले आहेत. मतदानाच्या दिवशी कार्यकर्त्यांनी स्वतःचे, कुटुंबाचे तसेच मित्रपरिवाराचे मत सकाळी 10.30 च्या पूर्वी पडेल हे सुनिश्चित करावे अशी सूचना शाह यांनी यावेळी केली आहे.

काँग्रेसने देशात जातीयवाद, घराणेशाही आणि तुष्टीकरणाचा राक्षस निर्माण केला आहे. काँग्रेसच्या या धोरणांमुळे देशातील लोकशाही कमकुवत ठरली असून विकास रखडला आहे. मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये आमचे विरोधक जिंकले असले तरीही आम्ही हरलेलो नाही. निकाल चांगला राहिला नसला तरीही आम्ही आमचे समर्थन गमाविलेले नाही.  कार्यकर्त्यांनी निराश होऊ नये असे शाह यांनी म्हटले आहे.