|Sunday, August 25, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » चौकीदार एकालाही सोडणार नाही !

चौकीदार एकालाही सोडणार नाही ! 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

 रामलिला मैदानावर सुरू असलेल्या भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या समारोपप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘चौकीदार एकाही चोराला सोडणार नाही’ अशी पुन्हा एकदा गर्जना केली. देश विकासाचा मंत्र घेऊन चालत आहे. देशाच्या विकासाकरता आणि शेतकऱयांच्या हिताकरता मजबूत सरकार निवडून देण्याचे आवाहनही केले. त्याचबरोबर विरोधकांवर हल्ला करताना त्यांना ‘मजबूत नव्हे तर मजबूर सरकार’ भ्रष्टाचार करण्यासाठी हवे असल्याची टीका केली.

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असणाऱया राष्ट्रीय अधिवेशनाची सांगता शनिवारी करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाची आणि सरकारची भूमिका मांडली. तसेच देशातील जनतेला पुन्हा एकदा भाजपलाच निवडून देण्याचेही आवाहन केले. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच आमच्या सरकारवर भ्रष्टाचाराचा कोणताही आरोप झालेला नाही. विकासाच्या मुद्यावरच वाटचाल सुरू आहे. सुरक्षा, गरीब कल्याण शेतकरी हित अशी त्रिसुत्री ठेवून वाटचाल करत असल्याचे सांगितले.

आजवरच्या वाटचालीमध्ये आपण प्रधानसेवकाची भूमिका ठेवली. विकासाची भाषा केली म्हणून आता भारतीय जनतेने ठरवावे त्यांना कसा प्रधानसेवक हवा, देशाची गरज असताना सुटीवर जाणारा की सातत्याने 18-18 तास काम करणारा प्रधानसेवक हवा आहे, हे ठरवा, असे सांगताना भाजपलाच पुन्हा एकदा संधी देण्याबाबत आवाहन केले.

काँग्रेससह विरोधकांनी सुरू केलेल्या महाआघाडीवरही त्यांनी भाष्य केले. केवळ एका व्यक्तीला विरोध म्हणून ते एकत्र येत आहेत. विरोधक याआधी काँग्रेसच्या धोरणावर टीका करत होते. मात्र तेच आता हातात हात घालत आहेत. आजवर त्यांनी शेतकऱयांना व्होट बँक म्हणूनच पाहिले. परंतु आम्ही शेतकऱयांना सशक्त बनवण्याचेच निर्णय घेतले आहेत. मात्र हेच विरोधकांना नको आहे, मजबूर सरकार आले तर त्यांना अनेक सौद्यांमध्ये दलाली हडपता येईल, शेतकरी कर्जमाफीमध्ये घोटाळे करता येतील, कर्ज बुडवणाऱयांशी संधान बांधता येईल, त्यासाठीच त्यांचा आरोडाओरडा सुरू आहे. मात्र हे होऊ दिले जाणार नसल्याचाही पुनरुच्चार त्यांनी केला.

माझ्याविषयी ते भरपूर अपशब्द बोलण्यात आले आहेत. पण चौकीदार जागा आहे, चौकीदार थांबणार नाही, चोर कुणीही असो, पकडणारच आणि आता त्याची सुरुवात झाली आहे. हे चोर देशात असो वा विदेशात एकालाही सोडणार नाही, असे प्रतिआव्हानही त्यांनी काँग्रेस व विरोधकांना दिले. गुजरातचा मुख्यमंत्री असताना 9 तास बसवून चौकशी करण्यात आली. पण काँग्रेसची फर्स्ट फॅमिली स्वतःला कायद्यापेक्षाही मोठी समजते. न्यायालयाने समन्स बजावल्यानंतरही सुनावणीकरता उपस्थित राहत नाहीत. त्यांचा देशाच्या संस्थांवरच विश्वास नाही, कायद्यावर विश्वास नाही तेच माझ्यावर आरोप करु पाहात आहेत. त्याकरताच ते सीबीआय, कॅग, आरबीआय सगळय़ांनाच चुकीचे ठरवत आहेत. परंतु ही संविधान आणि साम्राज्य अशी लढाई आहे आणि काँग्रेसचे साम्राज्य आता धुळीला मिळणार आहे, असा विश्वास व्यक्त केला.

10 टक्के आर्थिक निकषावरील आरक्षण भारतातील गुणवत्ताधारक युवकांचा आत्मविश्वास वाढवणारे आहे. आधीच्या आरक्षणात कुठेही कपात केलेली नाही. मात्र विरोधक त्याचा गैरप्रचार करुन संभ्रम निर्माण करत आहेत. त्यांचेही कारस्थान हाणून पाडण्याचे आवाहनही त्यांनी केले.

पंतप्रधान मोदी म्हणाले…

21 व्या शतकातील परिवर्तनाची दहा वर्षे घोटाळे आणि भ्रष्टाचाराने वाया गेली

सत्तेचा वापर करुन काँग्रेसने मला, अमित शहांना अतोनात त्रास दिला

घोटाळे उघड होऊ नयेत म्हणून काही राज्यांचा सीबीआय चौकशीला विरोध

देशहित, समाजहिताच्या प्रत्येक विधेयकाला काँग्रेसचे अडथळे

राहुल यांच्या सुटीवर टीका…